अजायबघर
हिंदीमधे म्युझियम ला अजायबघर म्हणतात. अजब गोष्टी - काही जुन्या, काही खूप जुन्या ... अशा वस्तू जगात होत्या, आणि त्या दररोजच्या जीवनात , किंवा काही स्पेशल कार्यक्रमात लागत होत्या हे खरं वाटणार नाही ... तर अशा आता कालबाह्य झालेल्या अजब गोष्टी जिथे असतात ते 'अजायबघर ' !
म्युझियम म्हटलं की खूप शांतता, अगदी तुरळक लोक, मोठमोठ्या काचेच्या पेट्या - कपाटं आणि त्यात दूर दूरच मांडून ठेवलेल्या चित्रविचित्र वस्तू असंच चित्र डोळ्यांसमोर येतं. एक लायब्ररीत आणि नंतर वस्तुसंग्रहालयात ( हो, म्युझियमला मराठीत 'वस्तुसंग्रहालय ' म्हणतात ) मधेच कोणीतरी "Shh ..." म्हणून सांगतात, जणू काही जोरात बोललं तर तिथल्या वस्तू झोपेतून उठून चालायला लागतील...
मला आठवतं ते पहिलं म्युझियम - अजायबघर नावाचंच म्हणजे नागपूरच्या महाराज बागेतलं म्युझियम ... तिथे काय होतं ते काही आठवत नाही, पण नाव मात्र खूप आवडायचं. दुसरी आठवण म्हणजे सांगलीच्या शाळेच्या लगतच असलेलं म्युझियम. इतकं जवळ की मधल्या सुट्टीतही जाता यायचं. छोट्या सुट्टीत पटपट डबा खाऊन टाकायचा आणि मोठ्या सुट्टीत म्युझियम गाठायचा. तिथे तिकीट वगैरे काही नसावं कारण खिशात पैसे कधीच नसायचे ... पण आत नक्की जायचो. काय काय पाहिलं ते नीट आठवत नाही ... ढाली, तलवारी, दिवे वगैरे आणि एका काचेच्या कपाटात राजेसाहेबांचा भरजरी पोशाख ! त्यात सोन्याच्या तारा असणार ... इतका सुंदर, नवीनच्या नवीन, असा का ठेवून दिलाय ...देऊन टाकलाय ... घातला पाहिजे ना त्यांनी ... असे विचार मनात यायचे ! एकदा त्याला हात लावायला मिळाला तर ... असं वाटायचं....मग , शाळेची घंटा ऐकली की पळत पळत वर्गात हजर ... काय थ्रिल असायचं ...!!
वडिलांच्या नोकरीमुळे खूप ठिकाणी हिंडायचा योग होताच. आणि नव्या गावातले टुरिस्ट स्पॉट्स बघून झाले की मग रविवारी वगैरे म्युझियम ! कलकत्ता आणि दिल्ली इथली Dolls' Museum ... ३ - ३ मजली इमारती ... सगळीकडे बाहुल्याच बाहुल्या ... जगभरातल्या आणि भारतातल्या सर्व ठिकाणच्या ... अगदी आपल्या ठकी पासून ते सोनेरी केसांच्या 'फॉरीन'च्या बाहुल्या... कागदी, लाकडी,मातीच्या, लोकरीच्या, कापडाच्या, शंख-शिंपले चिकटवून केलेल्या ... ! कलकत्त्याला एक वेगळीच छान गोष्ट... तिथे एका पूर्ण मजल्यावर संपूर्ण रामायणातले सर्व प्रसंग मांडलेले ... प्रत्येक प्रसंगासाठी वेगळी शोकेस आणि खाली त्या प्रसंगाचं वर्णन ... सर्व पात्रं बाहुल्यांच्या स्वरूपात ! अगदी परफेक्ट वेषभूषेसह ! आणि दुसऱ्या मजल्यावर ... पूर्ण महाभारत ! अजूनही ते डोळ्यांसमोर आहे. मला बाहुल्यांची हौस असल्यामुळे मला ते अतिशय आवडायचं !
कलकत्त्याला व्हिक्टोरिया मेमोरियल होतं, पण मला त्यापेक्षा खूप जास्त आवडायचं ते बिर्ला टेक्नॉलॉजिकल म्युझियम ! तिथे विज्ञानाचे चमत्कार म्हणावेत असे exhibits ... आपण बटन दाबलं की ती यंत्रं चालू व्हायची, आणि ती कशी चालतात, त्यामागचं तत्व काय ते सांगणारं रेकॉर्डिंग ऐकू यायचं ! शाळा-कॉलेजात कळलं नाही, इतकं तिथे ते सर्व पाहून कळायचं ! विज्ञानाची किमया वापरून केलेल्या गोष्टी जादू वाटाव्या इतक्या सुंदर ! बंगलोरमधलं विश्वेश्वरय्या टेकनॉलॉजिकल म्युझियम ही तसंच आहे म्हणतात, पण ऐकलं आहे की तिथे 'चालू' गोष्टींपेक्षा बंद पडलेले displays खूप जास्त आहेत, त्यामुळे मी ते टाळतेच ... उगीच अपेक्षाभंगाचं दुःख नको....
काही वर्षांपूर्वी पुण्यातलं राजा केळकर म्युझियम पहायला गेलो होतो. पेशवेकालीन आणि त्या पूर्वीच्या गोष्टी खूप सुंदरपणे मांडून ठेवलेल्या होत्या ! तिथे original मस्तानी महालाचे खांब, छत वगैरे लावून तिच्या महालाचा देखावा उभा केलेला पाहिला. आता तो महाल कुठे होता हे नेमकं कुणाला आठवत नाही ... किंवा सांगत नाहीत, पण तो देखावा मात्र खूप सुंदर, त्याच्या भव्यतेची जाणीव करून देणारा होता ! मला तिथल्या काही वस्तू अजून आठवतात. पेशवीण बाईंच्या - सुनांच्या दागिन्यांचे डबे, प्रसाधन सामग्री ठेवायला एक मोठी पेटी ... तिला बाहेरून हत्तीचा आकार, आणि खाली चार छोटी-छोटी चाकं, अन ओढायला दोरी ! अगदी आजकालच्या सुटकेस सारखं ... फरक इतकाच की सुटकेस मधे माझे, आपले सगळे कपडे मावतात, त्यांचे फक्त दागिने असायचे ! शिवाय त्या हत्तीला झूल आणि टिकल्या-जरीकामाचे दागिने ... अहाहा ... !
तसं पाहिलं तर कधी कधी एखादं गावच सगळं-पूर्णच्या पूर्ण म्युझियम वाटतं. एखाद्या जुन्या काळात थांबलेलं - पेक्षा थबकलेलं - किंवा अडकलेलं ही असेल ! तसं मला कोचीन शहराबद्दल वाटतं ! तिथे गेलं की तिथली सुंदर टुमदार घरं, त्यांची कौलारू छतं, त्यांचा पेहेराव आणि देवळं, दिवे आणि फुलं ... एका वेगळ्या era मधे गेल्यासारखं ! अगदी शंकराचार्यांच्या काळापासून चालत आलेली वेशभूषा, केशभूषा, साड्या ... सगळंच अफलातून ! आम्ही कोचीनला गेलो असतांना तिथे फोर्ट कोची ला जायचा योग आला. समुद्र किनाऱ्याजवळचं एक बेट ... तिथे ज्यू लोकांची पूर्वापार वस्ती, त्यांचं देऊळ - सिनेगॉग ... आपण तिथे एका वेगळ्याच काळात जातो ... शांतता पाळणे हे मुख्य ! तिथल्या हंड्या, झुंबरं, वस्तू ... एक वेगळाच धाट ! तिथून जराश्याच अंतरावर मटानशेरी पॅलेस ! अगदी वेगळा ! एकतर लाकडी वास्तू, आणि त्यात सुंदर दारं - खिडक्या, भिंतींवर जुन्या राजांची तैलचित्रं ... रोजच्या वापरातल्या वस्तू ! आजूबाजूची डच लोकांची जुनी घरं, स्वछ रस्ते ... एखाद्या जुन्या इंग्रजी मुव्हीतून चालल्यासारखं ... !
तसंच गोवा पोर्तुगीज काळात थांबलेलं वाटतं ... अन पाँडिचेरी फ्रान्समधे ... ! तिथली घरं, तिथली संस्कृती, चालीरीती, विचार सगळं .... ते छान पेक्षा वेगळं वाटतं ...!
भोपाळमधे असंच एक भारत भवन ! तिथे नव्या जुन्याचा संगम ... आर्ट गॅलरी, तिला लागून open-air थिएटर, तिथे नवनवीन नाट्यप्रयोग, अगदी जुन्यापासून ते latest नाटकं, आणि त्याच्याच बाजूला आदिवासी राहतात तशी घरं आणि त्यातलं सामान, इतकं सुंदर मांडलेलं, भिंतींवर रांगोळ्या काढलेल्या, चित्रं रेखाटलेली ... असं वाटावं की आत्ता कोणीतरी बाहेर येईल आणि विचारेल, "कोण पाहिजे" म्हणून ... !
माझी धाव इथपर्यंतच ... पॅरीस मधलं Louvre किंवा अमेरिकेतील Smithsonian ... हे सर्व पुढच्या जन्मीच्या लिस्ट मधे कधीच टाकून दिलेलं ... ही दोन सोडली तर इतर नावंही माहीत नाहीत ... पण जे पाहिलं नाही, ते आपण इतकं miss करत नाही ... त्याचा तेव्हढा ध्यास नसेल तर ... आणि तो मला नाही ... डॅन ब्राउन च्या पुस्तकात वाचलं - जुनं नवं, जुन्याचं नवं केलेलं ... तेव्हढं पुरे आहे ...
पण अगदी २-४ दिवसांपूर्वी जे पाहिलं, ते खूपच भारी ! झपुर्झा !!! ... ही केशवसुतांची कविता ... कशात, एखाद्या ध्यासात किंवा विचारात रमून जावं, एखाद्या स्वप्नाला वाहून घ्यावं, कशाचंही भान न रहाता त्यात विरून जावं... अशी स्थिती म्हणजे झपुर्झा ... !एक नाद , ध्यास... ह्याबद्दल खूप ऐकलं होतं ... सगळ्यांना खूप आवडलेलं ... प्रत्येकाचं version वेगळं ... कुणाला तिथले दागिने आवडले, तर कुणाला दारं खिडक्यांचं कोरीव काम आवडलं ! तर कुणाला मॉडर्न आर्ट वाली paintings ! मला राजा रवी वर्मा यांची paintings आणि हळदणकर यांचं Lady with the lamp !! ...
तर गेलो तिथे ... NDA च्या पुढे, खडकवासला लेक च्या बाजूबाजूने सुंदर रस्ता ... तुरळक वाहतूक ... सुंदर परिसर. उन्हाळ्यातही खूप फुलं, काही तर पहिल्यांदा पाहिलेली ... आणि मग एक एक दालन - कक्ष.. काय म्हणाल ते ... जात राहिलो ... पहात राहिलो ... नवी, जुनी चित्रं, कोरीव काम, एका ठिकाणी दिवे , अनेक प्रकारचे दिवे ... समया, लामणदिवे ते अगदी आगगाडीच्या सिग्नलच्या दिव्यांपर्यंत !
पानदानाचे, विडे ठेवायचे किती प्रकार ! डबे-डब्यांपासून ते प्रचंड मोठे हंडे, घंगाळी ... ! स्वयंपाकाची किती तऱ्हेची भांडी, विळ्या, अडकित्ते अश्या गोष्टींपासून ते अगदी भातुकलीपर्यंत ... ती ही चांदीची भातुकली ! अगदी बोटाच्या पेराहून लहान अशी पळी-भांडं, पंचारती आणि तितकाच छोटासा बाळकृष्ण - त्याला शोभेलशा पाळण्यात बसवलेला ! आणि एक चांदीचा भोवरा !!!...
एका 'दागिना' नावाच्या दालनात गेले आणि बघतच राहिले !... एक गळ्यातला हार - सूर्यहार ! हा आपण कुठेतरी पाहिला आहे ... वगैरे ... आणि मग आठवलं की इजिप्शिअन राजे अन राण्यांच्या गळ्यात असाच हार दाखवतात ... आणि ते 'फॅरो' तर स्वतःला सूर्याचे वंशज समजत असत ... त्यांच्या गळ्यात 'सूर्यहार' तर असणारच ... आता हा दागिना त्यांच्यावरून सुचला का सूर्याची किरणं पाहून आपणच घडवला, ते 'PNG' च जाणोत ... !
तिथे फक्त जुनंच नाही तर नवीन काळातील जुन्या गोष्टी म्हणजे जुने फिल्म कॅमेरे आणि प्रोजेक्टर, किल्लीचा 'फोनो' ... त्याला किल्ली देऊन एक जुनी रेकॉर्ड पण तिथल्या मदतनीस मुलीने आम्हाला ऐकवून दाखवली. आणि पेशवाईतल्या पैठण्या ...आज कालच्या दृष्टीने ' prototypes' !! एका ठिकाणी बैलगाड्या ... त्यासुद्धा कोरीवकाम केलेल्या, एक टांगा, कलकत्त्याची हातरिक्षा ... एक AUSTIN 7 - Baby Austin सुद्धा ! शिवाय बाहेर प्रांगणात भंगार लोखंडातून निर्माण केलेल्या प्रतिकृती ... मेंढपाळ आणि त्याच्या शेळ्या, सैनिक, वारकरी ... कुत्रे सुद्धा ! तिथेच एका ठिकाणी जुनं स्वैयंपाकघर - जातं, उखळ, चुली ! आणि Activities ... Potter's Wheel ... Block Printing ... Jewellery making ... अगदी तळ्यात-मळ्यात खेळावं तसं ... एका एका पावलात नव्या-जुन्यात जात येत होते !
नंतर नुसतं पाहून नाही, तर खाऊन-पिऊन तुस्त होऊन बॅटरी डाउन होतेय असं वाटलं, तेव्हा परत निघालो , तरी काहीतरी सुटलं असणार ह्याची खात्री होतीच ... !
परत येतांना मनात खूप विचार घोळत होते ... ... मला तिथलं काय आवडलं, आणि का आवडलं ? आपल्याला एखादी गोष्ट केव्हा आवडते ... जेव्हा तिचं आणि आपलं काहीतरी connect होतं ... आपल्या काही आठवणींशी त्या वस्तू जुळतात ... आपलं आणि त्या गोष्टींचं काहीतरी नातं असावं असं वाटतं ... आपण त्या वस्तूंशी relate करू शकतो ... मुख्य connection असतं , ते आठवणींचं ... !
तेच झालं ! तिथे जुन्या गोष्टी होत्या, त्यातल्या बऱ्याच आपण आपल्या आजी-आजोबांकडे पाहिल्या होत्या, त्यांच्यात राहिलेलो होतो, वापरल्या होत्या ... काही गोष्टी आपल्याकडे आल्या-मिळाल्या ... अजून ही अस्तित्वात आहेत ... !
आणि हाच फरक मला इथे जाणवला ! हे संग्रहालय जिवंत आहे. फक्त जुन्या गोष्टी आणि शांतता असं इथे नाहीये ... हे जिवंत दालन आहे ... आताच्या काळातलं ही तिथे आहे ... आपल्याला रोज दिसणाऱ्या गोष्टी-वस्तू तिथे आहेत ... सतत सुतकी चेहेरा करून बसणारे रखवालदार नसून तिथे आपल्याशी बोलणारे, माहिती सांगणारे interactive लोक आहेत ... ते नुसता staff नसून facilitators आहेत !
किती तास तिथे हिंडत होतो ... किती वेळ घालवला ... कसा वेळ गेला, काही कळलं नाही ... घड्याळाचा विसर पडला ... भान हरपून टाकणारा दिवस ! एक वेगळी सफर घडवणारा अनुभव ... आणि त्याचं नाव ? ... बाहेर आल्यावर पटलं..... अगदी सार्थ नाव .... झपुर्झा !!!
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
छान!मस्त लिहितेस.
ReplyDeleteनेहेमी लिहित असशीलच.नाहीतर,keep it up.
Thank you so much !
Deleteअलकाचे चणे कुरमुरे
ReplyDeleteअजायबघर
जगभरातल्या लोकांना इतिहास जाणून घ्यायचा असतो आणि तो समजून घेण्यासाठी असतात म्युझियम. वेगवेगळ्या म्युझियमची नांव आणि माहिती अलकानं दिल्यावर त्यात अजून भर घालावीशी वाटते. प्रजाहितदक्ष राजा असा नावलौकिक असलेले औंध संस्थानचे राजे, पंत प्रतिनिधी यांच्या छोट्याश्या संस्थानातलं म्युझियम एकदम भारी आहे. शाळेत असताना ओगलेवाडीचा काच कारखाना ,किर्लोस्करवाडी आणि औंधची सहल केलेली आजही आठवते. एकाहून एक नायाब गोष्टी तिथे बघितलेल्या होत्या त्या आजही आठवतात.
माझं आजोळ बडोदा.गायकवाड सरकार यांचं म्युझियम अतिशय देखणं आहे. तिथे देवमाश्याचा जवळपास शंभर फूट लांबीचा सांगाडा ठेवला आहे. ते बघितल्यावर जगात असलेल्या एकसे एक बढकर गोष्टी गोळा करून जनतेसाठी खुल्या करणाऱ्या राजाच्या रसिकतेला दाद द्यावीशी वाटते.
हैद्राबाद इथलं सालारजंग म्युझियम देखील अप्रतिम आहे.याचा पसारा तीन इमारतींमधून आणि ३९ गॅलरी मध्ये आहे. म्हणजे हे सारं बघायला किती वेळ लागेल ?
पॅरिस च्या लूव्हर म्युझियमचा उल्लेख अलकाच्या लेखात आलाय ते अवाढव्य म्युझियम बघायचा योग मला आला होता. जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्ड द विंची यानी रेखाटलेले *मोनालिसा* पेंटिंग तिथे बघितले. लंडनला मादाम तुसाँच्या वॅक्स म्युझियम मध्ये जगप्रसिद्ध व्यक्तींचे हुबेहूब पुतळे बघताना थक्क व्हायला होत.
उंटावर बसलेले अरब तेलाचा साठा सापडल्यावर आलिशान गाड्यांमधून फिरायला लागले पण ते इतिहास विसरले नाहीत. दुबई मध्ये त्यांच्या सम्रुद्धी येण्या आधीची त्यांची जीवनशैली, चित्र आणि शिल्प स्वरूपात म्युझियममध्ये उभी केलेली बघता येते.
ग्रीकांनी मानवी सभ्यतेची सुरवात म्युझियम मधून जपून ठेवली आहे. प्रवासवर्णन करून त्यावर पुस्तक लिहिणाऱ्या मीना प्रभू यांनी *ग्रीकांजली* पुस्तक लिहिल आहे. त्यात तिथल्या गावोगावच्या म्युझियम्सच खूप सुंदर वर्णन त्यांनी केलं आहे.
अमेरिकन लेखक Irving Wallace यांनी द सेव्हन्थ सीक्रेट नावाची अफलातून कादंबरी लिहिली आहे त्यातलं रहस्य देखील म्युझियम मधल्या एका चित्रामुळे उलगडलेलं दाखवलं आहे. त्याच प्रमाणे Robin Cook यांनी इजिप्त च्या पिरॅमिड वर लिहिलेली Sphinx ही कादंबरीत देखील पिरॅमिड मधल्या खजिन्याचा शोध घेताना म्युझियम मधल्या Papyrus (भूर्जपत्र) वर लिहिलेल्या लेखाचा उपयोग झालेला दाखवला आहे.
याची व्याप्ती खूप मोठी आहे म्हणून Museology या विषयाचा डिग्री अभ्यासक्रम देखील आहे आणि तो पूर्ण केल्यावर जगभर curator (क्युरेटर) म्हणून काम करता येते. मोठमोठ्या कार्पोरेट कंपन्या असा कोर्स केलेल्या लोकांना चांगला जॉब देतात. पंचतारांकित हॉटेल त्यांच्या हॉटेलचं वेगळं आणि देखणेपण जपण्यासाठी आकर्षक जॉब देतात.माझ्या एका मित्राच्या मुलीने हा डिग्री कोर्स केला आहे आणि ती सध्या टाटा ग्रुपच्या The Indian Hotels Company Limited मध्ये जॉब करते.
नवनवीन शोध लागल्यामुळे कालौघात कितीतरी जुन्या गोष्टी कालबाह्य होतात. या आपल्या पूर्वजांच्या जीवनाचा भाग होत्या. तो ठेवा म्युझियमच्या माध्यमातून पूर्वी राजे रजवाडे जपून ठेवायचे.पुण्यात देखील राजा दिनकर केळकर संग्रहालय, रेल्वेचं अनोखं जोशी संग्रहालय, आगाखान पॅलेस ,लोकमान्य टिळक संग्रहालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय अशी म्युझियम आहेत. त्यात अजून एक देखणी भर झपुर्झा ची झाली आहे. पुढच्या पुण्याच्या भेटीत इथे जायलाच हवं असं वाटणार लिखाण अलकाने केलंय.
पूर्वीच्या काळी आक्रमणकर्ते संग्रहालयाची आणि वाचनालयाची नासधूस करायचे कारण ती अस्तित्वात राहिली तर ती बघून इतिहास जिवंत होतो आणि एव्हडीशी असणारी ठिणगी स्फुल्लिंग बनते आणि मग क्रांती होते.म्हणूनच म्हणतात ना ज्याला इतिहास समजला तोच भूगोल घडवतो.
एव्ह्ड्यासाठीच संग्रहालयाच महत्व फार आहे.
प्रसाद जोग.सांगली.
९४२२०४११५०
Thank you , Prasad !तू छान आठवण करून दिलीस .. औंध , सलारजंग !
Delete