संध्याछाया भिवविती हृदया ...

       बंगलोर मध्ये आल्यावर मला मिळालेली जीवश्च   कंठश्च मैत्रीण ...माणिक ... अचानक चार महिन्यांपूर्वी खूप आजारी पडली ..  आणि , तिने तिचं शेवटचं मनोगत लिहायला मला सांगितलं ... ते मी  लिहिलं ... तिला तिच्या  मिस्टरांनी वाचून दाखवलं ... 
 .... तिला जाऊन महीना झाला ... 
.... तिच्या आठवणीत ...

..... 
आज नवरात्राचा शेवटचा दिवस ... दिवेलागण झालीये ... आभाळ भरून आलंय ... कधी बरसेल याचा नेम नाही ...काळे कुट्ट ढग ... मनातही विचारांचं काहूर माजलंय ...डोळेही कधी बरसतील , ते सांगता येत नाहीये ...सगळा जीवन पट डोळ्यासमोर येतोय ...डोळे मिटून विचार करतेय .. .. ह्यांना वाटतंय , माझा डोळा लागलाय ...

     ... नवरात्र आणि कोणत्याही मुलीचा-बाईचा आयुष्याचा प्रवास किती सारखा असतो.   खरं म्हणजे संपूर्ण आयुष्याचा fast forward चित्रपट म्हणजे नवरात्रातली देवीची रुपं असं वाटतंय ... एक लहानशी मुलगी ... तिची ओळख कशी तर कोणाची तरी मुलगी-कन्या ... जशी ती 'शैल पुत्री' ... मग मोठं होत असतांना, नवनवीन गोष्टी शिकणारी, शिक्षण पूर्ण करणारी ब्रम्हचारिणी ... असं करत संसारात पदार्पण करणारी,  मुलाबाळांची काळजी घेणारी  - कुष्मांडा ,  कात्यायनी, अन्नपूर्णा आणि काही संकटं आली तर त्यांचा सामना करणारी दुर्गा-काली ... मनात एकच ध्येय ... माझ्या बाळांचं कुटुंबाचं रक्षण करायचं - कधीही धीर सुटू द्यायचा नाही ... मनाजोगता सहचर मिळाला आहे, त्याची पाठराखण करायची ... क्वचित कधी तो डगमगतोय असं वाटलं, तर त्याला आपली  भरभक्कम साथ द्यायची ... ! आणि ... नवरात्र संपल्यावर ... विसर्जन ...???

   ... मी हेच तर सगळं करत आले ... आयुष्यभर ... एक मुलगी म्हणून ... एक आई म्हणून ... !   आणि कित्येक रुपं होती माझी ... सासर-माहेर दोन्ही संभाळलं,  त्या दोन किनाऱ्यांमधली नदी होऊन राहीले मी ... दोन्ही तीरांना जोडत राहिले ... जोडणारे पूल संभाळत राहिले !    बाईला फक्त दोन चार नाती नसतात, ... मुलगी , सून , बहीण, नणंद, जाऊ, भावजय आणि नंतर सासू ,विहीण ... !   सगळी नाती संभाळत राहिले ... सर्वात महत्वाचं नातं ... ज्याच्यामुळे माझी सगळी नाती  दुप्पट झाली, तो माझा सहचर ... माझा आणि फक्त माझाच ... इतर सगळ्या नात्यांची वाटणी होऊ शकते ... होतेही ... पण हे नातं कधीच न ताणलं जाणारं ... न तुटणारं ... न मोडणारं ... ते मी मनापासून  सांभाळलं ... !    नवथर - नव्या नवलाई पासून ते संपूर्ण विश्वास इथपर्यंत ! 

    आई झाल्यावर एक वेगळाच आनंद आणि मग सगळ्यांच  नात्यात हे नातं डोकावू लागलं ... आईच्या मायेने जेवू घालावं ... आईच्या मायेनी रागावावं ...आईच्या मायेनी  सल्ला द्यावा आणि आईच्याच मायेनी रागवावं ही  कधी ... 
 
    हे अगदी सहज झालं असं नाही, पण मुद्दाम प्रयत्नपूर्वक केलं असं ही  नाही, माझ्या मनात तेवढं प्रेम होतंच ... त्याला वाव मिळाला   !    ही  सगळी संसाराची कसरत करतांना, माझ्या मनातला एक आवडता कोपराही जपला ... कला , सगळ्या गोष्टींतलं चांगलं पहायची, शोधायची वृत्ती आणि मुख्य म्हणजे सगळ्याची हौस ... !     मुली-सुनांचे भोंडले, मंगळागौरी, डोहाळजेवणं ... सगळं केलं ... आज त्या सगळ्याची खूप आठवण येतेय ... त्यांना आठवत असेल का हे सगळं ?    त्यांचं आयुष्य तर आजकाल फार धकाधकीचं झालंय ... ! 

