शास्त्र काय म्हणते ...


    भाद्रपद महीना म्हणजे गौरी-गणपतींचे दिवस.   सणाचा उत्साह आणि थोडाफार धाकही.   एकवेळ गणपती बाप्पा जरा इकडे तिकडे झालं, तर चालवून घेईल, पण गौरींचं सगळं नीट झालंच पाहिजे.   त्यात 'चुकीला माफी नाही', ... असा आपला विचार असतो असतो.    नुकतीच एका गौरीच्या जेवणाच्या दिवशी बहिणीकडे गेले होते.   सगळं साग्रसंगीत, व्यवस्थित ... सर्व नैवेद्य, सर्व उपचार, पूजा अर्चा सगळं नीट आणि वेळेत ! जेवणं झाल्यावर गप्पा !! ... बहीण हे सगळं करून 'दमणूक' ह्या शब्दाच्या पलीकडे पोचली होती.    १६ भाज्या, ५ कोशिंबिरी, ५ पक्वान्नं, तळण पाहिजे, ताटाच्या पूर्ण परिघावर आणि मधे पदार्थच पदार्थ !! मुंगीला पाय ठेवायला जागा नाही अक्षरशः !!आणि आरतीच्या वेळी नैवेद्य, कुठे हातावर  ठेवलेला खाऊ , नाहीतर वडी वगैरे  तयारी आणि हे जेवण, स्वयंपाक .. आता होत नाही एवढं सगळं, वय झालं  ... वगैरे ...मधेच कोणीतर म्हणालं ,  'शास्त्र काय सांगतं , ते आणि तेवढंच करावं ' ... 

    आणि विचारांचा नुसता गदारोळ ... माझ्या मनात आणि समोरच्या संभाषणातही ... खूप वेगवेगळे विचार ! सगळेजण तिचं कौतुक करत होते ... ह्या वयातही हे सगळं करते ... पण मला वाटत राहीलं की ह्यात काहीतरी बदल हवा आहे ... high time की आपण हे सर्व बदलावं ... आपल्या मागच्या पिढीपर्यंत आपल्या आई-आजी हे सगळं करत होत्या ... आपणही करतोय, पण पुढच्या पिढीला शक्य होणार आहे का ?त्यांना नुसती नावं ठेवत , "गेले ते दिवस " ...म्हणत आपलं  रडगाणं गाणं , आता पुरे नाही का झालं ? ... आपली आई-आजी सोवळ्याने स्वैपाक करत असत ... पहाटे ४ वाजल्यापासून जे कामाला जुंपल्या जायच्या ते दुपारपर्यंत धबडगा चालूच ... घरातली बरीच माणसं, पाहुणे-राऊळे, जेवायला बोलावलेल्या सवाष्णी, २५-३० किंवा जास्तच माणसं जेवायला ... आता शक्य आहे का हे सगळं ?    एकत्र कुटुंबात  माणसं असायची  घरातली, मदतीला ... मुलांकडे बघायला वगैरे,  त्यामुळे शक्य असे हे सगळं करणं , ३-३ पिढ्या नांदायच्या घरात . आता तसं नाही ...

    ... सगळं सोडून दिलं पाहिजे ,असं अजिबात नाही, आपली संस्कृती आपणच टिकवायला हवी, पण काही बदल केले तर ?   काही बदल आपण स्वीकारले.   १६ वेगळ्या भाज्यांची  आपण एक mix भाजी करतो .   आजकाल काही ठिकाणी पंचपक्वान्नांत विकत आणलेल्या मिठाया चालतात, ... सोवळं-ओवळं फारसं नसतं ... आता काही गोष्टी बदलायला हरकत नाही ... असे बदल होत गेले, म्हणूनच तर आपण आज इथवर पोचलो.   नाहीतर अजूनही ताम्र युगातच असतो.   वाईट प्रथा आपण मोडून काढल्या.   आता थोडं काळाभिमुख होऊन rituals बदलायला हरकत नाही.   आणि आपण ते करत आहोतच ...  शास्त्र काय सांगतं ते बघत बघत ... त्यातला मुख्य उद्देश न बदलता खूप काही होऊ शकतं ... आजकालचं जीवन-हवामान-प्रदूषण वगैरे बघत, तब्येतीला जपत, जे करता येईल ते करावं ...

    हे झालं खाण्यापिण्याचं - जेवणाचं ... पण अजून बाकी कितीतरी गोष्टी आपण खूपदा भीतीपोटी करतो, असं वाटतं.   आजकाल देवावर प्रेम करण्यापेक्षा, त्याचा आधार वाटण्यापेक्षा , त्याची भीती जास्त वाटते, असं होतं !   मीही त्यातलीच आहे.   हे केलं नाही, तर काय होईल, ह्या भीतीपोटी मी अनेक गोष्टी करते - खरं तर उरकते ... रोजचंच पहा .कधी कधी देवांची पूजा करायचा mood च नसतो,  कसल्या कसल्या चिंता, काळज्या, जीव खात असतात . कधी कुठली वेळ गाठायची असते, पण भीतीपोटी देवपूजा कशी तरी उरकायची ... कोणासाठी ?   कुणाला समाधान म्हणून ?   मला ? ... का कदाचित कोणी आलं, आणि त्यांनी देवघर पाहिलंच, तर त्यातलं निर्माल्य दिसून त्यांनी काहीतरी comment केली तर... म्हणून ?   नुसतं हात जोडणं, आणि आपली चिंता देवाला सांगणं, त्याला समोर येईल त्याला तोंड द्यायला बळ मागणं, पुरेसं नाही का ?...

    ही तर साधी रोजची उदाहरणं ... कधी कधी तर अजून वरच्या level चं काहीतरी होतं किंवा ते तसं आपल्याला वाटतं ... एकदा घरातल्या छोट्या मुलांनी मिळून घरी गणपती केला ... शाडूची माती on-line मागवून, एका  workshopला जाऊन ... कारण प्रदूषण टाळायचं म्हणून.  OK.   तर केली ती मूर्ती.   त्यानंतर पूजेला तो आणतांना त्याचा कान निखळला ... झालं ... लगेच पोटात, छातीत भीतीचा गोळा ... आता काय होणार ?   अरे बाबा, काय व्हायचंय ... मुलांनी केलेला गणपती, सहज म्हणून केलेला, त्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे काही नाही ... मुलांना संस्कार हवेत म्हणून हे सगळं करणं ... घाबरायचं कशाला  ?...त्यावेळी जे योग्य वाटेल , rational अस जो उपाय असेल ,तो करावा ...नाहीतर ...आपलं शास्त्र खूप सोपं आहे.   त्यात सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे ... सर्व सविस्तर सांगितल्यानंतर ... हे नसेल तर अमुक करा, असं झालं तर तमुक करा ... असे सोपे पर्याय सांगितलेले आहेत ...  

    अजून एक उदाहरण ....नवरात्रात अखंड समई हवी ... त्या रुजणाऱ्या धान्यांना उब मिळावी म्हणून लावलेली ... ती समजा विझली ... तर त्याचा संबंध मृत्यूशी कशाला जोडायचा ? तसंच असेल , तर आजकाल , अचानक वादळं , अवकाळी पाऊस , कुठे अतिवृष्टी वगैरे गोष्टी होत आहेत , आपल्याच चुकांमुळे आपला ऱ्हास होत आहे , आपली विनाशाकडे वाटचाल सुरू आहे , हे कसं लक्षात येत नाही ?  ती वादळं मानव जातीच्या मृत्यूचं भाकीत सांगत नयेत का ? आणखी एक मुद्दा ..आपल्या आधीच्या असंख्य नव्हे , तर निदान ४० पिढ्यात असं कधी झालंच नसेल का ?   का कधी कुणाकडे खिडकीतून वाराच आला नसेल ? ... चुकीचे विचार करत बसण्यापेक्षा , पुन्हा वात लावून सरून दिली की झालं ... अगदी शास्त्र संमत ... हात-पाय-डोळे धुवून, दिव्याला पुन्हा हळदकुंकू फूल वाहून दिवा पुन्हा लावणे ... !   शास्त्राने अनेक पर्याय सांगितले आहेत, त्या पळवाटा नाहीत, by-pass नाहीत, ते alternate मार्ग आहेत.   सहज सोपं केलेलं आहे.   देवाला पूर्ण जेवणाचा नैवेद्य दाखवायचा हे शास्त्र, पण स्वैपाक व्हायचा असेल, आजकालच्या पद्धतीने स्वैपाक कुठून यायचा असेल, बाहेर जेवायला जायचं असेल, तर दूधसाखर पूर्णान्न आहे, त्याचा नैवेद्य चालू नाही का ?    देवाला चालतो, चालत नाही तो आपल्याला ... उदा. ... नवीन गृहप्रवेश केल्यावर देवांची पूजा करून सर्व भांडीकुंडी, गॅस, शेगडी आणून मग स्वैपाक करायला संध्याकाळ होईल, त्यापेक्षा दूधसाखर चालली तर सर्व सभ्य वेळेत पार पडेल. आणि , हे आपण करतोही !

    अजून एक विचार ... नैवेद्य दाखवायच्या वेळेआधी घरातल्या छोट्या मुलांना भूक लागली , तर काय करायचं ?   ते खिचडी खाऊ शकत नाहीत.   हा प्रश्न मला पडला, तेव्हा मुलं लहान होती, मी सासूबाईंना विचारलं की आता कसं करायचं ?   आपल्याकडे काय असतं ... त्यावर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, जी त्यांना त्यांच्या सासूबाईंनी सांगितली होती ... "घरातल्या लहान मुलांना उपाशी ठेवून देव खूष होत नाही ... हे उपास-तापास, नैवेद्य वगैरे आपण सुरु केलेल्या गोष्टी आहेत ... नैवेद्य दाखवायला वेळ असो का काही असो, मुलांना वेळेवर वाढ/भरव ... आपल्या देवाला चालतं ... !    माझा जीव भांड्यात पडला ... मी मनात काहीही किंतु न बाळगता मुलांना वरण-भात वगैरे दिलं, पण मुलं कसली, त्यांना पुरणपोळीच हवी होती, गरम गरम ... त्यांची आजी करत होती, ती तव्यावरचीच ... आणि त्यांनी मुलांना ती वाढलीही  ... आनंदानी, हसत हसत, "अगं, हेच माझे देव ... हे खूष की मी खूष ... शेवटी शास्त्र शास्त्र म्हणजे तरी काय गं ... मला माझ्या सासूबाईंनी सांगितलं, ते माझं शास्त्र ... नाहीतरी आपापल्या घरातलं शास्त्र असंच तर आपल्यापर्यंत पोहोचतं ... आणि शेवटी आपले पर्याय आपणच शोधायचे !"   तेव्हापासून मला कधीही rituals ची भीती नाही वाटली ... आता मी निवांत असते ! 

    तसंही कोणत्याही पूजेला किंवा धार्मिक कार्यात आपला वाटा काय असतो, तर त्या पूजेची-विधीची तयारी करणं, सर्व वस्तुंची-गोष्टींची- पदार्थांची जुळवाजुळव करणं.   आणि आपण ते नीट निगुतीने, व्यवस्थितपणे करतोच.   तरी काहीतरी राहून जातंच ... खूप कामं असतात, खूप गोष्टींचं व्यवधान ठेवायचं असतं, काही सामान  बाजारातून आणायचं असतं, वेळेवर काहीतरी कामं उपटतात ... मग एखादी गोष्ट राहिली, म्हणून चेहेरा पाडून बसायचं, सगळ्यांना ओशाळं करायचं, का असू  दे, म्हणून पुढे जायचं हे आपल्या हातात असतं ... इथेही शास्त्र काय सांगतं पहा ... देवाची पूजा करतांना आपण म्हणतो, "...अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि "  ... म्हणजे काय सोन्याचे, फुलांचे अलंकार, किंवा जे काही कमी आहे, त्याच्या जागी देवा , तुला मी अक्षता वाहतो ... तर आपल्याकडे सर्वाला पर्याय आहे ... फक्त तो वापरायचा निर्णय आपण घ्यायला हवा ... ! !

   ... अरे बापरे, लिहिता लिहिता खूप उशीर झाला, भूक लागलीय, आता अंघोळीऐवजी नेत्रस्नान करून जेवूनच घेऊ का मी ... ?? 

....हा ही एक पर्याय आहेच की ...!!!


- सौ  अलका  कुंटे, बेंगळुरू 

   +९१ ८७६२३ १६३८५  

Comments

  1. एकदम बरोबर. गुळ खोबर्‍याचा नैवेद्य देवाला चालतो.बाकी सारे आपल्या पोटाचे च लाड.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you , प्रफुल ! 💐

      Delete
  2. शास्त्र म्हणजे निती नियम त्यामध्ये काळानुसार बदल व्हायला हवेत या बद्दल उदाहरणे देऊन उत्तम विवेचन केले आहे. पाप पुण्याच्या संकल्पना भिती निर्माण करून त्यांचं मनाविरुद्ध पालन करणं हे कोणत्याही धर्माला अपेक्षित नाहीच मुळी त्या मुळे कर्मकांडाचा अतिरेक करून भक्ती भावाची हत्या च होते असं मलाही वाटतं. लकी उत्तम प्रबोधन गणेश पर्वामध्ये👌🏽☺️ गणपती बाप्पा मोरया
    पुढच्या वर्षी नक्की या! आतुरतेने वाट बघतोय 🙏🏼

    ReplyDelete
  3. *अलकाचे चणे कुरमुरे*

    शास्त्र काय म्हणते...

    अलकानं गौरीच्या जेवणाच्या नैवेद्याच ताट आणि त्यातले पदार्थ लिहून चणे कुरमुरमुऱ्याची सुरवात केल्यावर मला *छप्पन भोग* असलेले ताट डोळ्यासमोर आलं. श्रीकृष्णानं काहीही न खाता पिता, सतत सात दिवस गोवर्धन पर्वत उचलून त्याच्या प्रजेला वाचवलं. म्हणून त्याला प्रत्येक दिवसाचे आठ प्रहर असे सात दिवस तो उभा होता म्हणून ७ X ८ = ५६ भोग त्याला अर्पण करायला सुरवात केली ते आठवलं.

    शास्त्र *काय काय* म्हणते.

    *वैश्वदेव*
    पूर्वीच्या काळी स्वैपाक पूर्ण झाला की त्याचा नैवेद्य दाखवायचे त्याला *वैश्वदेव* म्हणतात. पदार्थ तयार होत असताना नकळत जीव जंतूंची हत्या होते. त्याची क्षमा मागण्यासाठी वैश्वदेवाची पद्धत सुरु झाली.

    *चित्राहुती*
    पूर्वीच्या काळी जमिनीवर बसून जेवायचे. त्या अन्नाच्या वासाने आजूबाजूचे किडा मुंगी पानाजवळ आले तर त्यांना खायला मिळावं म्हणून जेवायला बसल्यावर ताटाभोवती प्रोक्षण करून बाहेर चित्राहुती तेव्हा असं शास्त्रानं सांगितलं.

    *श्रावणातल्या कहाण्या*
    अलकाने नैवेद्य दाखवायच्या आधी छोट्या मुलांना जेऊ घालण्याबद्दल लिहिलंय. अगं हेच तर *खुलभर दुधाच्या कहाणी* मधे लिहिलं आहे,आणि संत एकनाथांनी तहानलेल्या गाढवाला पाणी पाजून शास्त्र काय सांगते त्याचा परिपाठ समोर ठेवला आहे.

    नवरात्रीच्या अखंड दिव्याबद्दल लिहिलेले वाचताना मला मृत्यूनंतर पुढे दिवस वार होईपर्यंत अखंड दिवा तेवत ठेवण्यासाठी रात्री दचकून उठून दिव्यात तेल घालणारी माणसं माहीत आहेत. शास्त्र म्हणतं, जर दिवा विझला तर पुन्हा लावा त्यात अशुभ काही नाही. पण लोकांवर असलेला भीतीचा पगडा त्यांना जागरण करायला लावतो.

    देवांच्या पुजेबद्दल पूजा उरकली जाते असं तिनं लिहिलं आहे त्या वेळी आठवलं , *देव विसळले* असं म्हणणारी काही माणसं माहीत आहेत.

    चिं.वि.जोशी यांच्या *एकादशी आणि दुप्पट खाशी* या कथेप्रमाणे आपल्या रसनेला तृप्त करण्यासाठी आणि चोचले पुरवण्यासाठी त्याला शास्त्र आणि विधींची जोड दिली आहे.

    अशा लोकांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,

    *मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव*
    *देव असं भेटायचा नाही रे*
    *देव बाजारचा भाजीपाला नाही रे*

    प्रसाद जोग.सांगली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संध्याछाया भिवविती हृदया ...

Black is beautiful

पुरुषोत्तम मास