योगासन

 

    आपल्या पिढीच्या लोकांचा एक आवडता सिनेमा ... आनंद ... त्यातला  एक संवाद ... आपल्या सगळ्यांना पाठ ... जहाँपनाह, हम सब इस रंगमंचकी कठपुतलियाँ  है़ं  ... वगैरे वगैरे ... म्हणजे आयुष्य हे एक नाटक, असा त्याचा अर्थ. पण , माझ्या मते थोडा,  नव्हे खूप फरक आहे दोन्हीत . नाटक हे ३ घंटा झाल्या की सुरु होतं ... आणि आयुष्य हे तिसरी घंटी झाली की थांबतं  ...आणि , या तिन्ही घंटा वॉर्निंग च्या ... !

    माझी पहिली घंटा २५-३० वर्षांपूर्वी वाजली ... काहीही ,कसलंही कारण नसतांना ... hypertension ... वारसा हक्कानं  मिळालेलं ... त्यात हार्मोन्स ची उलाढाल, स्ट्रेसची चढाओढ  वगैरेचा अजिबात संबंध नव्हता ... असो.   त्यानंतर वर्षानुवर्षं , अगदी सात आठ महिन्यांपूर्वी पर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं ... आणि अचानक दुसरी घंटा वाजली ... ऑं ?   हे काय ?   आता काहीतरी हातपाय हलवायला पाहिजेत - अक्षरशः - असं वाटलं, आणि तिसऱ्या घंटेच्या आत आपलं नाटक धडपणे उरकायचं असं ठरवलं ...

    ... आणि  Habuild जॉईन केलं !   खूप घाबरत घाबरत ... आपलं आता काय काय आखडणार, दुखणार, आंबणार,  काय काय मोडणार ... अशी भीती ... पण केलं जॉईन ... पहिले एक दोन दिवस अगदी सुरुवात ... अरे,  हे तर easy आहे म्हणत ... त्यानंतर मग हळूहळू जाणीव व्हायला लागली की आपल्या अंगात बरेच स्नायू आहेत, आपण ते आता पहिल्यांदाच वापरतोय आणि ते चांगलेच दुखतात ... कोणत्याही action मधे ... त्यांचा काहीही डायरेक्ट संबंध नसतांना !   Habuild करत असतांना घड्याळाकडे सारखं बघण्यामुळे डोळ्यांना व्यायाम आणि आ ... उ ... कपाळावर आठ्या... मध्येच त्यांनी सांगितलं की डुप्लिकेट स्माईल ...म्हणजे face yoga  ही सुरु झाला .

     हे करतांना ज्ञानात खूप भर पडली !   कल्पना नसतांना ... !   सुरुवातीला मी जरा अंदाज घ्यायला, कसं  करायचंय, ते समजून घ्यायला नुसतं बघत असे ... नेमकं तेच मुलांनी पाहिलं ... "आपली आई योगा बघते ... फक्त  'बघते' ... "   असं त्यांनी ठरवून टाकलं ...त्यांच्या मते " क्रिकेट हा पुरेसा व्यायाम नाही," असं डॉक्टर म्हणाले, म्हणून आता फुटबॉल पाहणाऱ्या माणसासारखा माझा  व्यायाम आहे म्हणे !   असो, पण माझ्या लक्षांत आलं की व्यायामात, योग - योगासनं करण्यात खूप मजा आहे ... तशी आपली दृष्टी पाहीजे ... नव्याने आयुष्याकडे , स्वतःकडे  पहायची !...

    योगातल्या प्रत्येक pose ला आसन म्हणतात आणि त्याला छान छान नावं पण आहेत !    म्हणजे आपण काहीही करत असलो, तरी कोणत्यातरी आसनात असतोच !   नुसतं मांडा ठोकून बसणं , म्हटलं की वाईट वाटतं, पण त्याला किती गोड नाव आहे ... सुखासन !   लहानपणी आईची बोलणी खायच्या वयात हे माहीत असायला हवं होतं ... तेव्हा पद्मासन हे माहीत होतं , घालता यायचं ही , पण मुळात नुसतं बसून राहणं - म्हणजे काही न करणं , ही आईची आयडिया चूक होती नं ...!

    तर जशी प्रत्येक pose हे एक आसन आहे, तसं त्या प्रत्येकात variation आहे !    प्रत्येकात एक advanced stage आहे, आणि एक simple version पण आहे ... इति सौरभ बोथरा ... इदं न मम !   असं पहा , ताडासन, वृक्षासन, पर्वतासन ... सगळी एका basic poseची  variations , काही उभं राहून, काही बसून ... असा निष्कर्ष मी काढला . मग मी ठरवलं की रोजच्या actions ना पण  नावं दिलीच पाहीजेत ... जास्त बरं वाटेल ... ! 

    मी आता माझ्या प्रत्येक action ला नावं दिली आहेत !   कारण ?   छान वाटतं ... आपण काहीतरी करतोय असं वाटतं !    ... तर सुरु झालं  माझं विचार चक्र ... राग आला की 'ठोकासन' ... स्वैयंपाकघरात तर खूपच scope नावं ठेवायला ... नारळाच्या शेंड्या काढणे म्हणजे 'सोलासन' ... variation करता हवी ती भाजी घेऊ शकता !   तसंच केर काढणं ... केरासन ... मग पोछासन ... त्यात advanced stage म्हणजे ओटा पुसणे, टेबल पुसणे, dusting किंवा ultimate म्हणजे सांड-लवंड पुसणे ... !    मग स्वैपाक ... त्यात 'आसना' ला वेळ आणि जागाच नाही !    जेवतांना खुर्चासन मिळाले की पुरे ...

    मग जरा विश्रांती म्हणून, change म्हणून ... TV कडे पहात त्राटक ... variation म्हणून ते करता करता कोचावर लोळासन ... !   आणि मग एखादी डुलकी ... नव्हे अर्धसुप्तासन ... !  त्यानंतर जरा मोकळा वेळ मिळाला की काहीतरी शोधासन / हुडकासन ... रोज काहीतरी सापडत नसतंच !   रिकामटेकडेपणा करायचा असेल, तर त्याला विचारासन म्हणून छताकडे पहात बसावं ... !

    पण ही सगळी आसनं डोळे बंद करून, मूकपणे करायची असतात ... पण ती मूकपणेच का ?   जिभेला नको का व्यायाम ?   जशा हस्तमुद्रा जरुरी असतात, तसा जिभेला ही इकडे तिकडे, मागे पुढे वळणं, twist होणं हवंच ... बडबडासन म्हणूया आपण ... स्ट्रेस घालवायला फार जरुर आहे याची, ताण एकदम कमी होऊन जातो ... 'तोंडसुख'  ह्या शब्दाला  Habuild नी नवीन dimention दिलंय !   ह्या आसनाने Habuild मुळे येणारं दुखणं, खुपणं, अंग मोडणं, spasm किंवा cramp येणं, सगळं दुःख कमी होतं !   आई ... ,उई ... , देवा रे ... बास कर आता ... असं स्वतःशी बोलत राहीलं की सगळं सुसह्य होतं !   ही advanced version ... कुरकुरासन  !

    हे सगळं दिवसभर करत करत रात्र होते आणि आपण दिवसभरातला घरातला पसारा 'आवरासन' करून नाहीसा करतो ... !   हे एकमेव moving आसन असावं ... खरं तर , आसन म्हणजे मुळात  'बसणं',  किंवा pose किंवा स्थैर्य . एका action चा छोटासा भाग ... व्हिडिओतला एक शॉट आपण freeze केलेला ... असं असतांना तिला moving कसं म्हणणार ? पण , असो ....ते नाव आहे ...

    All said and done  ... माझ्या तब्येतीचं भलंच होतंय ह्या  व्यायामाने आणि योगासनांनी ... वाकून जमिनीला, निदान अंगठ्याला हात लावणे , अजून जमायचं आहे ... पण निदान हात त्या दिशेला जाऊ पहातात ... धनुरासन करतांना हात आणि पावलातली गॅप कमी होतेय .... सेतुबंधासन करतांना आपलं 'middle' चांगलंच वजनदार आहे हे कळतंय ... 'chair सूर्यनमस्कार' करतांना अजून फे फे  उडतेय ... खरा, पूर्ण   सूर्यनमस्कार जमायला अजून सूर्यनारायणाच्या भोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण व्हायला हवी  !

    दोन महिन्यांपूर्वी पर्यंत, संपूर्ण दिवस म्हणजे दोन दिवसांच्या Habuild sessions मधला वेळ , शरीराला औषधपाणी करायचा वेळ असा जायचा ... आता जरा बरं आहे ... थोडी सवय झाली आहे ... दुखण्याची !   अजून थांबलं नाहीये. पण दुसरा फायदा म्हणजे व्यायाम करून झाला की राजरोसपणे खाता येतं ... भूक लागते नं व्यायामानंतर !.. आणि उजळ माथ्याने समाजात वावरता येतं ... "अगं, काहीतरी कर ... " असं कोणी म्हटलं की सांगता येतं, "हो, Habuild करते मी" ... की लोकं गप्प ... कारण ते सर्वांचं करून झालंय ! वर्षभराचे पैसे भरून तीन महिन्यांच्या आत सोडून देणारेच जास्त ! ... आणि , हे गुपीत फुटायला नको म्हणून पुढे कोणीच काही बोलत नाही !

    तशा त्यात पळवाटा पण आहेत !   सौरभच सांगतो ... जमेल तेवढंच करा, high BP वाल्यांनी करू नका, दुखलं तर तिथेच थांबा ... किती प्रेमळ मनाचा, सर्वांचा  'खयाल'  ठेवणारा असा मुलगा ! अगदी शहाणं लेकरू !   त्याचा समजूतदारपणा मला फारच आवडतो, आणि म्हणूनच मी रोज वेळच्या वेळी जॉईन करते ... मग, पुढचं जमेल तसं ...  वेळ, कामं, तब्येत आणि आपला मूड संभाळून करत रहायचं ... नाहीतर कधी कधी 'पाहून' ठेवायचं ... मुलं म्हणेनात का व्यायाम बघते म्हणून ... एक मात्र खरं ... शारीरिक दुखण्या खुपण्याकडे मी आता हास्यासनातून  बघू शकते आहे ... म्हणजे तिसरी घंटा आपल्या नकळत हसण्याच्या आवाजात ऐकूच यायला नको ....                              

 .... तो पर्यंत , Keep  saying .... I am healthy .... I am happy .... !!!!!     




-  सौ अलका कुंटे,  बंगलोर 

   +९१ ८७६२३ १६३८५

Comments

Popular posts from this blog

संध्याछाया भिवविती हृदया ...

Black is beautiful

पुरुषोत्तम मास