No trick ... only treat !
नुकतीच एका सुंदर कार्यक्रमाला जाऊन आले. गाण्याचा - नाटकाचा नाही ... तर एक समारंभ ... घरातलाच ... एका बाळाच्या बोरनहाणाचा ! त्याला विदर्भात वगैरे, 'लूट' ही म्हणतात ! काय मस्त idea ! खाऊची लूट, खरं म्हणजे लयलूट, आणि लुटालूट ही !
बाळाची लूट चालू होती ! ते बाळ जरासं भेदरलेलं ... इतकी माणसं आजूबाजूला ... आई दूर कुठेतरी ... आणि अचानक डोक्यावर काहीतरी पडतंय ... पाणी नाहीये ... काहीतरी रंगीत रंगीत !! पण , खरी मजा मात्र बाकीच्या छोट्या मुलांना येत होती ! बाळाच्या डोक्यावरून बोरं , चुरमुरे , श्रीखंडाच्या गोळ्या , बिस्किटं , शोपेच्या गोळ्या ....दरवेळी नवीन खाऊ ! हे वेचू का ते वेचू . ..सगळ्यांच्या साड्यांचे घोळ ...त्यातून वाट काढत , खाऊ उचलायचा ...नुसती धांदल !!! काही ढालगज भवान्या तर परकराच्या ओच्यात खाऊ गोळा करत होत्या . मुलग्यांच्या चेहेऱ्यावर inadequacy चं feeling ...पॅन्टला दोनच खिसे !....त्या बाळाच्या डोक्यावर मूठभर खाऊ घालण्याच्या ऐवजी , मी ह्या मुलांचाच आनंद मनात गोळा करत बसले ...100% मुलांचा सण आणि अगदी सुयोग्य खाऊ ...चन्यामन्या बोरं , पेवंदी बोरं , वाटाणे , गोळ्या - बिस्किटं ...माकडमेवा .....
किती छान छान प्रथा आहेत आपल्याकडे !! मोठ्या माणसांच्या सणांबरोबर हे मुलांचे सण . गणपती असले, की मुलांना जरा तरी खेळता , मजा करता येते , सगळ्यात भाग घेता येतो . नाहीतर , एरवी घरात काही पूजा अर्चा असली , की मुलांवर दडपशाहीच असते ...इथे हात लावू नको..., तिकडे जाऊ नको..., समई जवळ गेलात तर पहा .....वगैरे दमदाटी . आणि कधी नाही, ते आजीच रागवण्यात आघाडीवर ......!
गोकुळाष्टमीला मात्र मजा असते . लोणी , दही हंडी आणि मग हातावर किंवा वाटीत गोपाळकाला ! आजकाल , दही हंडी चं विकृत स्वरूप पहाता , हा सण कोणे एके काळी मुलांचा सण होता , हे खरं वाटत नाही . घरोघरी आपल्या बाळाला कृष्णासारखं नाहीतर एवढीशी चनिया चोळी घालून राधेसारखं नटवण्यात आया- बाया धन्यता मानतात ! माझ्या एका मैत्रिणीने आपल्या नातीला एकदा राधा आणि मग कृष्ण करून आपली हौस भागवून घेतली !!
विदर्भात बैल पोळ्याच्या वेळी ही असा एक दिवस बच्चे कंपनी करता राखून ठेवलेला असतो . तान्हा पोळा ! त्याची तयारी दोन तीन दिवस आधीच सुरू होते .एका छोट्याशा फळीवर मातीने सारवून , मग मऊ बारीक , चाळलेली माती भिजवायची , आणि त्या गोळ्याला फळीवर बैलाचा आकार द्यायचा . मोठी शिंगं बिंगं , शेपटीचा गोंडा ! बैल तयार झाला , की तो चुलीजवळ वाळायला ठेवायचा ! आणि मग , त्याला गेरू , खडूचं गंध , हळदकुंकू , पानाफुलांच्या माळा , एखादी जुनी, पण मण्यांची माळ ...अशी सजावट करून , मग जायचं शेजारी पाजारी ! त्यातही hi-tech म्हणजे फळीला चाकं ! माझा एक लाकडी बैल होता आणि त्याच्या फळीला चाकं , ओढायला लाल रंगाची दोरी ! कुणाहीकडे ही मुलांची फौज गेली , की सगळ्यांचं स्वागत ! चटई वर बसून , मग खाऊ मिळायचा ..गूळ , दाणे , चिक्की , रेवड्या ! मृच्छकटिक सिनेमात ती सुंदर वसंतसेना चारुदत्ताच्या मुलाची मातीची बैलगाडी आपल्या दागिन्यांनी सजवून देते , हे पहातांना , मला ते लहानपणीचं सगळं आठवलं ! ओहो , म्हणजे तो तान्हा पोळा इतक्या जुन्या काळापासून चालत आला आहे तर !!!!...
...मंगळागौर , नवरात्र या सणांना मुलींना रोल असतो , थोडाफार . टिपऱ्या , कुमारी पूजन . दिवाळीत तर मुलांचा किल्ला ! तो एक वेगळा विषय होईल लिहायला . त्याच्या बद्दल नंतर कधीतरी सविस्तर !!! पण मुलींचा हक्काचा सण म्हणजे , भुलाबाई - हादगा - भोंडला ! कितीही लिहिलं तरी थोडंच ...! त्या खिरापती , गुलबाक्षीचे हार ..., पण सगळ्यात high point म्हणजे या सगळ्यातून मुलगे हद्दपार .....त्याचा फार असुरी आनंद व्हायचा आम्हाला तेव्हा ! शाळेत एक दिवस , शेवटच्या तासाला भोंडला . तेव्हा , मुलग्यांना वर्गात बसून पाढे लिहायला लागायचे !!! खिरापत खातांना , कधी कधी मित्रांची आठवण यायची ..मग स्कर्ट च्या खिशात त्यांच्या करता थोडे चुरमुरे ठेवायचे आणि एखादा बत्तासा . शाळा सुटल्यावर , घरी जातांना त्याची वाटावाटी . त्यांच्यावर ते कर्ज , ते केव्हातरी वसूल करायचं ..." अर्ध्या रस्त्यापर्यंत माझं दप्तर उचलून ने "..... , किंवा , " संध्याकाळी खेळतांना मला आऊट करायचं नाही " !!!...
मग यायचा संक्रांतीचा सण ! त्यावेळी आई बरोबर जायचं लुटीला , त्याचं ही मैत्रिणींबरोबर match fixing .... सगळी बोरं तू पळवायची नाहीत ....थोडी बोरं मला ठेवायची ...मला चार चॉकलेट मिळाली , तर तुला दोन देईन ....!! मी फार उनाड असली पाहीजे तेव्हा !! ...परकर पोलकं , माळा , बांगड्या , गजरे सगळं घालायचं . थोड्या वेळाने कंटाळा आला की , परकराचा काचा मारून खेळायला पसार ... ऐन समारंभाच्या वेळी , वेण्या उस्कटलेल्या , गजऱ्याने मान टाकलेली आणि हातपाय धुळीने माखलेले , पण मी मजेत ! आता , नातीचा अवतार ही असाच असतो ! मला तिच्यात माझं लहानपण दिसतं ...!!
....झक मारत गेले ते halloween आणि त्यांचे ते भयाण , भेसूर मुखवटे ....आपलं , मोरपिसाचा मुगुट आणि मखमलीचं झबलं घालून रांगणारं , लोणी साखर खाणारं बाळच किती गोजिरवाणं दिसतं !! ...
......हेच खरे मुलांचे सण !!!...
Comments
Post a Comment