'दंत'कथा
अवतरण चिन्हांत घातलंय , म्हणजे ह्या नेहेमीच्या दंतकथा नाहीयेत. ह्या 'दंत' कथा आहेत. दातांची गोष्ट म्हंटली की, dentist कडे गेल्यावर काय काय झालं ह्याच्या गोष्टी आपण expect करतो. पण ह्या गोष्टी आहेत पहील्या दाताच्या ! पहीला दात आला, तो फक्त आपण सोडून , बाकी सगळ्यांनी पाहीला. त्याची पण ही गोष्ट नाही. पहीला दात पडला, त्याच्या ह्या गोष्टी आहेत.
माझा पहीला दात पडला, तो सगळ्यांपेक्षा वेगळ्या तऱ्हेनं ! सगळ्यांचा दात अचानक हलायला लागतो, मग जास्त हलतो, आणि एक दिवस पडतो. माझं तसं झालं नाही . तर , मी नेहेमीसारखी संध्याकाळी बागेत खेळायला गेले. आई आणि भावंडांबरोबर. पुण्याचा 'एरंडवणा पार्क '. मी जंगल जिम वर खेळत होते अन् काहीतरी झालं. मी पाय घसरून खालच्या बारवर ! उपजत survival instinct ने वरचा बार गच्च धरून ठेवला होता , पण मधल्या बारवर तोंड आपटलं. आणि दात बाहेर ! तो ओठात घुसून ओठ आणि तोंड रक्तबंबाळ. पहिली भीती वाटली की, आपण आता मरणार बहुतेक ! कारण, सिनेमात असंच दाखवतात ! मग दुसरी भीती की आता आई रागवेल ! तोंड दुखणं, आपलं दिसणं वगैरे राहीलं बाजूला. धावत आईला गाठलं. मग आणखी जोरात रडायला आलं . तो ओठ सुजला, दुखला, त्यानंतर घरी येतांना ice-cream वगैरे . पण दात पडायची जाम भीती बसली , आणि जंगल जिमची पण ! तो दात out of turn knock out झाल्यामुळे, नवीन दात यायलाही खूप महीने लागले. पण आला एकदाचा. तो वाकडा आला , ही वेगळीच कहाणी .
त्याउलट मुलाचा दात पडला , त्याची गोष्ट निराळीच ! एक दिवस शाळेतून घरी आल्यावर तो फारच खिन्न दिसत होता. "आई गं, मला आता सगळं मऊ मऊच खावं लागणार. पेरू वगैरे नाही आता ....आजोबांच्या सारखी मऊ कुस्करलेली पोळीच दे." "अरे, पण झालं काय ?" "काय होणारे ? माझे दात आत्ताच हलायला लागलेत. आणि मला आजीसारखे removable दात नकोयत ..." "अरे, असं नाही रे, तुझ्या एवढं झालं की सगळ्याच मुलांचे दात पडतात.." "पण माझ्या वर्गात कोणाचाच पडला नाहीये..." "का ? मी परवा पाहीला ना तुझा मित्र. त्याचा पडलाय की !" "तो असा नाही पडला, तो पलंगावरून पडला म्हणून." "अरे, तो थापा मारतोय. त्यालाही लाज वाटत असेल ...." असं मी म्हणतेय, तोच मला माझा अनुभव आठवला. आपली गोष्ट ही सगळ्यांना खोटीच वाटणार की काय !... असो, मग खूप समजावलं त्याला, पण तरी फारच वेळ लागला ! चार दिवस वरण पोळीचा लगदा खाल्ल्यावर, पाचव्या दिवशी गुपचूप नीट जेवायला लागला, आणि कर्मधर्मसंयोगाने पेरू खातांनाच समोरचा वरचा दात हातात आला ! ....
नुकतीच झालेली मजा म्हणजे नातीचा दात पडला. ती आपल्या दुसऱ्या आजी-आजोबांकडे निघाली असतांना, airport वर ! परत आल्यावर मला लगेच 'स्टोरी' ऐकायला मिळाली ! तिची सगळ्याची 'स्टोरी' असते. "काय झालं नं आजी, airport वर एकदम दात पडला माझा, आणि आजी, पॉपीनी( म्हणजे तिचा बाबा !) तो तिथल्या dustbin मध्ये टाकून दिला ..." तिची complaint चालली होती ...."मग तुला भीती वाटली का?" मी एक cue द्यायचा प्रयत्न केला ... खरी ,आतल्या गोटातली बातमी काढायला. "नाही, भीती कशाची ? आजी, माझ्या age च्या मुलांचे दात असे one by one पडतात आणि मग नवीन येतात. त्यांना permanent set म्हणतात ... " 'Information explosion' म्हणतात ते असं आहे ! तिला सर्व माहीत आहे दातांबद्दल आधीच ! "आजी, अगं , तू ते गाणं नाही ऐकलंस का , ' My two front teeth ...' ? किती cute गाणं आहे ते !" ....
"मग कुरकुर कशाची ?" मी ! "अगं, मला तो उशीखाली ठेवायचा होता, म्हणजे tooth fairy आली असती surprise gift घेऊन ! पण आता कशी येणार ?..." "आमच्या लहानपणी नं, आम्ही बागेत लपवून ठेवायचो, मग तिथे पैशाचे झाड तिथे येईल म्हणून ! ..." मी माझी गोष्ट सुरू केली. "How silly आजी, दात पेरला तर त्या झाडाला दातच येतील नां, पैसे कसे येणार ?" .... मी माझी गोष्ट एकदम आवरती घेतली आणि म्हटलं, "बरं, मग आता काय करायचं ?" "काही नाही, आता दुसरा दात पडेल, तेंव्हा second tooth fairy येईल नं, तिच्या करता मी एक letter आत्ताच लिहून ठेवलंय, "My dear second tooth fairy, please bring a school bag, lunch box, and water bottle for my Lola. She will be going to school soon. Thank you !"
... आत्ताच मुलाने फोनवर सांगितलं की तिचा दुसरा दात पडला ... आता मी विचार करत्येय की ह्या सगळ्या गोष्टी हिलाच खऱ्या खऱ्या हव्या आहेत का लोलासाठी खेळातल्या हव्या आहेत ... कारण माझ्या नकळत मी तिची tooth fairy झालेय ....!
Comments
Post a Comment