पाकसिद्धी - ४

 

    सध्या मी खूप बिझी आहे.  धाकटा मुलगा - सून भारतात आले आहेत, घरी रहात आहेत.   आणि त्यांच्या न केलेल्या फर्माइशी - त्यांच्या आवडीचे पदार्थ  करण्याचा मी चंग बांधला आहे.   गेल्या काही वर्षांत, त्यांना काय आवडतं हे मी खरंच विसरले आहे.  दोन्ही मुलांच्या आवडी-निवडी दोन टोकांच्या.   त्यामुळे ती लहान असतांना, स्वैपाक करतांना काही standard मेनू होते.   ही भाजी केली की ती  कोशिंबीर ... प्रत्येकाच्या आवडीचा एक पदार्थ !   आता ते आठवत बसते.   मागे आपण म्हणायचो, 'साधूसंत येती घरा, तोची दिवाळी-दसरा ...'   आता मी म्हणते ' मुलं बाळं येता घरा, तेच सण साजरे करा ..'. आषाढ असो नाहीतर मार्गशीर्ष - काही फरक पडत नाही.   त्यांच्या आवडीचे जमतील ते पदार्थ करायचे !   मोठा मुलगा आणि त्याचे कुटुंब weekend ला आले की असंच होतं ... मग तो म्हणतो, "आम्ही दुष्काळातून आल्यासारखं तू करते आहेस ... किती पदार्थ करतेस ... "     "अरे, तुम्ही तरुण मुलं ... खा नां जरा पोटभर , आवडीचं ... "

    माझ्या लहानपणी सुट्टीला, सणाला आजीकडे गेलो की तिची अशीच धावपळ असायची, एकीकडे नेहमीचा स्वैपाक आणि सुट्ट्या म्हणजे दिवाळीतच, त्यामुळे फराळाचे पदार्थ, आणि वर आम्ही आलो म्हणून ती केक-बिस्किटं करायची.   परातीच्या वर खाली निखारे ठेव, गॅसवर ठेवता येईल असा ओव्हन आण - असं तिचं चालायचं !   तेव्हा आईच्या स्वैपाकघरात इडली-ढोकळा ह्यात mastery मिळवण्यासाठी trials  चालायच्या आणि errors तर व्हायचेच !!   पण error म्हटलं की  ... उगाच कशाला तोफेच्या तोंडी आपलं डोकं ??    आपण गप्पच बसावं  !!!    तेव्हा आमच्या घरी बायकांची आवडती मासिकं अजिबात नसायची, पण त्यांचे अन्नपूर्णा विशेषांक किंवा पेपरातल्या , रविवारच्या पुरवणीतल्या पदार्थांची कात्रणं असायची.   नंतर युग आलं ते TV वरचे खवैय्या shows.   तो आपला काळ ... त्या प्रशांत दामल्यांनी बशीत सजवलेल्या पदार्थाचा चमचा तोंडात घातला की त्यांचं 'अहाहा' यायच्या आत, मी TV बंद करायची - not feasible  ... !    विषय संपला !    पण तेव्हा घरी गोबी मांचुरियन, फ्रिजमधलं  ice-cream, spring rolls वगैरे पदार्थ करायचा घाट घातलेला असे.   मग end product तुम्ही कोबीची भाजी म्हणून खा, का   milk-shake म्हणून ते ice-cream प्या ...   मी त्याचा विशेष शोक करत बसत नसे !

    त्या काळात माझी भिशी जोरात होती.  आम्ही २२जणी होतो.  घरी सिनियर मंडळींच्या वेळा, उपास-तापास, आवडी-निवडी संभाळून, मुलांचे डबे वगैरे उरकून, दुपारी १ वाजता मैत्रिणी यायच्या आत २२जणींचा स्वैपाक उरकायची धमक होती नि हौसही होती !   त्या निमित्ताने नवीन पदार्थ try करणे, ते भिशीला करणे, वेगवेगळे मेनू ठरवणे, आणि वेळेत पूर्ण करणे, तेही बाहेरच्या मदतीशिवाय !   कारण outsourcing शक्य नव्हतं ... खरं म्हणजे नव्हतंच  !   पण सगळं जमत होतं !   त्या भिशीमुळे स्वैपाक करायची भीती गेली, अंदाज चुकत-माकत करायचं.   कधी कमी नाही पडलं, मात्र कधी कधी दोनतीन दिवस आपली चालली आहे भाजी किंवा तत्सम काहीतरी !   त्याला आम्ही 'पार्टीची मज्जा' म्हणायचो !   आज इतका स्वैपाक करून घ्या, की उद्या- परवा स्वयंपाकाला सुट्टी ... !   मज्जा नाहीतर काय ??

    आता आजकाल , नातवंडांसाठी काय करायचं हा प्रश्न असतो, पण ती तशी लहान असल्यामुळे त्यांना अजून तरी 'बनवता' येतं !   एकदा त्यांच्यासाठी छोट्या छोट्या वाट्यांत लोणी-साखर काढून ठेवलं.   विसरभोळेपणामुळे त्या वाट्या गॅसजवळ राहिल्या ... साखर लोण्यात विरघळली ... आता काय करावं , असा विचार करतेय, तोवर नात आली आणि ते चाटून पाहिलं ... "आजी, हे मॅजिक तूप दिसतंय, गोड गोड लागतंय ! "     "हो ? ... I  mean... हो sss मीच केलंय ते ... मॅजिक तूप ... idea मस्त आहे नां (?!!) "    त्यामुळे आता invention ही grandmother ची पण necessity झाली आहे !     "आजी, असा पदार्थ कर की जो मी कधी पाहिला नाही की खाल्ला नाहीये.  तो मला खायचाय ... "     अरे देवा, असलं challenge ?    शेवयाच्या खिरीत रसगुल्ला घालू, का गाजर हलव्यात ब्रेड तळून घालू ... ?   पण मला हे असले hybrid पदार्थ आवडत नाहीत.   नाही, म्हणजे छान लागत असतीलही , पण ते आपापल्या पानात करून घ्या ... आपल्या स्वतःपुरते ... इतरांना का शिक्षा ?

    तो विषय तेव्हा तसाच अधांतरी राहिला आहे ...म्हणजे,  होता ... पण मजाच झाली ... त्या दिवशी आम्ही सर्वजण म्हैसूरची ट्रिप करून आलो होतो.   नातवंडांना zoo, राजवाडा पहायचा होता... राजा सिंहासनावर बसला असेल , मुगुट घालून...! अशा स्वप्न कल्पना ! ते नाही झालं , पण बाकी झालं पाहून !! ...  मस्तपैकी ट्रिप करून आलो.   नातवाला आधी ऊन लागलं, मग गाडी लागली ... सगळं साग्रसंगीत - म्हणजे ट्रिप successful करून, दमून भागून घरी आलो ... आता आमच्याच घरी आल्यावर रात्रीच्या जेवणाची जबाबदारी माझीच ... 'पटकन खिचडी करते' म्हटल्यावर मुलगा म्हणाला, "कशाला ?  नुसता भात कर, खाऊन झोपून जाऊ ..."    " ok, मला काय ?" असं म्हणत मी भात तर लावला, आणि एकदम एक आयडिया सुचली ... ती करून सगळ्यांना वाढलं ...  "आजी, हे काय आहे  असं मी कधीच खाल्लं नाहीये "     "अगं, हा खुदखुद्या भात आहे ... खूप मस्त लागतो, comfort food आहे हे ... बघ, केला का नाही, तू कधीच न खाल्लेला पदार्थ ... !!"     "हो आजी, तो भात नं  मगाशी गॅसवर खुद खुद  असा आवाज करत होता ... मग तू ढवळलंस  नं ... " भाबडी नात !!  आणि ,   मी माझ्यावरच खूष  !!!...

    असो, आता मला ही स्वैपाक, म्हणजे रोजचा स्वैपाक करायचा खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच कंटाळा येतो.   तेच तेच भात वरण भाजी पोळी ... मुलं त्याला 'BVBP' म्हणायची, सकाळ संध्याकाळ आपलं तेच !    आता कधी कधी वाटतं, एवढी वर्षं पाकसिद्धीत घालवल्यावर, आता जरा सुट्टी मिळावी ... निदान ती ऐच्छिक असावी ... नाहीतर, सरळ संन्यास घेईन हं ... म्हणजे , निदान पाकसंन्यास  तरी ... ???



- सौ अलका कुंटे, बंगलोर 

   +९१ ८७६२३ १६३८५

Comments

  1. तु पाक कलेतील सिद्ध हस्त गृहीणी आहेसच.पणखरी कसरत असते ती नातवंडांना किचनमध्ये खुश करायची.एखाद वेगळं आढळलं किंवा गडबड झालेली रेसिपी आढळली तर भंडावून सोडतात शंका कुशंका प्रश्नांचा भडिमार करून आणि सोल्यूशन पण तेच देतात आजी साठी ती दुधावरची साय असते ना! जसं तु लिहील्यप्रमाणे मॅजिक तुप .हे ही तितकेच खरे आहे की तो सगळा कालावधी मुलांना नातवंडांना काय काय खायला घालू आणि नको असं होतं.आणि याचं प्लॅनिंग आजी आजोबांना ते येणार हे कळल्याबरोबर सुरू होते.भलीमोठी लीस्ट आजोबांच्या हातात सोपविण्यात येते आणि मग सुरू होते किचन मॅरेथॉन ते सर्व पाखरे परतें पर्यंत आणि नंतर च जीवघेणं एकटेपण आणि लग्नं पार पडल्यानंतर जसा मांडव ओस पडतो तस किचन ची अवस्था होते

    ReplyDelete
  2. धन्यवाद , चंदू .☺️

    ReplyDelete
  3. Taking pleasure in pleasures of others is super virtue of any mother or grandmother.She cant be retired or gone away.please follow you PAKSIDDHI forever, Bravo and buck up

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks a lot , Yashodhar !! Your comments are a boost to my writing as well as cooking !! ☺️ Thanks once again !!!

      Delete
  4. तुझे सर्व ब्लाॕग मी वाचले.अत्यंत सुंदर वर्णन,सर्वांच्या भावना ओळखून,प्रसंगावधान राखून,नातवंडाना हजरजबाबीराहुन हाताळण ही कला सुधा तुला छान जमतेय.कस तुला एवढ सुचत गं लिहायला?मस्तच लिहितेस हं! या सर्व गोष्टींना खुप खुप प्रसिद्धी मिळो.हीच देवा जवळ प्रार्थना!.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद , शांता !!!तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा अशाच माझ्या पाठीशी राहोत !!☺️

      Delete
    2. धन्यवाद , शांता ! तुमच्या शुभेच्छा अशाच माझ्या पाठीशी राहोत !!☺️

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland