देवाण - घेवाण

     काही वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही नुकतेच स्वतःच्या घरात रहायला आलो होतो.     नवीन शेजारी - नवीन ओळखी. अधून - मधून पदार्थांची देवाण - घेवाण ही चालायची. एकदा दिवाळीच्या निमित्ताने तिने चकल्या पाठविल्या. अगदी खुसखुशीत. चकलीचा एक तुकडा खाता - खाता मी म्हटलं, " आता दुपारी लाडू करते. म्हणजे तिच्या बशीत घालून पाठवता येतील."    

 " you mean तू लाडूनी retaliate करणार ? " धाकटा म्हणाला .  

"ऑ , retaliate  काय?   त्याचा अर्थ ईट का जवाब पत्थर से . ते इथे लागू पडत नाही. ( काय रे, माझे लाडू काय पत्थर असतात ? ) आणि अरे, आपण भांडं रिकामं नाही पाठवत...."    

 "म्हणजे type of retaliate च. "     

माझ्या डोळ्यासमोर सीन उभा राहीला. तिच्या चकल्या, की माझे लाडू. तिचा केक की मी शिरा. ती श्रीखंड की मी पुडिंग ... अगदी टेनिस कोर्टसारखं .  फक्त   रॅकेटच्या ऐवजी झारा .... आणि दमछाक झाली की मग साखर घालून भांडं परत !  हुश्श  !

    ही देवाण - घेवाण असो की काही निमित्तानी प्रेझेंट देणे असो, मला सुचेनासं होतं.  हे कमी वाटेल का, ते जास्त होईल का, नुसते प्रश्न - नसते प्रश्न. मग 'प्ले सेफ'. एक फुलांचा गुच्छ !  नाहीतर चॉकोलेट !  प्रेझेंट देतांना लोकं काय - काय  विचार करत असतील, ते लोकंच जाणे. पण माझ्या मते घरातला 'न - कचरा' काढायचा तो राजमार्ग असावा ! आपल्या घरात , धड ठेववत नाहीत आणि टाकवत नाहीत अशा कित्येक वस्तू असतात ! तर कधी कधी त्यांच्या वाजवी किंमती पेक्षा 'सेंटिमेंटल' व्हॅल्यू ' अवाजवी असते !! लग्नापूर्वी शिवण शिकत असतांना एक झबलं शिवलं आणि ते एका मैत्रिणीला प्रेझेंट दिलं. दोन वर्षांनंतर माझ्याच मुलाच्या बारशाला मला ते परत मिळालं !     ते झबलं बरंच हिंडून - फिरून आलं असावं. कारण मी जिला दिलं तिचा आणि ज्या आजीबाईंनी मला ते दिलं त्यांचा संबंध येणंच शक्य नव्हतं !     मी ते झबलं लगेच ओळखलं ! ते बेततांना खालच्या कापडाचा एक टवका उडला होता आणि  तो झाकायला मी क्रोशाचं फूल करून त्याच्यावर लावलं होतं. ते ही तसंच होतं    ही घटना  झबल्याबद्दल बरंच काही सांगते, पण देण्या - घेण्याबद्दल ही सांगतेच नं  !     एकवेळ फु.गु. परवडला, पण हे असं

 पण आता पहा, देणाऱ्याचं मनही राखलं पाहीजे आणि असं सारखं retaliate करणं पण बरोबर नाही.   ' ईट का जवाब पत्थरसे ' असा हिंसाचार तर साफ चूक !

    आता या दिवाळीत आज उद्या मैत्रिणीने चकल्या पाठवल्या की मी दुसरी बशी समोर करीन .... ' करंज्या घालून पाठव ' म्हणून    म्हणतात नं, कोणी एका गालावर मारलं, तर दुसरा गाल पुढे करावा .... 

    तसंही  ..... आजकाल गांधीगिरीचा जमाना आहे,  तेंव्हा म्हटलं,  लगे रहो  .........!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland