नेम

   "  हे नवीन वर्ष आपणा सर्वांस सुख-समृद्धीचं आणि आरोग्याचं जावो ! " असं म्हणत आपण नवीन वर्षाचं स्वागत करतो आणि बरेच काही नेमही करतो !  ह्या वेळी मी मात्र असा नेम केला होता की तो मोडूच शकणार नाही.  तो म्हणजे वाचणे ! काहीतरी वाचन रोज झालेच पाहीजे ! ते म्हंटलं तर चालू आहे , म्हंटलं तर नाही !!

    तशी लहानपणापासूनच माझ्यावर वाचनाची सवय थापली गेली .  एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मधल्या बहिणीने फर्मान काढलं. " ह्या सुट्टीतआपण खांडेकर वाचायचे आहेत " . ' वि. स. खांडेकर ?' त्यांच्या नावातच २४ अक्षरांचा खच आणि त्यांचा लिहायचा स्पीड आपल्या वाचायच्या स्पीडहून जास्त तर  ..., 'उल्का' ते 'अमृतवेल' हा प्रवास मी पॉवर-रिडींगने केला. पहिली काही पानं , मग मधली २-४ आणि शेवटची ५-६ ! गोष्ट कळली की झालं.     भाषा, भाव, सौंदर्य सगळं पार डोक्यावरून !!      हाय कंबख्त .....  .     पण तेंव्हा तेवढीच  अक्कल होती ! एकदा आई एम . ए. करीत असतांना सहज म्हणाली , " यंदा फडक्यांचं प्रतिभा-साधन लावलंय ". त्याबरोबर माझ्या तोंडून निघून गेलं, " अय्या, बघू तरी ...."    नंतरचे आठ दिवस आईच्या नोट्स उतरवून काढत होते.  वाचन अफाट वाढलं होतं

    एका सुट्टीत प्रेमचंद ते गुलशन नंदा via कवी बच्चन !! ते सोपं होतं , कारण हिंदीतल्या कादंबऱ्यांचे सिनेमे तरी होतात किंवा सिनेमांच्या कादंबऱ्या, असा सिद्धांत आम्ही मांडला होता. त्यामुळे पुस्तक आणलं की  कोणता पिक्चर ? '   असं विचारून  त्याची उत्तरक्रिया पार पडायची

    त्या नंतरच्या काळात मुक्तेश्वर ते डॅन ब्राऊन पर्यंत.      ....बहुत नृपती ते आले , गेले !....     पण जर कोणी डोक्याच्या ऐवजी चाळणीच घेऊन बसलं असेल, तर कितीही वाचलं तरी आत कितपत टिकणार ?  

   दिसेल ते वाचणे ' इथपासूनदिसलं तरी वाचणार नाही  इथपर्यंतची वाटचाल माझ्या कॉलेजच्या अन् मुलांच्या शाळेच्या पुस्तकांनी सोपी झाली.  कधी-कधी नवरा दुष्टपणाने पासबुक पण वाचायला लावायचा ..!..

    पण नुकतंच एका 'आय. टी.' वाल्याने  केकावली चा अर्थ  पेस्ट्री-शॉपचं मराठीकरण ' असेल असं म्हटलं आणि मी हाय खाल्ली.     एकवेळ चाळणी परवडली,     पण आपल्या डोक्याचं असं नळकांडं होऊ नये म्हणून तरी मी वाचीन !!  चोरी, उधारी करून नव्हे तर पुस्तक विकत घेऊन वाचीन ! 

    कमीत कमी रोज त्या-त्या तारखेचा 'कालनिर्णय' मधला चौकोन वाचीन.  रात्री झोपायच्या आधी व्यंकटेश-स्तोत्राच्या किमान ५ ओळी !   झालंच तर रोज सकाळी '' पेपरातील  - ढ  पेपर म्हणजे  DH . म्हणजे  डेक्कन हेराल्ड  हं ! आमच्या इथला लोकल पेपर - त्यात रोज " वीज नाही / पाणी नाही " चा संकट-कॉलम  असतो, त्यात आपला एरिया नाही नं , हे ही वाचीन !

    कारण  'वाचणे'  ह्या शब्दाचा दुसरा अर्थही माझ्या नेमात मोडतो !


Comments

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland