' आई गं sss '
कधी कधी मन अचानक नसत्या गोष्टींबद्दल विचार करायला लागतं आणि मग तो विचार जसा काही चिकटून बसतो आत ... तसंच माझं झालं ... facebook उगीच चाळत असतांना एका जुन्या सिनेमाचं नाव वाचलं ... अगं बाई , अरेच्चा.. ! काय मजेशीर नाव ... म्हणजे कोणाला तरी, खरं म्हणजे कोणा तरी दोघांना कसलं तरी आश्चर्य वाटलं ... बाई म्हणाली 'अगं बाई', आणि दुसरा म्हणाला असेल 'अरेच्चा ! दोन्ही विस्मय बोधक उद्गार ... उत्स्फूर्तपणे बोलले गेलेले ... सिनेमा राहिला बाजूला आणि मग दिवसभर ... अगंबाई आणि अरेच्चा.. अगंबाई, अरेच्चा....! आपण एखादं गाणं सारखं गुणगुणत राहिलो की त्याला 'earbug' म्हणतात ... माझ्या मनात हा तसलाच किडा ... उद्गारवाचकांचा !
आणि मग दिवसभर त्याच्याच शोधात ... खूप सापडले ... त्यातले काही अगदी घडी घडी म्हणतो आपण ... कधी आश्चर्यचकीत झालो की तोंडात येतात ... काही दुःख, कधी आनंद दाखवणारे, ... कधी राग जाहीर करणारे ! अजूनही तऱ्हतऱ्हेचे !
अगदी लहानपणी आणि मग खेळतांना वगैरे पडलो की मोठ्यांदा 'आ sss ई ' करून रडणं ... मग शाळेत असलो तरी तेच ... कारण एकच, सगळ्या त्रासाचा - पीडांचा एकच इलाज - आई ! ती कुठेही असली तरी तिला आपला आवाज पोहोचतोच ... ती येतेच धावत, आणि मग सगळं बरं होऊन जातं ! नुसतं कुठे लागलेलं आणि दुखणंच नाही तर 'आपण पडलो' असा दुखावलेला ego ही ... कारण बऱ्याचदा आपण पडलो की कोणीतरी हसतंच ... मग ते कौतुकाने हसोत का मजा-फजिती झाली म्हणून असो ....!
त्यानंतर जरा मोठं झाल्यावर, पडल्यावर, लागल्यावर रडणं वगैरे बंद झाल्यावर ही फारच दुखत असेल तर , ...आई गं' ... असं तोंडात यायचंच ... ते अगदी आजपर्यंत कायम आहे ! कधी कधी काही हृदयद्रावक असे प्रसंग खरे खरे पाहिले की ही मनांत येतं 'अगं आई गं ... कसं रे हे ...' असंच पटकन मनात येतं ... पण विचार केला आहे का ... कधी आपल्या बाबांना अशी हाक मारतो का ? त्याचं काय कारण असावं ? मला वाटतं, जेव्हा काहीतरी काळजी घेणं, सांभाळणं, कसलं तरी दुखणं कमी करणं, kind of 'संगोपन' किंवा मनाला मदतीची जरूर असते, तेव्हा आईची आठवण येते ... तिच्या मायेची फुंकर त्या फुटलेल्या गुडघ्याला किंवा दुखावलेल्या मनाला जरा आंजारते, गोंजारते आणि बरं वाटतं ! ... मी कधी माझ्या आईला 'आई' म्हणून हाक मारली नाही, तरी पण काही झालं की 'आई गं' ... च ! पुण्यात तर एक दुकान आहे, तिथे गूळ -तूप - पोळीच्या लाडूपासून चकल्या-लाडू-मोदक वगैरे पर्यंत सगळा खाऊ मिळतो ... त्याचं नाव 'ए आई गं sss' ! मुलं ,मुली, बायकांची इतकी काळजी वहाणाऱ्या दुकानाला याहून समर्पक नाव दुसरं कोणतं असणार ? 'आई गं' ह्या शब्दांतच इतका आधार आहे की कोणत्याही वेदनांमधे तीच आठवते !...
आमच्या विदर्भात जरा वेगळं ... काही झालं की 'माय वो'... ! जरा काळजी, कणव, दया अशा अपेक्षेने ! मला कधी मी फारच 'बिचारी' आहे असं वाटलं की पटकन म्हणते, "माय वो, जरा पाच मिनिटं बसू दे ना मले ..."
मग आपण बाबांना कधी बरं हाक मारतो ? काही तरी संकट आलं की, मग ते कितीही साधं नाहीतर भयानक असो ... उद्या शाळेत परीक्षा-टेस्ट असो, जी आपण विसरलो होतो, नाहीतर भिंतीवर पाल किंवा मोठं झुरळ ... ते म्हणजे समोर आलेला नागच !... सगळीच संकटं आपल्या आवाक्या बाहेरची ! ... की आपण लगेच म्हणतो, "अरे बापरे, आता कसं होणार ?" तेव्हाच बाबांची आठवण येते ... कोणत्याही संकटातून बाहेर काढायला सदैव सज्ज आणि ती ताकद असणारे म्हणजे फक्त बाबाच ! मोठ्या पावसात कुठे अडकलो, ७च्या आत घरात वाल्यांना उशीर व्हायला लागला, इतकंच काय आता मोठेपणी २ दिवस पाणी येणार नाही किंवा उद्या दिवसभर वीज नाही इथपासून ते कोणताही प्रॉब्लेम असो ... आपण बाबांना शोधणार ! आपल्या हाताबाहेरच्या प्रसंगातून आपल्याला सुखरूप बाहेर काढणारे - आपल्या ढालीसारखे बाबाच !
तसं आपण 'अरे देवा' ही म्हणतोच ... ते अगदी टोकाच्या वेळी ... कुणाच्या तब्येतीचं काहीतरी भयानक निदान, कुणाच्या जीवाला धोका, imminant danger की 'अरे देवा' असा धावा सुरु ! द्रौपदीने नाही का शेवटचा उपाय म्हणून कृष्णाचा धावा केला ... आणि तो आलाच धावून ... !
इथे मद्रास, बंगलोर मधे आल्यावर ह्या उद्गारांच्या collection मधे खूप भर पडली ... मद्रासमधे 'अय्ययो ' म्हटलं की आश्चर्य, आनंद, नाखुषी ... सगळं एका शब्दात ... फक्त tones वेगळे ... अजूनही असतील शब्द, पण तिथल्या वर्षभरात माझी मजल इथपर्यंतच गेली ! बंगलोरमधे 'अय्यो रामा', 'अय्योडा 'आणि अनंत नाग ह्यांच्या सिनेमातलं 'अय्यो देव रे ...' ' ... मला खूप आवडलं ... त्यांचं acting इतकं सुंदर की नुसते डोळे आभाळाकडे नेले की त्या शब्दांत त्यांचा वैताग दिसतो , त्याच शब्दांना एक मोठ्ठं smile जोडलं की आनंद ! व्वा ! झकास ! ...अजून दोन शब्द सापडले की मला !
ह्या उद्गारवाचक शब्दांची छानच लिस्ट झाली ... आई, बाबांपासून मी बरीच दूर पोचले ! आणि फक्त उद्गारवाचक असा त्यांचा अर्थ नं रहाता तो जरा विस्तारला ! आणि लक्ष्यवेधी ( का लक्षवेधी ) म्हणजे बोलण्याची , वाक्याची सुरुवात करणारा शब्द असाही एक अर्थ सापडला ! माझा एक मित्र ... चांगला उत्तम शिकलेला, सुसंकृत, अतिशय सभ्य, सज्जन असा ... त्याच्या बोलण्याची सुरुवात मात्र 'भारी' असते. तो अगदी 'भ'ची बाराखडी नाही बोलत, पण त्याला 'च' ची भाषा येते ... त्यातल्या एका शब्दानेच तो वाक्य सुरु करतो ! असंच एक फेमस उदाहरण म्हणजे आपले सचिन तेंडुलकर ! त्यांचा एक विस्मय वाचक शब्द आता इंटरनॅशनल झालाय ! त्याचीच एक मजा सांगते ! माझा एक मामा इंग्लंडमधे settle झाला आहे आणि माझे मामेभाऊ अर्धे मराठी ,अर्धे ब्रिटिश आहेत ... अर्थातच क्रिकेटचे फॅन , आणि सचिनचे ही ! ते अधून मधून भारतात येतात. एकदा ते आले असतांना , त्यांना सगळ्यांना एकदम भेटता यावं , म्हणून एक भावंडांचं get-together केलं होतं ... आणि अर्थातच खूप पदार्थ वगैरे ... ते पाहून एन्जॉय करत तो म्हणाला, "आxx, what a great spread ! so many delicasies ... " सगळ्यांची हसून हसून पुरेवाट ! तो गोंधळलाच ... मग एका भावाने सांगितलं ...generally we don't use that word, especially in the presence of elders ! ... मज्जा आली !
हे उद्गारवाचक शब्द कधी कधी संबोधन स्वरूपातही येतात ! "अहो, ऐकलंत का" ... पासून ... "ऐकताय ना "... पर्यंत .!.. घरातल्या बाईचा मूड योग्य ठिकाणी पोहोचवतात ! फेसबुक वरची आपली लाडकी मुलगी स्वानंदी "ऐका ना" म्हणाली की हातातलं काम टाकून सगळे ऐकायला बसतात, ती काय सांगते ते !
इथल्या बायका नवऱ्याशी बोलतांना 'री' ... म्हणजे 'अहो' अशी हाक मारतात आणि नवरे माना डोलावतात ... त्यावरूनच 'री' ओढणे हा शब्दप्रयोग आला असला पाहीजे , असं माझं मत आहे ? आमच्या लग्नानंतर माझ्या सासऱ्यांनी सांगितलं, "हे बघ, ते 'अहो शुक शुक' वगैरे म्हणण्यापेक्षा सरळ नावाने हाक मारत जा" ... म्हटलं देव पावला ... नाहीतरी तो एक प्रश्नच होता !
ऐश्वर्या राय देवदास सिनेमात जाता येता गाण्यात 'ईश्श्श' म्हणते ... म्हणजे काय कोण जाणे, पण आपल्या मराठी 'इश्श' चा आणि त्याचा काहीही संबंध नाही ! आपल्या 'इश्श' मध्ये खूप वेगवेगळ्या छटा आहेत, ते एक वेगळंच रसायन आहे ...अगदी कौतुक,आनंद, प्रेम,समाधान पासून ते हेवा वगैरेही आणि लाजणं सुद्धा ! पण आपले मराठी सिनेमे जेव्हा sub-titles सह इथे दाखवतात तेव्हा त्याचे इतके भयानक अर्थ लिहितात की विचारू नका ... अगदी 'rubbish' पासून ते 'you are out of your mind' पर्यंत ! 'अरे बापरे' चं भाषांतर 'oh father' ... त्यापेक्षा गप्प बसावं , जमत नसेल तर... काही शब्दांचं भाषांतर होणे नाही !
पूर्वीच्या काळी लक्ष वेधण्यासाठी 'ऐका हो ऐका' अशी दवंडी पिटत असत, आणि राजाचे हुकूम लोकांपर्यंत पोहोचवत असत ! जुन्या कहाण्यांमधे ह्या 'ऐका हो ऐका' चा long-form "करा रे हाकारे , पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का ?" असा असावा ! एकनाथ महाराजांच्या भारुडातल "अ गं गं गं गं गं , विंचू चावला ! .... काय मी करू ? ... विंचू चावला ... आता कुणाला सांगू ?.... विंचू चावला ... विंचू चावला , की कसं होतं ते तोच माणूस जाणे ...एवढं अगंगं ऐकल्यावर लोक धावत येणारच !
बघता बघता बरंच लिहिलं. हे संपवून जरा उशिराच झोपायला गेले. विवेक केव्हाच झोपला होता. दिवा नं लावता , मी झोपायच्या तयारीतच होते ... आणि अचानक कानातल्याची फिरकी हातातून निसटली आणि अंधारात गडप झाली ... 'हरे राम'... माझ्या तोंडून आपोआप निघून गेलं .(.. 'हे राम' नाही हं ... ).. लगेच विवेक म्हणाला, "आता झोपा, उद्या उठल्यावर शोधू फिरकी ..." "तुला कसं कळलं , फिरकी पडली म्हणून ?" ... मी विचारलं, तर तो म्हणतो...."आता रात्री अंधारात आरश्यासमोर उभं राहून तू काय स्वतःला पाहून 'हरे राम' म्हणणार आहेस ? आज ऐकलं नं पुराण ... प्रत्येक उद्गारवाचकाचा अर्थ वेळ, काळ, माणूस याप्रमाणे बदलतो .....!!" "बाssस, good night !"
... अजून ती फिरकी सापडली नाहीये ... आता रे देवा ... कसं होणार माझं, ये रे बाबा आता धावून ... !
- सौ अलका कुंटे, बंगळुरु
+९१ ८७६२३ १६३८५
छान !
ReplyDelete- शशी देशमुख
छान लेख, आणि थोडासा निराळा पण
ReplyDeleteविचार करायला लावत
अगं बाई, खरंच की ग !.... भारी !!!
ReplyDeleteअलकाचे चणे कुरमुरे
ReplyDeleteआई गं sss
हेडिंग वाचलं आणि वाटलं अलकाला विव्हळायला काय झालं अचानक. म्हणून गडबडीत वाचायला सुरवात केली तर तस काही नव्हतच. उलट एव्हडा सर्द पावसाळा असताना लिहिलेले चणे कुरमुरे मात्र कुरकरीत आणि चटपटीत दिसले. वाचत गेलो आणि मजा वाटायला लागली.
आई म्हटलं की कणव, दया,माया,करुणा हे शब्द आठवतात. म्हणूनच बारीकस जरी दुखलं खुपलं की आपण आई ग म्हणतो,त्याचा उत्तरार्ध म्हणजे मला किंवा ज्याच्या बद्दल आई ग म्हटलं असेल त्याला त्रासातून सोडव असा होतो. ही मानसिकता असते हे लक्षात ठेवूनच अगदी अलीकडे डेटॉलच्या जाहिरातीत लग्नघरात पोर पडत आणि त्याच्या ढोपरावर आई डेटॉल लावून इलाज करताना दाखवलीय.
https://www.youtube.com/watch?v=JGVz3N9ld2A
वेगवेग्ळ्या प्रांतांमधले शब्द वाचताना पुलंचा मानसपुत्र म्हणजे बेळगावचे रावसाहेब डोळ्यासमोर आले. मराठीवर कानडी आघात आणि व्याकरण सोडून बोलताना त्यांच्या तोंडी अय्यो पाप असे शब्द घातले आहेत. याचा उच्चार ऐकण्यासाठी त्यांचं कथाकथन ऐकलं पाहिजे.
पुण्यातल्या 'ए आई गं sss या दुकानाचा उल्लेख वाचल्यावर माझ्या एका मित्राने आईची एक्काहत्तरी आगळ्यावेगळ्या पद्धतीनं आणि दणक्यात साजरी केली होती ते आठवले. शाळेतून परत आल्याबरोबर भूक भूक करणाऱ्या पोरांना आई काय काय खाऊ घालते ते आठवून आठवून त्याने ७१ पदार्थ बुफेत मांडले होते. त्यात उसाचे करवे, पापडाच्या लाट्या,गुळ दाणे, चटपटीत हरभरे,भडंग, तिखटा मिठाच्या पुऱ्या, पेढे, बत्तासे,बोर,जांभूळ,उसाचा रस,सरबताच्या तऱ्हा,बर्फाचा गोळा असे च्याऊ म्याऊ पदार्थ सुद्धा होते. जेवणातले पदार्थ तर नुसत्या डोळ्यांनी बघून पोट भरलं होत. त्या नंतर आई या विषयावर गाण्याचा कार्यक्रम केला आणि परत जाताना प्रत्येकाला शामची आई पुस्तक भेट दिलं होतं.
आता थोडं बापाबद्दल.
पूर्वी घरा घरात बापाची मुलांवर म्हटलं तर दहशत असे. त्या मुळे घाबरण्यासारखं काही झालं की लगेच तोंडात अरे बापरे शब्द यायचेच. त्या काळी, आई कुठे काय करते असं असल्यामुळे प्रत्येक हवी असणारी गोष्ट आई मार्फत बापाकडे पोचायची. सगळ्यात जास्त भीती वाटायची ती प्रगतिपुस्तकावर सही घेताना. असं असलं तरी संकट मोचक सुद्धा बापच असायचा. स्वतःच्या फाटक्या धोतराला गाठी मारून नेसायचा पण पोरांना काही कमी पडू द्यायचा नाही. पोर आजारी पडलं तर व्याकुळ होऊन धावाधाव करणारा बापच असायचा.आता काळ बदलला. अहो बाबा जाऊन ए बाबा झाला आणि तेंव्हापासून तो मित्र झाला. विश्वासानं बापाला सगळं सांगितलं जायला लागलं.जॊ अगदी जवळचा असतो त्याला आपण एकेरी संबोधतो, म्हणून तर देवाला सुद्धा अरे देवा म्हणतो नाही का ? तसच काहीस बापाचं झालं आहे. त्याच प्रतिबिंब दमलेल्या या बाबाची कहाणी सारख्या गाण्यातून उमटताना दिसतंय.
तू लिहिलेल्या देवदास सिनेमातल्या इश्श सारखं , हम आपके है कोन मध्ये मधून मधून आंहा असा आवाज येतो.
शेवटी कानातली फिरकी पडल्याचं लिहिलं आहेस ते वाचताना मला मात्र बुगडी माझी सांडली गsss गाणं आठवलं.असो मिळेल ती आज ना उद्या नाही तर म्हणत बसशील
अगं आई गं आता काय करू मी.
प्रसाद जोग.सांगली
Very nice
ReplyDeleteVE ry nice
ReplyDeleteFeeling great !! Thank you all !!!
ReplyDelete