फोटो
'फोटो काढू' म्हटलं की मला कापरं भरतं ... मला फोटोचा फोबिया आहे. फोटोफोबिया चा अर्थ फारच निराळा, पण मला फोटो काढून घ्यायचा फोबिया आहे ! त्याला बरीच कारणं आहेत. फोटो काढतांना 'नाचता येईना ...' पासून 'आडात नाही तर ...' असे बरेच वाक्प्रचार किंवा म्हणी उपयोगी ठरतील ! असो.
नुकताच जुने फोटो शोधण्याचा योग आला. शाळेच्या पन्नासाव्या reunion चा मौसम आहे. सगळे सगळ्यांना थोडेफार आठवत आहोत, नावाने, पण चेहेऱ्याने नाही. किंवा जरा अंधुक अंधूकच ! एकतर सगळी 'मुलं मुली' आता 'आजीआजोबा' गटात सामील झाली आहेत. त्यामुळे इतक्या वर्षांनी समोर आल्यावर ओळखायचं कसं ? पण 'तू कोण रे ? किंवा तू कोण गं ?' असं विचारून दात, केसांबरोबर आपली मेमरीही 'गुल' झालीय हे कशाला दाखवा ? म्हणून एक आयडिया निघाली, की प्रत्येकाने आपले 'then' and 'now' असे फोटो लावायचे !...
त्यामुळे मी गेला आठवडाभर खूप बिझी आहे. माळ्यावरून, कपाटातल्या सर्वात वरच्या कप्प्यातून, पलंगाखालून , जुन्या बॅगा काढून त्यात फोटो कुठे ठेवले आहेत हे शोधण्यात चार दिवस गेले. शेवटी एकदाचे सापडले !...
इतके जुने फोटो ! ह्यातच 'then' असणार कुठेतरी !.... "अय्या, हा बघ आपल्या लग्नातला ! कसा रे तात्या दिसतो आहेस, कसा काय आवडलास रे तू मला ?" "आता काकूबाईंना काकाच आवडणार नां !" "हे बघ, कोण आहे ! " "अशी दिसायचीस ? आता ... फारच भारदस्त व्यक्तिमत्व ..." "बरं, हा बघ बरं .." "शी .., हा कसला आलाय ? कसलं हेंगाडं तोंड आलंय माझं ..." असे अनेक सूड घेऊन झाले ! पण हवा तसा फोटो काही सापडेना.
खरं म्हणजे एक famous वाक्य आहे की , कोणीच आपल्या आधार - PAN Card किंवा Voter-Id वरच्या फोटो इतकं वाईट दिसत नाही, आणि Facebook किंवा WhatsApp च्या DP इतकं सुंदरही नसतं ! ... पण दोन्ही आपणंच ना ! कधी मी अशी, तर कधी मी तशी ...
आपल्या मधल्या वयातले फोटो मला बिलकुल आवडत नाहीत. चेहेरा सदैव त्रस्त. फोटोतही एकाचं बखोटं नाहीतर शर्ट मागून खेचून धरलेला - तो पळून जाऊ नये म्हणून ... आणि कडेवर एक, आपला पदर, ओढणी, मंगळसूत्र ... जमेल ते धरून चोखत ! हा काय फोटो झाला !
ग्रुप फोटो तर विचारूच नका ! आपण छान दिसायचंय, बाकी सगळे गेले खड्ड्यात ... असं म्हणून आपण चेहेरा एकीकडे, अन बघत असतो दुसरीकडे ! ह्या कानापासून त्या कानापर्यंत हसावं आणि डोळ्यांवर उन्हाची तिरीप यावी !...
आजकालचं नवीन म्हणजे selfie ! त्यामुळे जिकडे तिकडे फोटो बोकाळले आहेत. काहीही सिध्ध करायला फोटो-सेल्फी ! दुसरा भयानक प्रकार म्हणजे 'candid' फोटो ! त्यामुळे फारच सावध असावं लागतं. नाहीतर पाणीपुरी खायला 'आ SS' केलेला, किंवा शिंक येत असतांना ... आपण अजरामर, नाहीतर 'viral' !
... असो, एक फोटो सापडला. अगदी शाळेतला नसेल, पण त्या वेळच्या कुठल्यातरी Id-Card वरचा. चला, 'then' चा तर प्रश्न मिटला. आता राहिला 'now' वाला फोटो !
"चिरंजिवांच्या लग्नातला घ्या ..." "कोणाच्या लग्नातला ? मोठ्याच्या का धाकट्याच्या ? नाही म्हणजे ५ वर्षांचा difference आहे ... " "काय फरक पडतो ? ५ वर्ष जरा इकडे तिकडे ... जरा फोटोशॉप कर ..." "म्हणजे ? मी इतकी वाईट दिसत्येय का त्यात ?" "नाही नाही, तू बारीकच आहेस ... ह्यात केस जरा जास्त पांढरे दिसताहेत ... I mean light चा angle चुकीचा आहे ... म्हणून ... anyway, तूच choose कर ... !" असं म्हणत सगळ्यांनी काढता पाय घेतला. आणि मी डबे, बॅगा ह्यांच्या मध्ये . आजी - आजोबा -, पणजोबा ... इथपसून ते मुलांच्या 'बाळ - फोटोज' पर्यंत फोटोच फोटो ... ! पण 'now' चं काय ... ?
छे:, 'now' वाला जरा बरासा फोटो अजिबात सापडत नाहीये ... हे मोबाईलचे कॅमेरे म्हणजे ... सगळी folders शोधून झाली. Camera, downloads, WApp Images , ... सगळी गॅलरी पालथी घातली , पण एक धड फोटो सापडेल तर शप्पथ ... असं मी म्हणतेय, तोवर नात धावून आली माझ्या मदतीला. वय वर्षे ७ ! लाडानी मला जवळ घेत म्हणाली, "जाऊ दे , आजी ... आपण एक good सा सेल्फी काढू ... मी शिकवते तुला, ... हा symbol आहे ना त्याला touch कर ... आणि 'OOOO' असं तोंड कर ... तू म्हणतेस तसं 'हेंगाडं' ... आणि मग click कर ! ...... ......अगदी natural फोटो येईल तुझा !..... "
nice
ReplyDeleteThanks a lot !
ReplyDeletehya apalya get togetherchya nimittane ha lekh khoop sundar ahe = YASHODHAR KULKARNI
ReplyDeleteThanks a lot Yashodhar !
Delete