सुगंध

 

        आजच एक बातमी वाचली.   नुकतंच NY मधे  एक exhibition झालं.   किंवा तो एक मोठा event म्हणू. तिथे Liz Taylor ने एका सिनेमात वापरलेलं scent ...जे अगदी rare, almost इतिहासजमा, ते पुन्हा बनवलं गेलं आणि त्याचं लोकार्पण किंवा inauguration !   जगावेगळा सुवास ... तो ही जगातल्या हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या सुंदऱ्यांपैकी एकीने वापरलेला !  'Scent of Mystery'  !   काय असेल, कसं असेल ... माहीत नाही, पण त्यानी माझ्या मात्र खूप  आठवणी जाग्या झाल्या ... 

    सुवास- सुगंध म्हटलं की  आवड निवड, त्याच्याशी जोडलेले प्रसंग, काही वाईट - काही चांगले, काही ह्या जगाच्या पलीकडले ... सगळं आलंच !  खूप वर्षांपूर्वी National Geographic चा एक अंक ह्यावरच होता.   त्यात Scent म्हणजे काय, ते कसं असतं, ते कसं करतात ...अशी खूप अफलातून माहिती होती ... आणि त्यात एक booklet होतं , त्यात छोटे छोटे चौकोन होते.   ते आपण scratch करायचे आणि त्यातून कसला वास येतो किंवा त्या वासाने आपल्याला काय वाटते ते लिहून त्यांना पाठवायचे होते, सोबत आपली माहिती म्हणजे वय, मुलगा का मुलगी, जगात कुठे रहाता , वगैरे .    त्यातून काय साध्य किंवा कसला research वगैरे आठवत नाही, पण त्यातून खूप गोष्टी समोर आल्या ... सगळ्यात महत्वाची म्हणजे LPG  आणि piped gas ला वास नसतो आणि त्याचा leak कळावा म्हणून Ethyl Mercaptan नावाचं एक केमिकल त्यात मिसळलेलं असतं  , त्याचा वास आपण जसे वयस्क होत जातो तसा  आपल्याला कमी येतो... 

    तसं scent वगैरे आपल्याला नवीन नाही ... आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली ही गोष्ट आहे.   आपल्याकडे अत्तर हे षोडशोपचार पूजेतला एक उपचार आहे.   आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना आनंद देणारे उपचार, फुलं पानं दिवे वापरून सजावट, आरास, रोषणाई करून डोळे निवतात,   पंचामृत स्नानाने स्पर्शसुख मिळतं , संगीत-वाद्यांनी  ( हळू आवाजात लावली तर )  कर्णेन्द्रिये  सुखावतात, पंच पक्वानांचा नैवेद्य म्हणजे रसनासुख आणि अत्तर,उदबत्या, धूप, ऊद यांनी घ्राणेंद्रियांचं समाधान !!                                    असं म्हणतात,  की अत्तराचा शोध जहांगिराची राणी नूरजहान ने लावला.   तिच्या अंघोळीच्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या असत.   एकदा तिला त्या पाण्यावर तेलकट तवंग दिसला.   तो गोळा करून पाहिलं, तेव्हा त्याला गुलाबाचा सुगंध !   ... असेलही ही गोष्ट खरी ... पण ती तिला झालेली अनुभूती - तिच्यापुरता तिने आपला आपला लावलेला शोध ... आपल्या संस्कृतीत शतकानुशतकं आयुर्वेदावर अभ्यास-संशोधन करून निरनिराळी औषधं, काढे, अर्क असे अनेक प्रकार करणाऱ्यांना अत्तर माहीत नसेल ?   हे केवळ अशक्य ... !   आताची Aroma Therapy ही अशीच 'योगा' सारखी फॉरीन returnded चा छाप लागल्यावर प्रसिद्ध झाली ! 

    अत्तर म्हटलं कि पहीलं नाव समोर येतं ते S. H. Kelkar !   सर्वात सुगंधी नाव ! त्यांच्या कंपनीला शंभराहून अधिक वर्षं झाली ! माझी आजी आणि तिच्या पिढीतल्या बायका - सगळ्यांचा आवडता सुगंध अत्तर म्हणजे केवडा !   आजीनी तिचं कपाट उघडलं की केवडा, चंदन आणि लवंग असे मिश्र सुवास यायचे, आणि आपण डोळे मिटून तो सुगंध घेतोय, तोपर्यंत कपाट बंद होऊन जायचं !   त्याकाळी निदान महाराष्ट्रात तरी, डोक्यात फुलं -गजरे वगैरे वगैरे फक्त घरच्या झाडांची-वेलांची ... जाई, जुई, मोगरा, चमेली ...थोडा फार गुलाब .. क्वचित बकुळ ... घरीच केलेल्या वेण्या-गजरे  एवढंच, पण त्यांचा सुवास ! सण असले की  पूजेतल्या फुलांचा सुवास, उदबत्त्या, धूप, चंदनाचा वास, ... खूप छान आनंदी मूड व्हायचा !...

    आपल्या पुराणांमधे , कथांमधे , सुगंधावर आधारीत कित्येक गोष्टी सापडतात.   महाभारतात द्रौपदीचे वर्णन करतांना तिच्या सौन्दर्या बरोबर ती सुगंधी होती असं  वर्णन आहे !   तिला नक्की तिच्या सवती-जावांनी, मैत्रिणींनी विचारलं असणार ... " कोणतं उटणं लावणं  लावतेस गं ?   ... किंवा हे कोणतं अत्तर का उटी ?"  ... तसंच मत्स्यगंधा ... तिच्या कामामुळे अंगाला चिकटलेला माशांचा वास जाऊन ती 'योजनगंधा' झाली !   राधेच्या वर्णनांत - जी खरी कधीच नव्हती - तिच्या आसपास चंदनाचा सुगंध येई अशी कविकल्पना ! 

    इतकं जुनं कशाला ?   महाराष्ट्रात संगीत नाटकाच्या सुवर्णकाळात बालगंधर्व, मा. दीनानाथ हे नाट्यप्रयोगाच्या वेळी खऱ्या सोन्याचे दागिने घालायचे, तसंच उंची अत्तराचा वापर करायचे - जेणेकरून सभागृहातही तो सुवास पसरायचा, आणि लोकांना महालाचा feel  यायचा ... असं वाचलं होतं  !   मस्तानीची ही अशीच एक गोष्ट सांगतात !... तसंच , पानिपतच्या तिसऱ्या   युद्धाच्या वेळी एकदा रात्री सदाशिवराव भाऊ आणि पार्वतीबाई बुद्धिबळ खेळत होते.  तेवढ्यात दिव्यातील तेल संपत येऊन वात शांत होऊ लागली.  बाहेरच्या हरकाम्याला बोलवून तेल आणेपर्यंत उशीर झाला असता , म्हणून भाऊंनी त्यांच्या जवळची अत्तराची कुपी दिव्यात ओतली आणि त्या सुगंधी तेलाच्या प्रकाशात डाव पूर्ण केला ... तो शेवटचाच ठरला ... पण किती सुंदर गोष्ट, कोमल, हळुवार ...अशी  भावना ... गोष्ट खरी का खोटी ... कोण जाणे, पण मनात जपून ठेवावी अशी !  

      आता नवीन गोष्टी ... 'अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया ...' ! आता   perfume म्हटलं की आठवतं ते Eue De Cologne !   जर्मनीतल्या एका गावातलं पाणी असा शब्दशः अर्थ !   Perfume चा base  अल्कोहोल !  तर , अत्तराचा base तेल ! ...  

    ...ऊद, धुपाचा वास आला, की संध्याकाळी गुरगुट्या मऊ भात खाऊन , मऊ मऊ गोधडीत झोपून जावसं वाटतं ... तेच गवती चहा, Thyme, Menthol चा वास म्हणजे लाल लाल नाक, डबडबलेले डोळे, आणि स्वेटर हेच !   केशर-वेलदोडे-जायफळ म्हटलं की श्रीखंड-बासुंदी-पुरणपोळी-मोदक ... अहाहा ! ...  अजून एक flavor - essence  म्हणजे व्हॅनिला !   त्याच्या शिवाय केक-बिस्कीट-icecream ? ... विचारच नको करायला !   मुंबईच्या विलेपार्ले इथे पार्ले बिस्कीट फॅक्टरी च्या बाजूने लोकलमधून जातांना ह्याच व्हॅनिला च्या वासानेच लोकांचे आत्मे तृप्त होत असत ... असा विवेकचा अनुभव !   व्हॅनिला - दालचिनी शिवाय केकची काय मजा ? त्या ऐवजी वेलदोडा घातला,  तर तो शिराच होईल आणि pudding म्हणजे खरवस होईल ... नाही नाही... व्हॅनिला  तो व्हॅनिला च !

    व्हॅनिला  हे एक orchid ... त्याच्या शेंगा-बियां मधून हा essence काढतात ... पण आता पर्यावरणाच्या गडबडीमुळे हे झाड-खरं म्हणजे ही वेल आता संपुष्टात येऊ घातली आहे.   ह्या वेली वाढवणं, त्यांचं pollination करणं , तो essence  काढणं,  सगळंच कठीण आणि महाग होऊ लागलं आहे.   पण हाच essence आता  फॅक्टरीत अगदी सहज बनवता येतो, अगदी हवा तितका आणि हवा तेव्हा ! त्याला गोंडस नाव पण वापरलं जातं  ... 'nature identical'  !! 

    मोगरा , चमेली, जाई , जुई,  हे किती नाजूक सुवास ... पण त्याचा scent अजून तितका authentic वाटत नाही.   तो सुवास capture करणं कठीण असावं !   त्या मानाने सोनचाफा, कवठी चाफा जरा उग्रच वाटतात ... थोड्या वेळाने डोकं जड होतं .. कधी कधी डोकेदुखी सुद्धा सुरु होते !   ह्याच कारणामुळे मला स्वतः ला चंदन, वाळा आवडत नाही.   सगळ्यांचा आवडता वास - तापलेल्या जमिनीवर पहिला पाऊस पडला की येतो तो ... त्या वासाच्या अत्तराचं - scent चं नाव  'मृद् गंध'  !   नाव खूप मस्त ... पण मला तो  वास घेतला की दमच लागतो ! जमिनीतला एक चांगला bacteria तो सुवास करतो ... पण मला तो   "झे ss पे sss ना ssss !   कस्तुरी, एक प्रसिद्ध सुवास ... पण त्याचं आणि माझं जमत नाही ... कारण ... तेच !    त्यामुळे मी कोणताही scent -अत्तर म्हटलं की जरा लांबूनच - अंतर ठेवूनच असते ... car perfume म्हटलं की डोकं उठतंच  माझं ... मग ते AC मुळे का त्या वासामुळे, ते तोच जाणे ! 

    Geographic वाचतांना हे scent कसे करतात ते  कळलं.   प्रत्येक सुगंधाचा एक formula  असतो.   पहिला लक्षांत येतो तो हवेशी संपर्क आला, झाकण उघडलं की येणारा सुगंध ... volatile  ... तो आकर्षित करतो, हा scent चा चेहेरा - smile ! तो पटला की अर्ध काम झालं.  नंतर येतो तो काही वेळानंतर - पण जरा जास्त वेळ टिकणारा, काही तास ... तो scent मधला main component !   आणि तिसरा म्हणजे base component , जो वर्षानुवर्षे ही नं बदलता राहू शकतो, आणि आधीच्या दोन्हीचेही थोडे थोडे सुगंध बांधून ठेवतो, जे हळूहळू हवेत पसरतात... आणि ... आपल्या आठवणी जाग्या करतात ... scent चं हे technique वाचल्यावर अचंबा वाटला !  त्यामागे किती शास्त्र आहे, शिस्त आहे आणि प्रत्येकाचं  प्रमाण ही ठरलेलं आहे ! 

    ह्या सुगंधांनाही किती नावं.   पण प्रत्येक नावात एक वेगळी झलक - fragrance म्हटलं की नाजूक काहीतरी वाटतं !   'Parfum'  म्हटलं की romantic, कारण तो french शब्द !    Essence म्हटलं की कशाचा तरी गाभ्यातला भाव, शब्दात असेल तर भावना, पदार्थात असेल तर चवीसकट सगळं उचलून धरणारा !    Fragrance म्हटलं की वाऱ्याच्या झुळुकीबरोबर येणारा आणि हलकेच विरुनही जाणारा ... romantic ... की गाणं सुचावं ... उसके दामनकी खुशबू हवाओ में है ... किंवा ... लपविलास तू हिरवा चाफा  ... ( पण जरा लांबूनच ... )

    आपण वासावरून आंबे, फळं पिकली का नाही ते बघतो, वासावरूनच तांदुळाची पारख-निवड करतो,  स्वैपाकघरातून येणाऱ्या वासांनी कधी कधी पोट खवळतं ... तर कधी कधी डोकं ही  !    एकदा एका कार्यक्रमात मी एक स्पर्धा ठेवली होती. त्याकरता ,    सुगंधाच्या जगाचा खूप अभ्यास असणारा मित्र -   त्याला गाठलं आणि त्याच्याकडून बऱ्याच सुगंधाच्या बाटल्या घेऊन आले.   पण ते ओळखणं बऱ्याच जणांना खूप कठीण गेलं.   कारण काय असेल, हे शोधण्याच्या उहापोहात खूप गोष्टी कळल्या.   तो मित्र म्हणाला की एकतर आपलं नाक इतर प्राण्यांइतकं evolved नाही, तो sense आपल्याला   जरा कमीच आहे.   दुसरं म्हणजे आपण ह्या विषयांत trained पण नाही ... एखादा वास जर असाच अचानक समोर ठेवला तर तो ओळखणं कठीण, कारण हा अनुभव नेहमी दुसऱ्या कशाच्या तरी आधारावर असतो.   Out of blue, त्याने मला एक वास दाखवला ... सुवास नाही, पण वाईट ही नाही... नेहमीचाच आहे, पण खूप आवडतो असंही नाही ... शेवटी अगदी जिभेच्या टोकावर आहे, पण सुचतच नाही ... असं झाल्यावर त्याने सांगितले ... हा कांद्याचा वास आहे ... मी... ...गप्प ! ...

    ह्याच मित्राने आम्ही त्यांच्याकडे गेलो असतांना चहा केला होता ... केशर, अनेक फ़ुलं , वेलदोडा ,लेमन ऑइल ,  ... एका पाठोपाठ एक सुगंध ... दर घोटाला वेगळा सुगंध !   अवर्णनीय चहा !   इतका सुंदर चहा आणि त्याचे flavours  !!!!   ह्याच मित्राने एक गोष्ट सांगितली ... कधी एखाद्या वासाने त्रास झाला , तर कॉफी च्या पावडरचा वास घ्यायचा ... त्यातले essences आपल्या नाकात बसलेल्या इतर वासांना neutralise करतात ... सुगंधांवर अभ्यास करतांना हे technique वापरतात. 

    तर , एक खूप खूप famous scent विसरले ... ज्याने एकेकाळी जगाचा कब्जाच घेतला होता ... Intimate ... मला ते scent विवेकनीच दिलं पहिल्यांदा, पण मला तो वास खूप strong, overpowering, agressive  वाटला ... naturally  !   माझा एक लाडका fragrance आहे !   Lavender  !   नावामुळे असेल, रंगामुळे असेल, किंवा कसंही ... तो ही  Yardley चा च ! ...   Chanel no 5 , Joy, किंवा Scent of Mystery  ... काहीही असोत ... Lavender ते Lavender  ... माझ्यासारख्या एका साध्या housewife ला ... ...कधीमधी मोगऱ्याचा गजरा... व्हॅनिला ice-cream चा मोठा scoop .... आणि Lavender Talc ...   ......म्हणजे romance चं डोक्यावरून पाणी ... ! 

 

- सौ अलका कुंटे, बंगलोर 

+९१ ८७६२३ १६३८५

Comments

  1. *खूपच छान* ! जो वास आनंद देतो तो सुवास , सुगंध ! तो अत्तराचाच असावा असं काही नाही. कॉलेजच्या दिवसातली एक आठवण जागी झाली. माझ्या एका मैत्रिणीनी मला एकदा सिगरेट पिण्याचा आग्रह केला किंवा सुचवलं . तिला म्हणे सिगरेटचा वास खूप आवडायचा. अन् पेट्रोलचाही ! सिगरेट ही कदाचित आम्हा दोघांची एकमेव कॅामन आवड असावी . असो !
    — अरविंद आपटे .

    ReplyDelete
  2. Thank you , Doc !! 😊 👌

    ReplyDelete
  3. *अलकाचे चणे कुरमुरे*
    *सुंगध*

    सर्वांगस्पर्शी सुंगधाचा लेख लिहायला रसीक मन हवं आणि ते तुझ्या जवळ आहे अलका म्हणून या लेखाचा सुगंध दरवळत आणि घमघमत राहिला.

    सुगंधाबद्दल बोलायचं तर वातावरण प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे सुगंधाचा वापर केला जातो.
    नाटकाच्या सुरवातीला नटेश्वराची पूजा करून धुपदाणीतून धुपाचा येणारा सुवास प्रेक्षागारात पसरला की प्रेक्षक सरसावून बसायचे. आपण लग्नकार्यात वाजतो तेंव्हा दाराशीच आपले स्वागत अत्तरदाणी आणि गुलाबदाणीतून केलं जात.देवळात तर उदबत्ती आणि कापराचा वास आपल्यातला भक्तिभाव जागवतो.

    लहानपणी दिवाळीची आठवण यायची ती त्या वेळी मिळणाऱ्या नवीन कपडे,फटाके यांच्याबरोबर सुगंधी तेल,उटणं आणि वर्षातून एकदाच अंगाला लागणाऱ्या आगळ्या वेगळ्या सुगंधी,*मोती आणि म्हैसूर सॅन्डल* साबणामुळे यायची. त्या मुळेच *उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली* ही जाहिरात प्रचंड लोकप्रिय झाली त्याची आठवण सुद्धा या तुझ्या लेखामुळे झाली.

    इजिप्तची राणी क्लिओपात्रा, टेनिस विश्वातली सौन्दर्यवती गॅब्रिएला सॅबॅटिनी आणि आपल्या लतादीदी या तिधींच्या नावाचा सेंट उपलब्ध आहे. या नावाची जादू अशी आहे की किमतीला जास्त असूनही त्याला मागणी असते.

    सुवासा बरोबरीने आसमंत दरवळून टाकणारा खाद्यपदार्थांचा *Aroma* हा आपल्याला भुकेची जाणीव करून देत असतो. अम्बाड्याच्या भाजीवर जेंव्हा चुरचुरीत लसणीची खमंग फोडणी पडते त्याचा आनंद काही वेगळाच म्हणूनच एकनाथ महाराजांनी लिहिले *कळण्याची भाकर,अंबाड्याची भाजी,वर तेलाची धारच न्हाई ,मला दादला नको ग बाई.

    मागे मी हैद्राबादला गेलो होतो आणि तिथे गेल्यावर कराची बिस्कीट आणणं अगदी must . ते दुकान जवळ आल्याची जाणीव हवेत पसरलेला त्या बिस्किटांच्या वासाने करून दिली. तिथलं अजून एक अगदी फेमस दुकान म्हणजे मिठाईचं *जी.पुलारेड्डी* दुकान. तिथल्या अस्सल तुपातल्या गोडसर मिठाईचा वास आपल्याला त्या दुकानात खेचून नेतो.

    सुगंधाची भुरळ गीतकारांना देखील पडली आहे आणि त्यांनी सुगंधावर गाणी लिहिली आहेत. मला त्या पैकी तीन गाणी आठवली. शान्ताबाईंनी हे बंध रेशमाचे नाटकासाठी गाणे लिहिले *आज सुगंध आला लहरत* तर अण्णासाहेब किर्लोस्करांनी शाकुंतल नाटकासाठी प्रसंगाला अनुरूप पण थोडस शृंगारिक गाणं लिहिलं *लाविली थंड उटी वाळ्याची, सखीच्या कूच कलशा ती* नाटककार आणि गीतकार बाळ कोल्हटकर देव दीनाघरी धावला या नाटकात श्रीकृष्णाला जागवण्यासाठी भूपाळी लिहितात *मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला*

    प्रसाद

    ReplyDelete
  4. Thank you , प्रसाद ! तू लिहिलेलं वाचल्यावर हा प्रवास पूर्ण झाला , असं वाटलं !! ☺️👍👌

    ReplyDelete
  5. Very nice 👍🏾

    ReplyDelete
  6. Thank you very much !😊

    ReplyDelete
  7. WHY DONT YOU PUBLISH SUCH WRITING IN WELL KNOWN NEWS PAPER OR GOOD MEDIA.I WOULD LIKE TO READ IN ENGLISH ALSO

    ReplyDelete
  8. Thanks a lot , Yashodhar !! Will surely try ! My vocabulary is not all that great .. but ..will try ... !!😊

    ReplyDelete
  9. दोन्ही लेख अप्रतिम सुगंध जाणवतोय

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संध्याछाया भिवविती हृदया ...

Alice in Wonderland

Alice in Wonderland - 2