पैठणी आणि इतर ...
" आज तुझा वाढदिवस आहे ना ! चल, आपण काहीतरी मस्त करूया ." मी मैत्रिणीला म्हटलं. तिचा वाढदिवस डावलून तिचा नवरा टूरवर गेला कामासाठी, आणि ही बसली होती गाल फुगवून. " अगं, कामधंदा , नोकरी कुणाला चुकलीय ? काम असेल तर जायला नको का ? वाढदिवस काय दर वर्षी येतो ... म्हणजे, नको होतं त्यानं जायला, पण आपण का असं बसायचं ..." वगैरे खूप तिचं counselling करून, मी तिला घराबाहेर काढलं. "चल, आपण तुझ्या आवडीचं चायनीज खाऊया का पिझ्झा खायचा ?" तेव्हा पिझ्झा 'फॉर्मात' होता, नवीन असल्यामुळे. शेवटी हो-नाही करता करता नेलं चायनीज खायला. तिचे आढे वेढे फार असतात. महाग असेल, veg - nonveg वेगळं असेल ना ? का तिकडचा चमचा इकडे घालतील? प्लेट्स नक्की नीट धुतात नं ते, का dry -cleaning ..? वगैरे. "ते सगळं मरू दे, जरा हास आता, आणि enjoy कर !"
तर जेवण सुखरूप पार पडलं. तिचा चायनीजचा उत्साह म्हणजे sweet corn soup हा high point, मग गोबी मंचुरियन etc आणि veg fried rice खाल्ला की 'देव पावला' . म्हणजे त्यात तिला suspected nonveg असं काही दिसलं नाही ! आम्ही म्हणजे मी सुखाने जेवले, सगळ्या चवींचा आस्वाद घेत ! त्यातले मसाले वगैरे enjoy करत. त्यात तिचे ' सोया सॉस ऐवजी चिंच घालू शकतो, आणि गोड म्हणशील तर गूळ - साखर काय वाईट आहे, असे अवसानघातकी प्रश्नही मी सोडवले. शेवटी छान समाधान पावून आम्ही बाहेर पडलो आणि ही म्हणते, "जरा दही भात असता शेवटी, तर मजा आली असती !" ... मी गप्प !
तर असं ! मी नुकतीच आणखी एका मैत्रिणीकडे जाऊन आले. तिच्या मुलीचं लग्न ठरलं आणि तयारी करायला वगैरे मी हवीच ! ही मैत्रीण इकडची आहे. त्यामुळे मलाही खूप interest , काहीतरी वेगळं पहायला - करायला मिळेल म्हणून ! आणि तिला काहीतरी 'हटके' हवं होतं. ह्या 'हटके' शब्दाचा नुसता पाऊस पडलाय. जिकडे तिकडे 'हटके'. हे ऐकलं की मला त्या माणसाला 'फटके' द्यावेसे वाटतात. 'हटके हटके' म्हणत तेच तेच करायचं. old wine in new bottle ! असो, साड्या खरेदीला निघालो उत्साहाने. मी तिला म्हटलं, "जरा वेगळं करायचंय ना ? सगळ्या जुन्या वहिवाटीच्या गोष्टींना फाटा दे. तुझ्या त्या नेहेमीच्या KSIC , नाहीतर 'कॉन्जीवरम' ला जरा बाजूला सारून इकडे तिकडे बघ. संबलपूर सिल्क आहे, बनारस आहे, शिवाय पटोला, सिल्कच्या टांगाईल नाहीतर ढाकाई आहेत, अन् आमची पैठणी तर खासच आहे ! तुझ्या विहिणीला आणि तुला स्वतःला पण पैठणी घे ना एखादी ! हवं तर तुझ्या 'पापू ' ला पण पिवळी पैठणी घे - अष्टपुत्री !... " माझा उत्साह ओसंडून वहात होता, नुसत्या पैठणी घ्यायच्या कल्पनेनी ! जमलं , तर हिच्याकडच्या लग्नात नेसायला घेऊन टाकू एक स्वतःला ...वगैरे कल्पनाविलास ही ! ती मख्खपणे ऐकत होती सगळं, "ya ya ... पैठणी is nice idea ... but ... ..." आता काय हिचं 'but' ? कोणीही 'पण' किंवा 'but' म्हटलं की मला त्या व्यक्तीचं तोंड धरून ठेवावंसं वाटतं. कारण हे शब्द म्हणजे सभ्य शब्दांत नकारघंटा ! तरी म्हटलं ऐकावं हिचं. म्हटलं बोल पुढे, तर म्हणते, "see अलका, पैठणी means whatever color or price, every sari will have same border and pallu , either peacock or parrot ... all wearing same design, how odd it will look ...?" मी बधीर !...
ह्या सगळ्याच्या वरताण ही तिसरी मैत्रीण ! एक दिवस दमून-भागून आली. गावाला गेली होती , नात्यातल्या लग्नाला. मोठा गोतावळा. लग्नातल्या गमती-जमती सांगत ,ऐकत आम्ही बसलो होतो. "काय दंगा म्हणून सांगू तुला, घरात ४० माणसं, सकाळी ४ वाजल्यापासून रामरगाडा सुरु, ते झोपायला रात्रीचे १२ वाजून जायचे. मुलांचं खेळणं, भांडणं, आयांचं रागावणं - ओरडणं, २ - ३ फ्लॉवर पॉट्स फोडले मुलांनी, एकाला खोक पडली, एकानी हात मोडून घेतला, एक दिवस तर मुलांनी गोठ्यातली गुरं सोडून दिली, आणि तुझ्या English - Vinglish सारखं लाडवांचं ताट सुद्धा सांडून झालं, रुसवे-फुगवे ! कधी एकदा घरी परत येते असं झालं !" "खरंच गं, तुला विश्रांती हवी, जा कुठेतरी ४ दिवस ..." इति मी. "हो, जातोय ना आम्ही ऊटीला, आमचा timeshare suite आहे ना तिथे !" "जा, जा, मस्त मजा करा, आराम करा, तिथली शांतता, निसर्ग सौन्दर्य !" "कसली गं शांतता, अन् कसलं निसर्ग सौन्दर्य. आम्ही दोघंच दोघं , मजा करायला काही कंपनीच नाही !" मी तोंडाचा 'आ' वासून !...
मैत्रीण गेली गप्पा मारून. मग नवरा म्हणाला, "त्रस्त दिसते आहेस, जरा अपेयपान करूया का ? मी चहा करतो मस्तपैकी. " तू ... तू सुद्धा त्यांच्यातलाच ! चहा सारख्या सुंदर गोष्टीला 'अपेय' म्हणतोस ? ...
.... हाय कम्बख्त, तू ने पी ही नही ! .....
क्या बात है!!!!!सही कहा आप ने अलकाजी...!! अतिशय मार्मिक .
ReplyDeleteधन्यवाद 😊
Delete