Glorious ... Superb ... २
फुलांबद्दल कितीही बोललं, कितीही लिहिलं, तरी काहीतरी राहूनच जातं. प्रत्येकाची आवड वेगळी, आठवण वेगळी, आणि त्या मागची भावनाही वेगळी ! सगळीच फुलं स्पेशल ... निशिगंध आणि रातराणी, दोन्ही संध्याकाळच्या सुवासाबद्दल प्रसिद्ध, पण किती वेगळी फुलं ! तशीच अबोली - अबोली रंगाची ! पण माझ्याकडे 'हिरवी' अबोली होती ! ह्याला काय म्हणावं ? मी नुकतीच पिवळी - अगदी हळद पिवळी - अबोली पाहिली, आता जांभळ्या अबोलीच्या शोधात आहे ...! कोरांटी ... गुलाबी, जांभळी, पांढरी, केशरी ... आणि माझ्या घरी लाल ! जास्वंदीही अशीच.. .. वेगवेगळ्या रंगात !
ही झाली नेहमी दिसणारी फुलं ! झेंडू - शेवंती आणि रंगीत शेवंती म्हणावी अशी asters, आपण सणा-समारंभात पहातोच ... आणि कौतुकाने पहातच रहातो ...!
प्रसिद्ध कवी William Wordsworth एकदा असेच दऱ्याखोऱ्यात हिंडत असतांना त्यांना daffodils च्या फुलांचे ताटवे दिसले, अगदी नजर पोहोचेल तिथपर्यंत ... हवा तेवढा वेळ पहात होते. नंतर त्यांनी त्यावर एक कविता लिहिली, आणि ती फुलं दिसेनाशी झाली, तरी केवळ त्या आठवणीने त्यांना अतिशय आनंद होत असे. ते लिहितात,
For oft , when on my coach I lie,
In vacant or in pensive mood,
They flash upon that inward eye,
Which is the bliss of solitude,
And then my heart with pleasure fills,
And dances with the Daffodils !
खरंच, खूप वेळा पाहिलेली , किंवा कधी कधी अचानक दिसलेली, क्षणा-दोन क्षणांत डोळ्याआड झालेली फुलं, ताटवे , कधी तर फुलांची शेतं ... ! त्यांची नुसती आठवण झाली की ही किती खूष होतं मन ! हे मी खूपदा अनुभवते ... आजकाल ! बंगलोर-पुणे रस्त्याने प्रवास आता सवयीचा झाला आहे. आणि दर ऋतूंमधे दिसणारी दृश्यं - बदलता निसर्ग ! पहिल्याच प्रवासात आजूबाजूची हिरवी गार शेतं, आणि त्यांचे वेगवेगळे आकार, लांबलांबच्या निळसर दिसणाऱ्या टेकड्या, आकाशातले ढग ... बघता बघता मधेच शेताचा एक चौकोन - पिवळा धमक - सूर्यफुलांची शेती ! किती फुलं ती आणि मोठी मोठी, सगळी सूर्याकडे तोंड करून हसताहेत !.... मला स्वतःला सूर्य दिसल्याशिवाय दिवस उजाडला आहे , असं वाटतच नाही ... ते ऊन दिसेपर्यंत मरगळलेला जीव ताजातवाना होत नाही ... आणि इथे बंगलोरमधे सूर्य नेहमीच सुट्टीवर ... सगळा वेळ ढग ... माणसाला उत्साह तरी कसा वाटावा ? माझा मामा म्हणायचा, "तू काय sunflower आहेस का ? एवढं काय त्या उन्हाचं कौतुक ... " ... ते सगळं आठवलं, आणि मी अल्मोस्ट उडी मारून, मागे मान वळवून वळवून, ते शेत दिसेनासं होईपर्यंत बघत राहिले ! अशीच शेतं झेंडू आणि शेवंतीची ! अगदी आखीव-रेखीव ... पिवळा झेंडू, केशरी गोंडेदार झेंडू आणि मग शेवंती ... पांढरी आणि पिवळी ! प्रवासात ही सगळी दिसतात नवरात्राच्या आधी ... साधारण सप्टेंबर मधे !
दसरा - दिवाळी संपावी आणि डिसेम्बर यावा, तसा ह्याच रस्त्यावर पुणं आलं , की केशरी झेंडे ...जिकडे तिकडे कॉसमॉस ची फुलं . पूर्वी शिरवळ पासून दिसायची, ती दर वर्षी पुढे पुढे सरकत सरकत आता साताऱ्यापासूनच दिसतात ! केशरी रांगा, रस्त्याच्या कडेपासून ते almost डोंगरमाथ्यापर्यंत ! किती बघू आणि किती नको, असं होतं ! तशीच कारवीची फुलं ... फिक्कट गुलाबी डोंगर माथ्याकडे घाटात ! ही दृष्य अगदी काही सेकंदच दिसतात, आणि मग त्या कवितेसारखी कधी कधी आपल्या डोळ्यासमोर तरळून जातात ! कधी विसरलेच तर फोनवर वेगळंच काहीतरी शोधतांना पुन्हा पुन्हा समोर येत रहातात ! पंजाबमधे 'सरसोंके खेत' ही असेच पिवळे-पिवळे क्षितिजापर्यंत ... मी आपलं DDLJ मधे पाहिलेलं ... पण ती हिरॉईन उगाचच मधे मधे करत असते, नीट काही फुलं पाहू देत नाही !
तशी बंगलोरमधे खूप फुलं असतातच. रस्त्यांवर दुतर्फा लावलेली मोठी झाडं ... आता कमी होत आहेत, पण दर सीझन मधे वेगळी फुलं, कधी बहावा फुललेला, तर त्याच्या मागोमाग गुलमोहोर - जॅकारंडा ! कधी गुलाबी टबुबीया ! शिवाय कॉपर-पॉड ची पिवळी फुलं आणि शिरीष तर आहेच ! आणि अजून एक Gliricidia - एकाच झाडावर गुलाबी रंगाच्या shades ! बंगलोरमधे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला फ्लॉवर शो असतो ... जवळजवळ नऊदहा दिवस प्रत्येक वेळी. डोळ्यांचं पारणं फिटतं ! इतक्या रंगांची, आकाराची फुलंच फुलं ... !
तरीही काही गोष्टी ह्यांच्या वरचढ असतातच ! आणि दूरचे डोंगर जास्त छान वाटतात ...तसंच काहीसं ..... 'Valley of flowers' ! तिथे जायचंच आहे ....कसं... 'काशीस जावे नित्य वदावे' तसं ! तिथे म्हणे रोज नवीन तऱ्हेची फुलं ... आजचं उद्या नाही ... वेगळे रंग, वेगळे आकार ! माझा मित्र तिथे जाऊन आला, मग त्याला इथलं सगळं निरस, बेरंग वाटायला लागलं ... ! "अरे ही पहा, माझी बाग" ... "ऊँ, त्यात काय एवढं ... VoF पहा !" पण आता ही VoF आपल्या खूप जवळ आली आहे ... कास पठार ... ! जो उठतो , तो कासच्या फुलांचं वर्णन ... आता 'कास ला जावे नित्य वदावे , असं झालंय... एकदा गेलो ही, पण घाईघाईत प्लॅन केल्यामुळे ते पठार पावसात अक्षरशः झोपलं होतं ... औषधालाही फूल नव्हतं ... ! पण जाऊ परत ... एकदा केव्हातरी ! कर्जत जवळ एक गाव आहे म्हणे ... 'पळसदरी'... तिथे पळसाच्या फुलांनी आसमंत लाल झालेला दिसतो म्हणे !...उटीचं botanical गार्डन ही फुलांनी बहरलेलं ... नजर ठरत नाही ...!
पण माझी ही फुलांची हौस पूर्ण झाली , मागच्या वर्षी ! आम्ही सिंगापूरला गेलो, तेव्हा मनीष तिथल्या Orchid Garden ला घेऊन गेला ... इतकी फुलं इतकी फुलं, रंगच रंग, सुगंधच सुगंध ...
अगर फिरदौस बरू ए जमीं अस्त ...
हमीं अस्त , हमीं अस्त , हमीं अस्त ...
जहांगीर बादशहाला काश्मीर पाहून असं म्हणावसं वाटलं ... मला ते सिंगापूरचं orchid garden पाहून तसं वाटलं ! किती तास चालत होते, भान हरपून ... मग केव्हातरी भुकेची, उन्हाची, पाय दुखायची जाणीव झाली ... आणि नाईलाजाने परत फिरले ...
... तशी माझ्या बागेतही फुलं आहेत, काही नेहमीची, काही कधीकाळीच उगवणारी, पण रोज सकाळी त्या एवढ्याश्या पट्टीत जायचं, देवासाठी एका मिनी परडीत झाडावर असतील , त्यातली अर्धी फुलं काढायची ... सगळ्या झाडांशी गप्पाटप्पा, कुणाला टपली, कुणाचे लाड ... म्हणजे पुढचा सगळा दिवस मस्त जातो, एक नशा चढल्यासारखा ... त्या फुलांवर आपलं ही मन फुलपाखरांसारखं बागडत असतं ... अजून काय पाहीजे .....आपण खूष एकदम ! ....
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
फुलं म्हणजे फुलं कितीतरी प्रकारचे फुल कुठली कुठली नाव घेऊ असं वाटतं कोणीतरी फुल दाखवला पण समोर मात्र एकदम छान पांढर फुललेलं आणि खूप वासाचा आहे असं त्यांचं म्हणणं आता आपण तर काही कधी अशी फुलं पाहिलेली नाहीये आपण फक्त गुलाब मोगरा आणि चाफेच्या पुढे गेलो लोक नाही पण तू छान केलं.
ReplyDeleteअंजना ओक
ReplyDeleteअलकाचे चणे कुरमुरे
ReplyDeleteGlorious ... Superb ... २
हल्ली फक्त एक चित्रपट निघत नाही तर त्याच चित्रपटाचा दुसरा, तिसरा क्वचित चौथा भाग सुद्धा येतो तसं आलकान पहिल्या ब्लॉग मध्ये राहिलेल्या गोष्टी सांगण्यासाठी पहिल्या ब्लॉगचा Sequel लिहिला.
जगभरातले प्रवासी युरोपात गेले की अँमस्टरडॅम इथे जाऊन ट्युलिप गार्डन बघतात. मी सुद्धा बघून आलो. सिलसिला चित्रपटात या बागेचं दर्शन *देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए* या गाण्याच्या वेळी होत. आता अशी ट्युलिप गार्डन काश्मीरला दाल लेक जवळ इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन विकसित केली आहे.
एकमेकांना भेटताना वातावरण सुगंधी आणि प्रसन्न व्हावं म्हणून पुष्पगुच्छ देण्याची प्रथा सुरु झाली. विम्बल्डनच्या अंतिम सामन्याला खेळाडू कोर्टवर येतात त्या वेळी त्यांना आधी सुंदर फुलांचा गूच्छ दिला जातो.
माधवराव पेशवे आणि निजामाची कुरुमखेडला भेट झाली होती.त्यातल्या एका प्रसंगाची आठवण मला झाली.
भेटीच्या पहिल्या दिवशी निजामल्ली भेट झाल्यावर सुगंधी फुलांसोबत नजराणा म्हणून तबकात रत्नजडित गुलाबाचे सुवर्ण फुल भेट दिले जाते.ते बघताच माधवरावांच्या तोंडून "सुरेख" असे उद्गार निघतात ,ते ऐकून निजामल्ली म्हणतात, "आपणास इतके आवडले असेल तर अश्या हैद्राबादी कारागिरीच्या वस्तू बनवून देऊ".त्यावर माधवराव म्हणतात "अशा भेटींच्या वेळी तलवार,कट्यार अशा गोष्टी दिल्या जातात त्या ऐवजी आपण फुल देऊन जी गुणग्राहकता दाखवली त्याला तोड नाही.
संध्याकाळी कमळ बंद झाल्यावर भुंगा त्यात अडकतो. तो मध खाण्यात मग्न असतो. पण तो कमळाच्या कोमल पाकळ्यांना किंवा केसरांना इजा करत नाही. उलट,तो फक्त रस पितो आणि सकाळी कमळ उघडल्यावर निघून जातो. हे निसर्गातील एक सुंदर प्रेम आणि सहजीवनाचे प्रतीक मानले जाते.
या वरूनच पुरषोत्तम दारव्हेकरांना काट्यार लिहिताना *घेई छंद मकरंद* या ओळी सुचल्या असतील.
याच्या अगदी विरुद्ध प्रवृत्तीची काही फुल असतात.ही फुल सुवास देत नाहीत तर दुर्गंध सोडतात. त्याचा उग्र गंध कीटकांना आकर्षित करतो आणि किडा फुलावर बसला ते स्वतःला मिटून घेत आणि स्वतःसाठी अन्न मिळवतं. या प्रकारच्या फुलांमध्ये *कॉर्प्स फ्लॉवर',रॅफ्लेसिया अर्नोल्डी,हायडनोरा आफ्रिकाना* ही फुल येतात .आहे ना निसर्गाची विविधता.
शेवटी एक मजा सांगतो. एकदा एक कुडमुडा ज्योतिषी दारात आला आणि म्हणाला तुमच्या मनात काय आहे ते मला कळते बरोबर आलं तर भविष्य सांगतो म्हणाला आणि कागदावर एका फुलाचे नाव लिहून मुठीत ठेवा म्हणाला. सर्वसाधारणपणे अचानक असा प्रश्न विचारला की माणसाच्या डोक्यात पटकन गुलाब येतो. मी कागदावर फुलाचं नाव लिहून मुठीत ठेवला.मग त्याने इकडच्या तिकडच्या लंब्या चौड्या बाता मारल्या आणि एकदम म्हणाला हातातल्या कागदावर गुलाब लिहिलं आहे, दाखवा तो कागद आणि बरोबर आलं असेल तर पैसे द्या..त्याला कागद दिला त्यानं उघडून पाहिला आणि एकदम गप्प झाला मग म्हणाला तुम्हाला भविष्य सांगण्यात काही अर्थ नाही असं म्हणून निघून गेला,कारण मी कागदावर *धोत्रा* लिहिलं होत.
पण अलकानं दोनदा सुगंधाचा दरवळ पसरवला आणि मला रणजित देसाई यांनी लिहिलेल्या, हे बंध रेशमाचे नाटकासाठी शान्ता शेळक्यांनी लिहिलेले गाणं आठवलं
*आज सुगंध आला लहरत*
जेवि उपवनी माधवी
मी तेवी धुंद !
मधुमासातील सुख नवे तैसा
हा वाहे आनंद माझा !
प्रसाद जोग.सांगली.