वेडाफोन
माझा फोन वेडाफोन आहे. नाही, हे कोणत्याही service provider च्या नावाचे विडंबन वगैरे नाही. माझा फोन खरंच वेडा आहे. तो स्मार्ट फोन आहे म्हणून मी घेतला, पण नेहेमीप्रमाणे स्मार्ट म्हणून गणली गेलेली माणसं कधी कधी - नव्हे बऱ्याच वेळा - तोंडघशी पडतात आणि पाडतात ही , तसाच हा आहे . मला कधी कधी वाटतं की हा नुसताच साधा असता, तर बरं झालं असतं. मग मी त्याच्याकडून काहीच expect केलं नसतं.
मी रोज सकाळी उठल्याबरोबर news बघते फोनवर. की मी झोपलेली असतांना जगात काय काय घडलं, मी काय काय miss केलं ते. FOMO ! देशात काय नवीन घोटाळे झाले ते . म्हणजे दिवसभर 'रवंथ' करायला विषय ! बाकी घरात काय चाललंय, ह्यात मला interest नसतो, चालून चालून काय चालणार ? फाटकासमोर कोणीतरी कचरा टाकलाय, कामवालीला सर्दी-खोकला झालाय म्हणून आज चाट, नाहीतर आणखीन काहीतरी झेंगट गळ्यात ! एक दिवस , अमिताभ बच्चनचा फोटो दिसला म्हणून मी ते open करून पाहीलं - आखिर , मी ही एक बाईच आहे ! - तर झालं काय की , तेंव्हापासून माझ्या news मधे रोज सर्व बच्चन कुटुंबीयांची ख्याली-खुशाली मला मिळते. तसा स्मार्ट आहे माझा फोन !
AI बद्दल त्याला काही माहीत नसावं. पण कधी कधी humanoid असावा असं करतो ! मला घाई असली की हा संथ ! सगळं अगदी ह .. ळू .. ह .. ळू ! जरा जोरात टॅप केलं की हा रागावून घुम्म ! सगळा अंधार ! मधूनच लहर आली की मी save केलेले नंबर, फोटो गायब ! मी एक दिवस ' नितराम् ' शब्दापासून सुरु होणारी सुभाषितं शोधत होते, आणि ते सोडून ह्यानी मला रामचरितमानस पासून रामानंद सागर पर्यंत सगळं सांगितलं ! मी काही कामाचं वाचत असेन , तर ह्याला ते दोन सेकंदात बंद करायची घाई ! आणि आपण बाहेर जायचा काहीतरी झटपट plan करावा , तर ह्याचं भूक.. भूक - charge 20 % !
'ढ' पणा तर विचारूच नका ! अजूनही त्याला 'अन्' हा शब्द एकटाक लिहिताच येत नाही. आधी 'अ' लिहायचं, मग हा 'न' पूर्णच लिहिणार ! कारण त्याला ते कसं लिहायचं ते विसरायला होतं ! अशा वेळी त्याची memory गुल ! मग मी तो delete करून 'पन्हं' असं लिहिते. मग दोन अक्षरांच्या मधे जाऊन 'प' delete करायचा. मग दोन स्पेस पुढे जाऊन 'न्हं ' मधलं 'हं' delete करायचं, की शेवटी 'न्' येतं ! मग ते एक space मागे जाऊन अ ला जोडायचं ! हुश्श, काय हा द्राविडी प्राणायाम ! आणि ह्यात घाई-गडबडीत एखादी जरी step चुकली , तर पुन्हा कोलांट्या उडया आणि परत पन्ह्यापासून सुरुवात !
ह्या फोनमुळे आजकाल माझा हळू हळू पुनर्जन्मावर विश्वास बसू लागलाय ! कोणाला जन्मखूण असली की आपण म्हणतो ना, " हा तुझा पुनर्जन्म दिसतोय " वगैरे. तशीच ह्याची एक जन्मखूण आहे ! आणि ती पाहून मला वाटतं की हा मागच्या जन्मी एका विशिष्ठ गावाचा असावा ! ... तर , मी कोणाला तरी थॅंक्यू म्हणावं म्हणून टाईप करणं सुरु करते. मी T H A N K असं टाईप करते आणि सवयीप्रमाणे स्क्रीन वर बघते, तर तिथे त्याने लिहिलं असतं, 'ठणका' ! कारण , तो मराठी mode मध्ये असतो !!!!!
कोणाला thank you म्हणायला इतका त्रास ...???
Comments
Post a Comment