"हानीकारक ... "

 

    नुकतीच एका समारंभाला जाऊन आले. एक तरुण जोडपं त्यांच्या नवीन बिझनेसचा शुभारंभ करत होते . जरा उत्पटांग कल्पना होती , risks ही भरपूर होत्या . पण , अशाच तर नवीन , innovative कल्पना जगाला पुढे नेतात !! खाणं-पिणं, एकमेकांना शुभेच्छा देणं वगैरे सर्व उरकल्यावर घरी जायला निघालो, आणि समारंभाचे कर्ते-करविते आले आणि त्यांनी वाकून नमस्कार केला.   "अरे,  अरे,  हे काय ... " वगैरे झालं,  पण मनातून छान वाटत होतं ... एकतर नमस्कार केला म्हणून खूष ... आणि दुसरं म्हणजे मुलांना चांगलं वळण आहे हे पाहून आणखी खूष ! कशाचं छान वाटावं , हे बहुतेक वयावर अवलंबून असतं !   त्यांना आशीर्वादपर काहीतरी छान छान म्हणून तिथून निघालो ...पण , तो आशीर्वाद काही पटत नव्हता . लौकिकार्थाने तो अगदी बरोबर होता , पण , माझं मलाच काहीतरी खटकत होतं ... त्यात काहीतरी दुरुस्ती हवी होती ... "तुमच्या मनासारखं होऊ दे , का तुमच्या भल्याचं होऊ दे ?" ...काय म्हणावं ?

    घरी जाताना , त्या सर्व कार्यक्रमाचा विचार करता करता,  माझी गाडी आशीर्वादावर येऊन थबकली ... एका वेगळ्याच ट्रॅक वर गेली, आणि मग त्याला फाटे फुटत गेले.   एकातून दुसरा विचार ... माझे विचार , तो कार्यक्रम आणि मी दिलेला आशीर्वाद ... बादरायण संबंध जोडत गेले मी..   

    आपल्या आवडीची , आपल्याला करावीशी वाटते ती गोष्ट आणि आपल्यासाठी चांगली असते ती गोष्ट ...ह्याचा काही ताळमेळ असतोच असं नाही....!! मग तुमचं वय कितीही असो ..?

      लहानपणी अशा खूप गमतीशीर गोष्टी घडत असत.   माझं आणि ice-fruit चं नातं तसंच होतं.   ते लाल-केशरी ice-fruit बर्फाच्या डब्यातून काढलं की लगेच विरघळायला लागायचं , ते पटकन जिभेवर पकडायचं !   आणि ते खाऊन झालं की मग ८ दिवसांनी टेरामायसिनचं इंजेक्शन ... कारण ... हाताबाहेर गेलेला खोकला आणि ताप !   कैरी, बोरं, पेरूचं ही तेच ... लाल लाल तिखटमीठ लावून खाल्लं की परत तेच !   तेव्हा एक लक्षांत आलं की आपल्याला जे आवडतं त्याची भरपाई करायला लागते ...कडू औषधाने !  छान लागतं ते वाईट असतं,  आणि जे वाईट लागतं ,  नको असतं ,  ते तब्येतीला चांगलं असतं !....

    नंतर मुलांच्या लहानपणची एक गोष्ट आठवली .  दोघे उन्हाळ्याच्या सुट्टीत आंब्याचा रस - पोळी खात होते.   रसाशी पोळी खातांना count चुकतोच !   रसाचा आणि पोळीचाही !   धाकटा डब्यातून आणखी एक पोळी आणि रस घेतो आहे हे दिसल्यावर मोठा त्याला म्हणाला, ... "आता पुरे ..."  हा स्वतः वेडं वेडं करायचाच, पण गंभीर चेहेऱ्याने धाकट्याला सल्ला देणार !   "इतकं घेऊ नको, तब्येतीला 'हानीकारक' असेल ..."     "काय हानीकारक ?   पोळी का रस ?"  धाकटा म्हणाला.   मी ऐकत होते, जवळच बसून, पुस्तक वाचल्याचं नाटक करत !   'हानीकारक'  हा शब्द ... TV ची देन !   त्यांच्याही मते आपल्यालाआवडणारी गोष्ट वाईट -नव्हे- हानीकारक असतेच .   म्हणजे  TV च प्रस्थ जरा वाढतंय,  ते control करायला हवंय !   ...मी स्वतःचंच रिपोर्ट कार्ड नेहेमी तपासत असते ! ...  "दोन्ही" ... मोठा म्हणाला .   "का ?   आईच सारखी 'अजून पोळी खा, अजून अर्धी तरी घे'  करत असते ".... "ते भाजीबरोबर ...  आणि ...आंब्याचा रस हानीकारक असू शकतो. "...    "का ?   छान  तर लागतोय ..."... "छान लागतोय, म्हणजेच हानीकारक असणार !"   मोठा म्हणाला . 

    मला धक्काच बसला !   याचे विचार ... असे का होताहेत ?  मी फार कठोर आई आहे का ... का भोवतालच्या वातावरणाचा परिणाम ?   पण तो म्हणतोय ते खोटं नाहीये ... आपण control ठेवतो सगळ्यावर, ते त्यांना त्रास होऊ नये म्हणून,  तब्येतीला वगैरे ... पण त्याचा परिणाम हा ?    त्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे नक्कीच हानीकारक असणार ... असा समज नको व्हायला ... निदान इतक्या लहानपणी तरी ... !

    आणि उलटं ही खरं असणार, म्हणजे न आवडणारी गोष्टच तब्येतीला चांगली असणार.   पण असं कसं ,  की वाईट गोष्टच आपल्याला आवडते.   माझ्या बाबतीत हे फारच खरं होतं.   मला रात्री उशीरा झोपायला आणि सकाळी उशीरा उठायला आवडायचं ... अजून ही आवडतं ...  आणि ते नेमकं सकाळच्या शाळेला हानीकारक    मला उनाडक्या करायला आवडायचं, ते परीक्षेला हानीकारक .!....  कसं बसं manage करत इथपर्यंत मजल मारली,  अनेक नावडत्या गोष्टी करत ... अगदी minimum आवडत्या गोष्टी राहील्या, पण आता त्यावरही गदा येते आहे ... कारण ... वय !

    सगळी कामं ... आयुष्यातली आणि रोजचीही ... उरकली की निवांतपणे बसून चार घास खाऊ म्हटलं, तर ते जमत नाही !  तूपसाखर पोळी हे माझं comfort food ... तेच खाऊ म्हटलं तर आता साखर तब्येतीला हानीकारक ... कारण , आपलं तेच ...या वयात मागे लागणारं  !   बरं  OK , दही भात खाऊ, त्यावर जरा साय-बीय घेऊ , किंवा सोबत जरा पापड, सांडगे घेऊ म्हटलं तर ... तेल-तूप तब्येतीला चांगलं नाही ... तो एक वाईट पदार्थ आहे, जो रक्त वाहीन्यांत traffic jam करतो ... त्याचं नांवसुध्दा नको !   मग  लोणचं वगैरे ?... छे छे ... त्यात खूप मीठ असतं ... तेही आपल्याला हानीकारक . कारण , तेच high BP !   मग काय हवा खाऊ का ?   नको,  ती तर फारच अशुध्द असते ... मरा मग ! ... असं मी मनात म्हणते ... मोठ्यांदा नाही ... कारण , सांगणारं कोणीतरी आपलंच असतं !  ते माणूस  आवडतं ... पण त्यांचा सल्ला dump करणं ... हानीकारक ! एकूण काय , तर 'आवडत्या' आणि ' तब्येतीला चांगल्या' गोष्टींचा मेळ घालणं कठीण ....

    तर , हे सगळं सांगायचा मतलब ... हा विचार आला कसा मनात ?   तर त्यांना आशीर्वाद देतांना, मनात खूप विचारांची गर्दी झाली होती ... !   त्यांना काय आशीर्वाद देऊ ... तुमच्या सगळ्या इच्छा - plans सफल होवोत का तुमच्या भल्याचं असेल ते होवो ?... आपल्या आयुष्यभराच्या अनुभवातून वाटत होतं की ह्या दोन गोष्टी mutually exclusive आहेत !!! ... पण आवडत्या गोष्टींनी भलं होणं म्हणजे दुधात साखर ... rather बासुंदीच !   मग त्यात सगळं आलं,  दूध, साखर, आणि साय, खवा -fat ... काय हवं ते म्हणा ... शिवाय केशर,वेलदोडा ... etc etc ... !   

  आजकाल 'शतायुषी' व्हा म्हटलं की लगेच म्हणतात, "नको रे बाबा इतकं आयुष्य ... कोण करणार आपलं ? "  सगळा विचार करता, आपण म्हणावं, "सुखी रहा, आनंदात रहा ..." आणि काय हवं ते करा ... after all , तुमचा choice आहे ... !!!    काय आवडतं ते, आणि काय आवडून घ्यायचं ते ... !  'हानीकारक ' म्हणाल तर .. पुन्हा तेच !!!...





Comments


  1. Very nice and very aptly put.

    ReplyDelete
    Replies
    1. मला आई कायम म्हणत असे, तुझ्या मनासारखं नाही तर तुझ्याकरिता जे उत्तम आहे, ते घडो......

      Delete
    2. हो , अगदी तसंच !! आपल्या पिढीला हाच आशीर्वाद असायचा !!!आता त्याची किंमत कळते !!

      Delete
  2. खरय ! पण जे आवडतं ते हानीकारक ? नक्कीच असणार !

    ReplyDelete
    Replies
    1. असंच वाटतं तरी !! .. धन्यवाद !! वाचल्याबद्दल !!! 😊👍

      Delete
  3. अलका,तुझं गप्पा मारल्यासारखं सरळ,सोपं,प्रांजळ लेखन खूप आवडतं..(आवडलं म्हणजे हानिकारक नाही हं )...हानिकारक शब्द आवडला !

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you , संजू ! मनात येतं , ते लिहून मोकळी होते ! तुम्ही वाचलंत , की छान वाटतं !! हानिकारक , किटाणू , वगैरे TV वरचे शब्द ... वैताग येतो त्यांचा !!!☺️

      Delete
    2. अलका छान
      - अनिकेत जोशी

      Delete
    3. धन्यवाद , विनू !

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland