देवाण - घेवाण
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही नुकतेच स्वतःच्या घरात रहायला आलो होतो. नवीन शेजारी - नवीन ओळखी. अधून - मधून पदार्थांची देवाण - घेवाण ही चालायची. एकदा दिवाळीच्या निमित्ताने तिने चकल्या पाठविल्या. अगदी खुसखुशीत. चकलीचा एक तुकडा खाता - खाता मी म्हटलं, " आता दुपारी लाडू करते. म्हणजे तिच्या बशीत घालून पाठवता येतील."
" you mean तू लाडूनी retaliate करणार ? " धाकटा म्हणाला .
"ऑ , retaliate काय? त्याचा अर्थ ईट का जवाब पत्थर से . ते इथे लागू पडत नाही. ( काय रे, माझे लाडू काय पत्थर असतात ? ) आणि अरे, आपण भांडं रिकामं नाही पाठवत...."
"म्हणजे type of retaliate च. "
माझ्या डोळ्यासमोर सीन उभा राहीला. तिच्या चकल्या, की माझे लाडू. तिचा केक की मी शिरा. ती श्रीखंड की मी पुडिंग ... अगदी टेनिस कोर्टसारखं . फक्त रॅकेटच्या ऐवजी झारा .... आणि दमछाक झाली की मग साखर घालून भांडं परत ! हुश्श !
ही देवाण - घेवाण असो की काही निमित्तानी प्रेझेंट देणे असो, मला सुचेनासं होतं. हे कमी वाटेल का, ते जास्त होईल का, नुसते प्रश्न - नसते प्रश्न. मग 'प्ले सेफ'. एक फुलांचा गुच्छ ! नाहीतर चॉकोलेट ! प्रेझेंट देतांना लोकं काय - काय विचार करत असतील, ते लोकंच जाणे. पण माझ्या मते घरातला 'न - कचरा' काढायचा तो राजमार्ग असावा ! आपल्या घरात , धड ठेववत नाहीत आणि टाकवत नाहीत अशा कित्येक वस्तू असतात ! तर कधी कधी त्यांच्या वाजवी किंमती पेक्षा 'सेंटिमेंटल' व्हॅल्यू ' अवाजवी असते !! लग्नापूर्वी शिवण शिकत असतांना एक झबलं शिवलं आणि ते एका मैत्रिणीला प्रेझेंट दिलं. दोन वर्षांनंतर माझ्याच मुलाच्या बारशाला मला ते परत मिळालं ! ते झबलं बरंच हिंडून - फिरून आलं असावं. कारण मी जिला दिलं तिचा आणि ज्या आजीबाईंनी मला ते दिलं त्यांचा संबंध येणंच शक्य नव्हतं ! मी ते झबलं लगेच ओळखलं ! ते बेततांना खालच्या कापडाचा एक टवका उडला होता आणि तो झाकायला मी क्रोशाचं फूल करून त्याच्यावर लावलं होतं. ते ही तसंच होतं ! ही घटना झबल्याबद्दल बरंच काही सांगते, पण देण्या - घेण्याबद्दल ही सांगतेच नं ! एकवेळ फु.गु. परवडला, पण हे असं ?
पण आता पहा, देणाऱ्याचं मनही राखलं पाहीजे आणि असं सारखं retaliate करणं पण बरोबर नाही. ' ईट का जवाब पत्थरसे ' असा हिंसाचार तर साफ चूक !
आता या दिवाळीत आज उद्या मैत्रिणीने चकल्या पाठवल्या की मी दुसरी बशी समोर करीन .... ' करंज्या घालून पाठव ' म्हणून ! म्हणतात नं, कोणी एका गालावर मारलं, तर दुसरा गाल पुढे करावा ....
तसंही ..... आजकाल गांधीगिरीचा जमाना आहे, तेंव्हा म्हटलं, लगे रहो .........!
Superb! Many thanks - nvj
ReplyDelete