कारल्याचं बी
मला भुलाबाईची गाणी खूप म्हणजे खूपच आवडतात. म्हंटलं तर, अगदी ट ला ट, री ला री जोडलेली - यमकं जुळवत जुळवत चाललेली - मुलींची बडबड. म्हंटलं तर sugar coated pills. पण आत औषध आहे हे कळायला हवं. ते कळलं नाही, तर हे औषध लागू पडत नाही. तसं हे कारल्याच्या बी चं गाणं.
मी वय वर्षे- इयत्ता आठवी , तुकडी क - मध्ये असतांनाची गोष्ट ." आई , खेळायला जाऊ ? "
असं विचारलं , की ती म्हणायची , " आधी उद्याचा अभ्यास उरक , मग जा ". " बरं " अभ्यास उरकला की , उद्याचं दप्तर भरून ठेव ... मग उरलेली पुस्तकं जागेवर ठेव ... पेन्सिलीला टोक कर, तो कचरा भर ... केस नीट कर ...." " असं काय करतेस गं , कारल्याच्या बी सारखं ?" मला रडू यायला लागायचं . तिकडे सगळे मित्र - मैत्रिणी खेळात जुने झालेले असायचे . आई म्हणायची, " कारल्याचं बी नाही , मी तुला वळण लावतेय . पसारे घालून , ते तसेच टाकून , पळून जायचं नाही. तुझ्या मागे कोण येणार आहे ते आवरायला ? " " तूच लावलास अभ्यासाचा पसारा करायला ..." हे वाक्य मनातल्या मनात म्हणत , मी सगळं उचलून ठेवून पळायची .
जशी मोठी होत गेले , तसं हे गाणं आणखीनच जवळ यायला लागलं . आजी मला कणिक भिजवायला लावायची . ती भिजवून , गोळा करून तिला दाखवला , की ती म्हणायची , "अंहं , असं नाही . ती परात स्वच्छ झाली पाहीजे . कडेची सगळी कणिक नीट गोळा कर , हवं तर थोडं तेल घे. कोणी पाहीलं, तर परात धुऊन, त्यात कणकेचा गोळा ठेवलाय, असं वाटलं पाहीजे ". " कोण पहाणार आहे ? तूच नं." " मीच नाही , तू स्वतः पाहिलीस, तरी परात चक्कच दिसली पाहीजे तुला ... उठवळपणा करायचा नाही. एखादं काम हाती घेतलं, तर ते नीटच पूर्ण करायचं !" मग परात स्वच्छ करा , डबा जागेवर ठेवा , सांडलेली कणिक ( आधी सांडलीच कशी ?) झाडून घ्या, ...एका कामाला इतकी पिल्लं व्हायची की, त्यापेक्षा आधीच नीट करा ... कारल्याचं बी पेरायलाच नको, म्हणजे भाजी खाण्यापर्यंत जायलाच नको !! आजी जिंकत असायची !
कॉलेजमध्ये गेल्यावर मी आणखीनच बंड झाले . एक दिवस आईशी वाद घालतांना म्हंटलं, " कारल्याचं बी म्हणजे काय, तर दुसऱ्याला, त्याला हवं ते करू द्यायचं नाही. त्याच्या पायात खोडा घालायचा, त्यातल्या त्यात सुनेला, असंच नं ?" मी जाम रागावले होते. ती म्हणाली "त्यातल्या सुनेपेक्षा त्या कारल्याच्या बी वर concentrate करा. हाती घेतलेलं पूर्ण करा, हे तर आहेच. पण तू म्हणतेस, तसं दुसऱ्याला अडथळा करू नका. आपण कधी कधी, कारण नसतांना, कळत नकळत, उगीच टीका करतो, टोमणे मारतो. जुनं काहीतरी दरवेळी काढणं, लांबण लावणं, ह्या सगळ्या कारल्याच्या बियाच तर आहेत. 2 in 1 असं आहे हे ! जसं पहाल , तशी काहीतरी नवीन शिकवण मिळेल. "
हा एक नवीनच twist मिळाला ! मग मी ह्या शिकवण no. 2 चा विचार करायला लागले. कारण तोपर्यंत no. 1 ,पुष्कळसं अंगी बाणलं होतं. आता त्याचा घरातल्या सगळ्यांनाच त्रास होतो ... 'मागे लागते' म्हणून. तर आपण किती कारल्याच्या बिया पेरतो बरं रोज ! कळत नकळत. आणि खूप सापडल्या. पण कारलंच नं ते. त्याचा वेल छान मोठा होणार, सुंदर दिसणार, पण त्याला कारलीच येणार !
एकदा मी एक साडी आणली, आणि मैत्रिणीला दाखवली. ती एकदम कशालाच छान म्हणत नाही. मुद्दाम. तिचा तो स्वभावच आहे. पण एकदा मैत्रीण म्हटलं की काही गोष्टी पचवाव्या लागतातच नां ! तर साडी पाहून ती म्हणाली, "बरीच बरी आहे, पण रंग खूपच light आहे, आणि काठ जरा आंधळा आहे, अन् हे बुट्टे इतके विरळ कसे काय ?" किती कारल्याच्या बिया ! शेतच लावतेय की ही ! पण मी ही ठरवलं, की आपण बोलायचंच ! म्हंटलं, "म्हणजे तुला खूप भडक, gaudy, आणि खूप ornate designs आवडतात तर ! म्हणून तुला माझ्या साड्या आवडत नाहीत आणि मला तुझ्या !" हा हा हा ! मी तिच्या बिया उपटल्या की त्या दुप्पट केल्या कोण जाणे. आता आम्ही Love all वर आहोत !
सध्या WA च्या जमान्यात तर जग खूपच जवळ येतंय. चांगल्या बरोबर वाईट ही येणारच. काही लोकं कारल्याच्या बिया पेरणारच. पण कारलं औषधी आहे असं म्हणतात ! त्याने म्हणे डायबिटीस वर गुण येतो. खरं खोटं कारलंच जाणे. आपण हवं तर असं म्हणू, की जर काही कारणाने आपल्याला सगळं जग फारच 'गोड गोड' वाटायला लागलं, 'ग' ची बाधा झाली, तर ती कमी करायला आपले हितचिंतक कारल्याच्या बिया पेरत असतील. तसं सही ! आपलं काय ? आपण रक्तात भरपूर 'sugar' असणारे - खावी कारल्याची भाजी ! On second thought, लोकांना पेरू द्या हवं तेवढं कारल्याचं बी, त्याची भाजी खायची, का वेल उपटून टाकायचे, हे आपल्या हातात !!!
Comments
Post a Comment