Biological Warfare
काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. भाचा आणि फॅमिली पाहुणे आले होते. त्यांची चौथी-पाचवीतली चुणचुणीत मुलगी - माझी नात ! अर्थातच मावशीआजीची लाडकी ! ह्या वयाच्या मुली म्हणजे एक अजब रसायन असतं. शिंगं हळूहळू फुटत असतात, अन् नको ते 'ज्ञान' नको तितकं वाढत असतं. पण ते पचवायची अक्कल आलेली नसते ... मोठ्यांच्यासारखं वागणं - बोलणं ... पण काहीतरी गडबड होतेच !
तेव्हाच एक दिवस मैत्रिणीचा नातू शाळेच्या अभ्यासाच्या शंका विचारायला आला होता. मी त्याला सांगत असतांना ही जिन्यात बसून सगळं ऐकत होती. Chemistry सांगतांना आमचं laughing gas, chloroform वगैरे चालू होतं. जाताजाता nerve gasचा पण उल्लेख झाला. आपण काय शिकतो, त्याचा संबंध रोजच्या व्यवहारात, जीवनात, जगाच्या संदर्भात काय ते कळावं म्हणून मी काहीतरी सांगत होते.
ते शिकवतांना chemical, biological warfare असं मी म्हटलं. जिवाणूंचा - विषाणूंचा वापर करून युद्ध जिंकणं किंवा विजय मिळवणं .... थोडक्यात स्फोटक पदार्थ न वापरता, शत्रूला नामोहरण करणं वगैरे. त्यात अणुबॉम्ब धरायचा का नाही वगैरे प्रश्न - प्रतिप्रश्न येत होते, अन मी उत्तरं देत होते ...
पण माझी खरी विकेट घेतली, ती ह्या नातीने. तो मुलगा गेल्यावर मी चहा पीत बसले होते, तर ह्या बाईसाहेब आल्या ... "आजी, मला काही queries आहेत ..." "ऑ, काय queries गं ? बोल काय विचारायचंय ?" आजकालची मुलं questions विचारत नाहीत, त्यांना queries असतात ! भारी भारी, मोठे मोठे शब्द लीलया वापरतात !
"आजी, तू म्हणालीस की biological warfare ... म्हणजे germs, virus लोकांना देऊन त्यांच्यावर attack, की ते मरणार " ... "हो" ... " म्हणजे अमेरिकेतल्या original लोकांना small-pox वाली blankets दिली, मग ते मरून गेले तसं" ... "हो" ... " पण , मग ती देतांना, ह्या लोकांना कसा नाही झाला small-pox ?" ... "हो, खरंच ..." "म्हणजे मग ते पण मरून गेले असणार ..." "अरे बापरे " मी मनात म्हटलं. इथे विचारचक्रं फारच जोरात फिरताहेत आणि हे चक्रीवादळ आता कोणती दिशा घेणार ... कसं भरकटणार ... ह्याचा मला अजून काही अंदाज येत नव्हता ... !
"आजी, ... हे attacks चुपचाप पण होऊ शकतील ना ?" "हो, होऊ शकतील ... " " म्हणजे बघ, आपल्याला कोणीतरी आवडत नाहीये ... तर biological warfare करू शकतात ... " "अगं, असं नसतं. कोणी नुसतं आवडत नाहीये, म्हणून कोणी लढाया करत नाही ." "मग कधी करतात ?" ही माझ्यावर प्रश्नांनी attack करत होती ! "म्हणजे बघ आजी, आपल्याला न आवडणारे पदार्थ 'खा' असं म्हणणं म्हणजे biological warfare होऊ शकेल का ?" "छे छे, तसं काही नाही." मला एकूण चक्री वादळाची दिशा जरा जरा कळायला लागली ! दुपारी जेवतांना भाजी खाण्यावरून , खरं म्हणजे न-खाण्यावरून आईसाहेबांनी बराच दम भरला होता ! त्यामुळे सध्यातरी म्हणजे रात्री झोप येईपर्यंत तरी आई शत्रुपक्षातली ! "नाही नाही, म्हणजे मी माझ्या आईला काही म्हणत नाहीये, आजी, पण सकाळी तू नवलकोल आणलेस तेव्हा मोठा काका , धाकट्या काकाला तसं म्हणाला. "असं का ! बघतेच मी त्यांच्याकडे !" "बरं ते जाऊ दे गं, आजी, पण कारल्याची भाजी करणं म्हणजे तरी biological warfareच नं ... किती कडू कडू लागते, मला वाटतं की मी ते खाता खाता मरूनच जाईन ..." "नाही बाळा, भाजी खाऊन कोणी मरत नाही ..."
तिच्या queries चा भडीमार चालूच होता. "समजा आजी, वर्गात कोणाला चिकनपॉक्स झाला, आणि ते मूल शाळेत आलं, तर ते biological warfare होईल का ? " "नाही गं, उन्हाळ्याच्या सुरुवातीला अश्या साथी येतात, एकाला झालं की आपल्याला कळेपर्यंत दुसऱ्याला झालेलं असतं ..." "you mean epidemic ... मग त्याचं pandemic होतं ... म्हणजे आपल्या कोरोना सारखं ...?" "हो, तेच." "मग ते कोरोना होतं का गं biological warfare " "तसंच काही म्हणता येत नाही..." " म्हणजे नव्हतं ." "असं ही नाही, असेलही ..." "म्हणजे होतं का नव्हतं ? "... ही माझी अशी उलटतपासणी का घेतेय ? ती ह्या आंतरराष्ट्रीय वादात मला का ढकलतेय ? मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ... ही वकील होणार आहे का ? ... "ए बाई, मला जाऊ दे. आता संध्याकाळच्या स्वैपाकाचं बघते ..." "नाही आजी, हे सांग, म्हणजे biological warfare हे prove करता येत नाही ... आमच्या teacher नी सांगितलं !" "असेल, असेल... "... त्या teacher ला धरून जरा तिची कानउघडणी करायला हवी कोणीतरी ... "बरं बरं, जा पळ, आई बाहेर निघाली आहे, तू पण जरा हिंडून ये तिच्याबरोबर ... आणि हे सगळे मोठे मोठे शब्द डोक्यातून काढून टाक कशी ... अजून तू खूप लहान आहेस ... नसते किडे डोक्यात जाऊन बसतात ..." मी म्हटलं. " तेच ते आजी, नसते किडे नाही, हे biological warfare आता आमच्या वर्गात सुरु झालंय ... तुला सांगू ?... खरंच माझ्या डोक्यात किडा सोडला असला पाहिजे कुणीतरी ... I mean xxx नी !"...
"अहो मातोश्री, जरा बघा, ह्यांचं ज्ञान घोड्यापुढे धावतंय ." मी तिच्या आईला म्हटलं ! "ती खरंच बोलतेय, पण वेगळ्या अर्थानी, ... ह्या बाईंना कोणीतरी प्रसाद दिला आहे शाळेत ... मागच्या आठवड्यात डोक्यात दोन मावश्या निघाल्या .... biological warfare च....पण ते माझ्याशी ... वैताग आलाय नुसता ..." मी हतबुद्ध !.. आणि ही भामा biological warfare वर पलटवार कसा करावा ह्या विचारात ... !
Biological warfare पेक्षा mental warfare डोक्याला भीडतात
ReplyDeleteहो , खरं आहे , मुलांच्या प्रश्नांच्या सरबत्ती पुढे हात टेकावे लागतात ...
DeleteI LIKE QUERRIES OF SUCH KIDS. KHHOOOP MAZA YETE UTTR DYAYALA.
ReplyDelete