old wine ...


    
    नुकतीच एक फॅमिली  ट्रिप करून आलो - २ दिवसांची !     त्यात खूप गमती-जमती  अनुभवल्या  ... zoo, पॅलेस वगैरे बघता-बघता नातवंडांशी गप्पा खेळणं आणि बरंच काही ... त्यांच्या मनांत... आणि  आपल्याही ... डोकावणं ! 
        आम्ही निघालो, एका टेम्पो ट्रॅव्हलर मधून ... नातवंडांनी ठरवल्याप्रमाणे सगळ्यात मागच्या सीटवर ती दोघं आणि मी ... प्रवास सुरु झाल्यावर १० मिनिटांतच त्यांना कंटाळा आला आणि मग खेळ सुरू झाले.   मराठी इंग्रजी शब्दांच्या भेंड्या,  समानार्थी-विरुद्धार्थी  शब्दांच्या भेंड्या,  फळ फूल नाव गांव ... सगळं झाल्यावर मी जरा पेंगायला लागले ... म्हटल्यावर नातीनी सांगितलं, ''आजी मी एक clappingचा game शिकवते.   आपण बसून पण खेळू शकतो.''   आणि आम्ही खेळायला लागलो.  'एव्होकॅडो  एव्होकॅडो ... ' आणि  टाळ्या - नव्हे - झिम्मा !   फक्त एकमेकींना द्यायच्या टाळ्यांचा क्रम वेगळा !   मला आठवलं, आम्ही 'झिम पोरी झिम' म्हणायचो, नाहीतर 'सरसर गोविंदा येतो' ... माझी बहीण माझ्याहून बरीच लहान ... ती 'बुटी-बुटी-भाजीची बुटी '... असा झिम्मा खेळायची.   मुलांच्या वेळचं माहीत नाही, कारण घरी मुलींना जसा काही मज्जाव ! ... नंतर, म्हणजे बरेच नंतर हा शिरस्ता बदलला !   आणि आता नात 'एव्होकॅडो  एव्होकॅडो ' असा झिम्मा खेळते, पण झिम्माच !  " एव्होकॅडो  म्हणजे एक fruit असतं गं, अगदी bore लागतं ... गोड नाही, आंबट नाही, तिखट नाही, खारट नाही,  तुरट नाही ... कडू पण नाही  ! "...  मग ते कशाला ?   तर ते चांगलं rhyme होतं टाळ्यांबरोबर !   जुनाच खेळ फक्त गाणं बदललं ... ...old wine in new bottle !

    विचार करता करता अशा बऱ्याच old wines सापडल्या, अगदी wine cellar च सापडलं आणि मस्तच !   त्याच ट्रिप मधे  नातवंडं आणि आम्ही दोघं  ... जरा दमलो,  म्हणून एका देवळाच्या पायरीवर सावलीत बसलो होतो.   तिथे सगळीकडे आवारात शहाबादी फरश्या - स्वच्छ आणि छान !   नात लगेच ...''आजी, चल आपण hop-scotch खेळू'' ... ''म्हणजे काय गं ''.... ''म्हणजे बघ हं ,   असा एक चौकोन, मग हे दोन पुढचे, त्यात लंगडी घालायची, उडी मार पाहिजे तर तू,  नाहीतर नुसती चाल ... पण खेळ माझ्याशी...   आणि थांब जरा "... असं म्हणून तिनं खिशातून एक कार्डबोर्डचा तुकडा काढला,  "आजी, आता कार्डबोर्डच घेऊ, कारण इथे pebble सापडणार नाही नां ...'    आणि खेळ सुरु !    ''अगं, हा तर मी पण लहानपणी खेळले ... आम्ही त्याला टिक्करबिल्ला म्हणायचो.  कोणी टिक्कर, कोणी टिकरी  ... "!!!

    अजून एक मजा आठवली ह्या 'pebble' वरून !   काही दिवसांपूर्वी मैत्रिणीकडे गेले होते.  तिच्या सुनेने स्वागत वगैरे केलं, म्हणाली, ''मावशी, या, बसा, ... एक गोष्ट जरा ऑर्डर करतेय ... तेवढं transaction पूर्ण करते. '' ... तेवढ्यात मैत्रीण आणि नात, दोघी बाहेर आल्या ... नात रुसलेली, आणि माझी मैत्रीण पण ..., ''अगं , काय सांगू तुला ... ही आजकालची मुलं ... काहीतरी करत असतात ... ''  मग कळलं की नातीचा वाढदिवस पुढच्या आठवड्यात आहे ,म्हणून पार्टीला येणाऱ्या मुलांसाठी goody-bag चं आयोजन चाललं  होतं ... त्यात मुलींच्या बॅगमधे तिला fancy रंगीत पॉलिशवाला असा pebble द्यायचा होता, हेच hop scotch खेळायला ... '' अगं, दगड-टिक्कर, तो goody-bag मधे ?'' ... ''मावशी आजी, it is very yo game, आजी त्यात खूप types येतात ... paint केलेले, glitter लावलेले , काही marble चे तर काही granite चे , ... आई तेच ऑर्डर करतेय''...    ''आणि म्हणून मी रागावले आहे , एक दगड, नाहीतर विटकरीचा तुकडा ...त्या goody bag मध्ये , आणि तो ऑर्डर करायचा ?.... '', मैत्रीण म्हणाली !   ''करा बाई ऑर्डर, काहीही करा ...उद्या कोणी सागरगोटे-बिट्ट्या ऑर्डर केल्या, तर नवल नाही ! "...  पुन्हा old wine च.. ! पण , नंतर पाहीलं केव्हातरी ... ती टिक्कर छान चौकोनी , लाखेची, एक इंच × एक इंच ..! गुलाबी रंग आणि त्यावर टिकल्या, आरसे,  आणि पोतीचे मणी लावलेले ... आपल्याला पण अशी एक असावी , असं वाटलं !!!!

    Goody-bag ! ही पण दुसरी एक old wine च !   हिच्यात पेन्सिल-रबर पासून ते पार jewellery पर्यंत, any thing and everything !    आपल्याकडे संक्रांतीला, मंगळागौरीला वगैरे, आईला, मैत्रिणींना  शेजारणी आणि पाहुण्या बायकांना पण अशीच goody-bag मिळायची नां !    हळद-कुंकू, बांगड्या, गळ्यातलं-ओवलेली,पटवलेली काळी पोत, जोडवी,  संक्रांतीला एखादी वस्तू, फुलं किंवा गजरा, अत्तराची कुपी, काजळाची डबी, खण , नारळ , साडीचोळी, आणि खाऊ !  सगळ्या छान छान गोष्टी ! आपण त्याला वाण नाहीतर लाड-बुट्टी किंवा मायेची दुरडी म्हणायचो ... !   आणि आता साता समुद्रा पलीकडची ही goody-bag !    आपल्या गावाकडच्या बुट्टीला विसरली ... का साध्या-भोळ्या दुरडीचं stylish - शहरी रूप !   

    एकदा काहीतरी सणाच्या का मुलाच्या लग्नानिमित्ताने आहेरात घालायला मी एकदम खूप टिकल्यांची पाकीटं आणली.   तर त्या दुकानदारानी मला एक छोटासा pouch दिला. फ्री गिफ्ट !  त्यात ५-६ रंगांच्या कोरड्या कुंकवांच्या डब्या, एक मेण -cum - vaseline ची डबी आणि  छोटे-छोटे ५-६  छाप !   ते vaseline कपाळावर लावायचं अन् त्यावर हवा तो छाप कोरड्या रंगीत पावडरीत बुडवून लावायचा !   की सुंदर डिझाईन तयार ... !    ते पाहून आठवलं, की माझ्या आजीकडे तर हे पण होतं !  फणी-करंड्याच्या डब्यात,  एका डबीत मेण, एका डबीत पिंजर आणि हे छाप, त्याला ती 'नाम' म्हणायची   ... फुलं, पानं , कोयरी , द्राक्षाचं पान ... काय काय designs !   आता तश्या टिकल्या मिळतात ... अगदी नागोबा, विंचू, मोर, octopus, मासे, फुलपाखरं ... काहीही ... नामाचं modern रूप !!

    सगळ्यात मजा आली, एकदा मुलांनी जेवायला बाहेर नेलं असतांना ... jasmine rice आणि thai curry ... !    खातांना सारखं वाटत होतं की मी हे कुठेतरी खाल्लं आहे ....  मग दुसऱ्या दिवशी tube लागली ... खूप खूप वर्षांपूर्वी एकदा,  कोकणातली एक आजी पाहुणी आली होती, तेव्हा तिने खूप वेगवेगळे पदार्थ केले होते ... भाज्या !  नारळाच्या दुधातली अंबा, फणस आणि अननसाची भाजी - अनसा फनसा !!...  दुसरी एक, नारळाच्या दुधात फुलकोबी, बटाटा, वाटाणे आणि काजू घालून केलेली भाजी - फुलसूप ... ! आणि त्यात आलं, लवंग वगैरे मसाले नि थोडासा टोमॅटो ही !   आणि , शेवग्याच्या शेंगांची नारळाच्या दुधातली कढी !!!! ..…त्यामुळे , ही thai curry , माझ्या दृष्टीनी आधी माहीत असलेली - म्हणजे जुनीच  भाजी !

    ...आता मी ही साठी केव्हाच पार झालेली ... कधी कधी मुलं मागे लागतात, ..."घरात काय बसतेस, आपण बाहेर जाऊया "...  वेणी घालायचा कंटाळा आलेला असतो ... मग, पटकन  एक बुचडा बांधून, साडी-बिडी नेसायच्या ऐवजी एक कुडता-टॉप आणि ऐसपैस palazzo  घालून जाते त्यांच्या बरोबर ... मॉलला ... अगदी 'yo' ड्रेस !       
      
      .....तशी आहे आणखी ही एक म्हण ... , पण ती जाऊ द्या !!!....  पण, कधी कधी new bottles ही मस्त असतात हं  !  आपल्याला आवडतात बुवा !!!...आणि, old wines ???.....प्रश्नच नाही !!!!!.....


- सौ. अलका कुंटे,  बंगलोर
   +९१ ८७६२३ १६३८५






    

Comments

  1. Dont tell the youngers that you had all types of O.W. and were happy to enjoy it.........yashodhar

    ReplyDelete
  2. Thank you , Yashodhar !! 😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland