Glorious ... Superb ... !

 

        काल रात्री  घरी ब्रम्हकमळं फुलली होती.   एका लहानशा झाडाला चार !    तशी दरवर्षी फुलत आहेत. ... अगदी १७-१८ एकावेळी ,  पण फक्त एक जरी फुललं, तरी त्याचा थाट वेगळाच असतो ... संध्याकाळी ते उमलायला लागल्यापासून सगळंच स्पेशल वाटतं ... रात्रीची वेळ,  हवा गार असते, सगळं शांत वातावरण आणि हे सुंदर फूल ... पांढरं शुभ्र आणि मंद सुखद सुवास ... अगदी  pristine, divine  ... त्याच्याकडे नुसतं पाहीलं तरी शांत वाटतं, आणि पहातच बसावसं वाटतं  ! ..." हे खरं ब्रह्मकमळ नाही ... साधं एक पानफुटीचं फूल ... एवढं काय त्यात ... " वगैरे म्हणतात काही लोक ,  पण त्या म्हणण्यामुळे या फुलाचं सौंदर्य कमी होत नाहीच ... !

    तशी खरं तर सगळीच फुलं सुंदर असतात ... अगदी घाणेरीचं सुद्धा ... पण अपवाद आहे एक ... Rafflesia  नावाचं फूल.   ते जगातलं सगळ्यात प्रचंड फूल आणि वास म्हणाल , तर न बोललेलंच बरं ... मलेशिया आणि तिथल्या जवळपासच्या देशांतल्या जंगलात उगवतं ... ते सोडून द्या  झालं ...

    तर फुलं म्हणजे काय वगैरे scientific चर्चा सोडली, तरी एक मजेदार माहिती आहे ... ती म्हणजे जगातली निसर्गाने प्लॅन केलेली आद्य जाहिरात म्हणजे फुलं !! ... कीटक - पक्षी यांना आकर्षित करायला ! म्हणजे त्यांच्यामुळे पराग दुसऱ्या फुलांत जाऊन फलधारणा होते . त्यासाठी मग रंग, सुगंध, निरनिराळे आकार ! ... काही तर फक्त एकाच तऱ्हेच्या किड्यासाठी  'made to order'  आणि त्याबरोबर काही फुलांत मध free  !   म्हणजे जाहिरातींचं युग आपण पृथ्वीतलावर अवतरण्याआधीच सुरु झालं ... !

    फुलांच्या जन्माचा इतिहास तसा लाखो वर्षं जुना आहे.   पण त्यानंतर आपल्या दंतकथा, पोथ्या-पुराणं आणि रामायण-महाभारतात आणि संस्कृत साहित्यातही फुलांची सुंदर वर्णनं आहेत, आणि त्यातली सर्व नावं आजही प्रचलित आहेत. असो ..

    श्रावण म्हंटला की सगळं जग पावसाचं, ढगांचं वर्णन करतं, त्यात हरवून जातं ... पाचूची बेटं, हिरवळ, पानोपानी थेंबांची नक्षी , यातच गुंतलेलं असतं ... मला ह्याच बरोबर त्या बेटांवर उमलणारी, हिरवळीत डोलणारी, पानांमधून डोकावणारी किंवा त्यांच्यावर डोकं काढून बसणारी फुलंच खूप आवडतात ... तशी कोणती ना कोणती फुलं प्रत्येक मौसमात फुलतच असतात, सुंदरच दिसतात , पण कधी कधीआपलं दुर्लक्ष मात्र होतं .   जास्वन्द, स्वस्तिक, कण्हेर, कर्दळ सारखी वर्षभर फुलं तितकीच सुंदर दिसतात .!..केतकी गुलाब जूही चंपक बन फूले... असं आपण म्हणतोच म्हणा ! ... पण कमळ म्हटलं की आपण आधी पहातो ... कारण ते त्या मानाने क्वचित दिसतं  !   त्यात कमलिनी म्हणजे दिवसा फुलणारं कमळ - सूर्यविकसी कमळ ! आणि कुमुदिनी म्हणजे रात्री फुलणारं  चंद्रविकसी कमळ !    आपल्या सर्व पूजांमधे अनेक फुलांचा उल्लेख असतो ... चंपक, पुनाग, मालती !   मग देवांच्या आवडी निवडी ... गणपतीला लाल, शंकराला पांढरं, कुणाला चाफा वर्ज्य... प्रत्येक देवाच्या आवडीनिवडी, केवडा कधी, तुळस-मंजिरी कधी !   कृष्णाला गुलाबी रंगाचं कांचनाचं फूल आवडतं, हे मला गुगलनी सांगितलं !   कृष्णाने राधेला युतिका या फुलाचं वर्णन केलं ... ही युतिका कोण , तर जुई !   आणि तिच्या बहिणी जाई, चमेली, सायली !   महादेवांना तपातून-समाधीतून भूतलावर आणायला मदनाने ५ बाण मारले, त्यातला एक म्हणजे मदनबाण हे फूल ! ...मोगऱ्याच्या तऱ्हेच्या या फुलाचा इतका सुंदर सुगंध ! साहजिकच आहे तपोभंग होणं ... ! 

    फुलांबद्दलच्या आणखी ही खूप गोष्टी आपण ऐकत आलो आहोत ... सगळ्यात जुनी गोष्ट पारिजातकाची! ... कृष्णानं स्वर्गातून आणलेलं झाड ... इतकी सुंदर, नाजूक आणि सुगंधी फुलं ... सत्यभामेसारख्या तरुण , सुंदर, राजस युवतीला आवडली नाहीत  तरच नवल !   पण ही फुलं मात्र पडतात रुक्मिणीच्या दारात  !    सत्यभामेच्या मनातला हा सल, आपल्यापर्यंत पोहोचवला माणिक वर्मा यांनी ... सुंदर गाण्यातून !   इतकं सुंदर आणि नाजूक फूल.. आज इतकी युगं लोटली, तरी आपण ही गोष्ट विसरत नाही . हे फुल आपण कधी ही झाडावरून तोडत नाही , पायदळी येऊ देत नाही, आणि ती डोक्यात माळणं , हा आपण देवांचा आणि त्या फुलाचा उपमर्द समजतो !

    पारिजातकासारखंच अजून एक स्वर्गातून आलेलं फूल आहे, पण त्याचा विशेष गाजावाजा नाही ... सोनटक्का !   बंगलोरमधे एक पांढरा रंग आणि दुसरा प्रकार म्हणजे सोनेरी !   सोनसळी पिवळा म्हणू हवं तर !   सुगंध तर जगावेगळा !  दुपारी उशिरा फुलतं ते इथे, आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सुगंध रेंगाळत असतो !   त्याची गोष्ट इथे दक्षिणेत आल्यावर कळली.   महाभारतात पांडव १४ वर्ष वनवासाला गेले असतानाची.  एकदा द्रौपदी कंदमुळं, फुलं आणायला गेली असतांना , वाऱ्याच्या झुळकीवर तिला हा सुगंध जाणवला.   तिनं भीमाला सांगितलं की " ती फुलं मी खूप शोधली, पण मला काही ती सापडेनात.   मला ती हवीच आहेत. "  भीम ती फुलं शोधायला निघाला ... त्या सुगंधाचा माग काढत तो एका पर्वताच्या दिशेने चालू लागला.   वाटेत त्याला एक म्हातारं वानर बसलेलं दिसलं ... तेच त्याचे देव- बंधू .. श्रीहनुमान  आणि मग ती न उचलता  येणाऱ्या शेपटीची गोष्ट ... भीमाचं गर्वहरण झाल्यावर ,त्याने हनुमानाला त्याच्या येण्याचं कारण सांगितलं.   तेव्हा श्रीहनुमान म्हणाले तो सुगंध आहे सौगंधिका ह्या फुलाचा आणि ते तुला इंद्राच्या बागेतच सापडेल !    त्यांनी सांगितल्याप्रमाणे भीम निघाला आणि ही सौगंधिका पृथ्वीवर आली !   सौगंधिका ... किती सुंदर नाव ... आणि नावाप्रमाणेच फूल ... ! 

    आणखी एक अशीच सुंदर गोष्ट ... बरीच अलीकडची ... पण तसंच सुंदर फूल !  ब्रिटिश काळातली गोष्ट. त्या काळी ब्रिटिश army officers आपापल्या भागातल्या सगळ्या गोष्टी, माहित्या गोळा करत असत ... वेरूळची लेणी, कित्येक जुनी देवळं, काही भौगोलिक चमत्कार, नद्यांचे उगम त्यांनी असेच शोधून काढले, त्यांना सापडले किंवा त्यांनी त्याबद्दल लिहून सर्वांपर्यंत पोहोचवले.    तर असेच दोन officers जंगलात चालले होते, तिथल्या झाडांची, पानाफुलांची गणती, वर्गवारी वगैरे करत ... तिथे एका जागी त्या दोघांना एक अतिसुंदर फूल दिसलं ... !    इतकं सुंदर की एक म्हणाला "Glorious," तर दुसरा म्हणाला "Superb " ... आणि त्या फुलाला नाव मिळालं ... Gloriosa superba  !     कदाचित हे एकच फूल असेल , ज्याच्या नावात काहीही शास्त्रीय नाही ... न त्याच्या botanical फॅमिलीचं नाव,  न त्याच्या  species, variety चं किंवा शोधणाऱ्याचं  !   जगभर त्याचं हेच नाव ... त्याला कॉमन भाषेत tiger claw lily, fire lily म्हणतात ... केशरी-लाल-पिवळ्या रंगात अक्षरशः  नाहून निघालेलं ... आपलं  'कळलावी' चं फूल !   


ह्या फुलाचा एक स्टॅम्प आपल्या पोस्ट खात्याने १९७७ मध्ये काढला होता  ! जांभळ्या बॅकग्राऊंडवर ते आणखीनच खुलून दिसतं !!

    देव, वैज्ञानिक यांचं सोडा, आपण साधे लोक ... आपणही भरपूर कविता-कथा करतोच नं फुलांवर !    ज्ञानेश्वर माउलींना  'मोगरा  फुलला' लिहावंसं वाटलं, सगळे कवी त्यावर लिहीत गेले ... कोणी 'आले रे बकुळ फुला'  म्हणालं ... कुणाला वाटलं - आज ... चाफा बोलेना ... कुणी तरुणी म्हणाली ... माळ्याच्या मळ्यामंदी, पाटाचं पाणी जातं ... गुलाब जाईजुई मोगरा फुलवितं ... !    माझा स्वतःचा कल गुलाबाकडे विशेष नाही.   आपला आवडता देशी गुलाब सोडला , तर बाकी सर्व गुलाब लांबूनच पहायचे ... हात लावला तर आपल्याला काटे बोचतात, किंवा त्यांच्या mentors ना काटे टोचतात ... त्यापेक्षा आपण लांबच बरं ... !   गोव्याच्या सुरंगीच्या गजऱ्याचं नाव खूप आहेच !   तसंच दक्षिणेत मोगऱ्याच्या फुलांना - विशेषतः गजऱ्याला फारच महत्व.   रोज केसांत तो हवाच  ... सौभाग्यलक्षण !  इथल्या वातावरणात मोगरा वर्षभर फुलत असतो .

    आता लिखाण संपत आलंय , तर माझी स्वतःची गोष्ट हवीच !   मी जेव्हा विवेकला भेटायला मद्रासला गेले तेव्हाची.   आमच्या गप्पा वगैरे झाल्यावर तो मला स्कुटरवरून चक्कर मारायला घेऊन गेला ... समुद्रकिनारा ... मरीना बीच !   तिथे गजरेवाले सगळीकडे !   विवेकनी विचारलं, "गजरा घ्यायचाय ?"    "आत्ता इथे ?" ... माझ्या मनात आलं ... गजरा घ्यायचा कविसंकेत बहुतेक माहीत नाही  'स्वारी' ला  !   तो गजरा घेतोय, म्हणून आमचा वेलू जायचा गगनावरी ... आणि घरी मोठ्या लोकांच्या बोलण्यात काही फिसकटलं, तर मग यायचा तो  धाडकन जमिनीवर खाली... म्हणून तेव्हा मी नको म्हटलं  ...                  .....आता रोज घालते ... !!!


- सौ अलका कुंटे,  बंगलोर 

   +९१ ८७६२३ १६३८५

Comments

  1. 'जगातील आद्य जाहिरात म्हणजे फुलं',फुलाबरोबर मध free,
    कल्पना भारी आहे.
    मी गोव्याला ३५ वर्षे होते,पण मला सुरंगीचा रंग आणि वास बिलकुल आवडला नाही.

    ReplyDelete
  2. अलकाचे चणे कुरमुरे

    Glorious ... Superb ... !

    बागांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगुळुरुच्या लालबागेमध्ये सध्या म्हणजे १७ ऑगस्ट पर्यंत वार्षिक Flower show सुरु आहे. याच शहरात रहाणाऱ्या अलकान फुलावर लिहिणं क्रमप्राप्त होत. गेल्या वर्षी अलका आणि विवेक यांच्यामुळे आम्हाला हा Flower show बघायला मिळाला आणि खरोखर डोळ्याचं पारणं फिटलं.

    अलकाने अब तक ५६ म्हटल्या प्रमाणे असंख्य फुलांची त्यांच्या वैशिष्ठ्यांची आणि वेगवेगळ्या सुगंधाची माहिती करून दिली . वाचताना खूप मजा तर आली आणि डोळ्यापुढे गेल्या वर्षी पाहिलेला तिथला Flower show उभा राहिला.

    Alka and Vivek thank you once again for the life time memorable experience.

    मराठी काय हिंदी काय ? चित्रपटसृष्टी मधल्या गाण्यांमध्ये फुलांचा उल्लेख येतोच येतो. तरुण तरुणीचं प्रियाराधन सुरु असताना अंकुरलेल्या भावनेला शब्दबद्ध करताना पी. सावळाराम म्हणतात *गंध फुलांचा गेला सांगून,तुझे नी माझे व्हावे मिलन* आणि शांताराम नांदगावकर म्हणतात *रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली* तर गीतकार इंदिवर लिहितात *फूल तुम्हें भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है ,प्रियतम मेरे मुझको लिखना, क्या ये तुम्हारे काबिल है* प्रातिनिधिक म्हणून थोडी गाणी दिली .

    १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणजे तर जगभर प्रेमाची कबुली देण्यासाठी असलेला खास दिवस त्या दिवससाठी बॉबी व्हिन्टोन कविता करतात

    Roses are red, my love, doo-roo-roo-roo

    A long-long time ago, on graduation day
    You handed me your book, I signed this way

    Roses are red, my love, violets are blue
    Sugar is sweet, my love, but not as sweet as you

    We dated through high school, and when the big day came
    I wrote into your book, next to my name

    Then I went far away and you found someone new
    I read your letter, dear, and I wrote back to you

    Is that your little girl? She looks a lot like you
    Someday, some boy will write in her book too

    Roses are red, my love, violets are blue
    Sugar is sweet, my love, but not as sweet as you

    Song by *Bobby Vinton*

    शेवट करताना अलकान लिहिलं की ती रोज केसात गजरा घालते. दक्षिणेत डोक्यात माळतात तसा गजरा अलकाला घालायचा असेल तर तिच्या लांबसडक केसांसाठी किमान तीन फूट लांबीचा गजरा लागेल.

    माझ्या बागेत देखील भारतीच्या हौसेमुळे खूप फुलझाडं आहेत. त्या बाबतीत ती सोस मावशी आहे. काही दिवसांपूर्वी त्यातल्या एका फुलाकडे लक्ष गेलं आणि निरखून पाहिलं तर त्यात मला दोन हंस दिसले आणि मग आठवलं गाणं

    *दो हंसोका जोडा*

    प्रसाद जोग.सांगली

    ReplyDelete
  3. अलकाचे चणेकुरमुरे नेहमीप्रमाणे लाजवाब. प्रसादचा प्रतीसादहि मस्त. दोन्हीवर अभीप्राय लिहीणे आपल्या कुवतीबाहेरचे आहे.

    तरीहि वाचताना दोन आठवणी ताज्या झाल्या.

    पहिली म्हणजे
    ती फुलराणी, तीची फुले विकतानाची साद तसेच तीचे फेमस स्वगत. (स्वगत पूर्ण आठवत नाही. प्रसाद जर रेकाॅर्डेड असेल तल प्लीज शेअर कर किंवा फुलांवर एवढ सुंदर लिहून अलका तूही फुलराणी झाली आहेसच तर तुझ्या आवाजात स्वगत रेकाॅर्ड करुन पाठवलेस तर जास्त आवडेल)

    दुसरी आठवण
    Gloriosa Superba हे एक Medicinal plant जे Glory Lilly म्हणूनहि ओळखले जाते. याचा अभ्यास करताना कळले की ह्याची फुले फळे व पाने हि तापावर अंगदुखीवर अत्यंत गुणकारी आहेत व allopathic medicine मधे याचे extracts आलेत पण आधीपासुनच आपल्या आज्जीच्या बटव्यात gloriosa superba फळ पान व फुल होती व आहेत. ती तेलात उकळून मसाज खुप गुणकारी वेढनाशामक आहे.

    परत येऊ, अलका खुप सुंदर. पुढच्या Blogची वाट बघतोय.
    👌👌👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संध्याछाया भिवविती हृदया ...

Black is beautiful

पुरुषोत्तम मास