    इथे पलंगावर पडल्यापडल्या खूप विचार मनात येतात ... हे सगळं काय आहे ? ... हा जन्म ... आयुष्य ... लवकरच संपणार हे दिसतंय ... सगळ्यांचं तेच आहे ... कुणी आधी, कुणी नंतर ... सगळ्यांचं आपण केलं, पण आपलं कुणाला तरी - नव्हे सर्वांनाच करावं लागतंय, हे आवडत नाही ... पण नाईलाज ... आज असं वाटतंय माझा प्रवास मला कुठे नेतोय ?   आयुष्यभराची वाटचाल काही सोपी नव्हती नेहेमीच ... वाट म्हटलं की खाच -खळगे आले, वेडीवाकडी वळणं आली, चढ उतार आले , इतरही अनेक गोष्टी ... 

    ... पण हा आता परतीचा प्रवास सुरु झाला आहे असं वाटतं ... हा  U turn  आहे का ?   उलटा प्रवास ? ... मी आई झाले, आजी झाले ... आता ते सगळे माझी आई होऊन सारं करत आहेत, अगदी ज्या नातवंडांना चिऊ-काऊच्या गोष्टी सांगून भरवलं, तीच , आता मी चार घास खावे म्हणून मला मनवतात ... मुलांचा धीर कधी खचला तर मी त्यांना प्रोत्साहन द्यायचे, आता ते माझ्या मनाला उभारी द्यायचा प्रयत्न करताहेत ... ज्यांना मी मांडीवर खेळवलं, तीच आता मला जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवत आहेत ... ज्याच्या मिठीत आपलं सर्वस्व दिलं-घेतलं, त्याच्या कुशीत शिरून खूप रडून घ्यावसं वाटतंय, त्यात सर्व रागलोभ वाहून जाऊ दे ... पण प्रेमाचा, सुखदुःखाचा हिशोब करायला हा व्यवहार नव्हताच मुळी ... ते एकरूप होणं होतं  ... ! त्याच्या शिवाय मी पूर्ण नाही आणि माझ्याशिवाय तो ही अपूर्णच ....

     आणि ती कोण ? ... सगळ्यांच्या पाठीमागे उभी ... तिचं माझं न काही नातं ... अशीच भेटली, मुलांच्या शाळेजवळ ... आणि कधी मैत्री झाली ते कळलंच नाही ... एक स्पेशल नातं ... मैत्रीचं ... कधी एकमेकींना आपली दुःख सांगून खूप रडलो, तर कधी सुख सांगून मनमोकळं हसून घेतलं ...एकमेकींना सांगितलेली गुपितं - गुपितंच राहिली ... कधी बाहेर आली नाहीत ... मदत हवी , हे न सांगता एकमेकींसाठी उभ्या राहिलो ... सावली सारख्या ... एकमेकींवर कामं सोपवून निर्धास्त राहिलो ... दोघी आपापल्या संसारात, पण एकाच पायवाटेवर चालणाऱ्या ...  
    
    ... पैलतीरावर पोचले मी ... आता एक पाऊल उचलायचं ... ते उचलवत नाहीये ... आयुष्यभर धरलेले हात तर कधीच सुटले ... मागे वळून बघतेय ... माझी सगळीजणं काहीतरी म्हणताहेत , पण काही ऐकू येत नाहीये ... सगळं धूसर धूसर होत चाललंय ... डोळ्यांतल्या पाण्यामुळे ? ... पुन्हा दिसतील का मला ... का कधीच नाही ? ... त्यांना सोडून जातांना जीव व्याकूळ होतोय ... आत  काहीतरी पिळवटून येतंय ...जीव घाबरा होतोय ...कुठे चाललेय मी ...एकटी एकटीच... खूप भीती वाटतेय ... अंधारी येतेय डोळ्यांसमोर ....

    तिन्हीसांजा होऊन गेल्या ... काळोख तर पुढे दिसतोच आहे ... आणि रात्र  होणार ... पण सकाळही होईलच ... नवी पहाट ... नवा दिवस ... नवीन जन्म ... मला मुक्ती नकोय ... मला परत यायचंय ... माझ्या माणसांना भेटायला ... 

    ... फिरुनी नवी जन्मेन मी ... 
.
.
.
.
.
          
- सौ अलका कुंटे, बंगलोर
  +९१ ८७६२३ १६३८५

Comments

  1. *स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी*

    अलका तुझ्या मैत्रिणीच्या वतीने तिच्या भावना लिहिताना तुला किती जड झालं असेल त्याची जाणिव प्रत्येक वाक्यागणिक होत राहिली. पाहुण्याला पोचवायला आपण जात असतो, त्या वेळी टाटा करताना मनात वाईट वाटत असलं तरी पुन्हा भेट होणार याची खात्री असते म्हणून चेहरा हसरा असतो .

    पण कोणी अनंताच्या प्रवासाला निघताना त्याला तस बघणं देखील किती वेदनादायक असत.अशा वेळी डोळ्यांना पाझरू न देणं एव्हढच हातात असत. तुझ्या मैत्रिणीने तिच्या मनात उठलेले भाव तुला लिहायला सांगून तू तिच्या किती जवळची आहेस तेच सांगितलं आहे.

    प्रसाद जोग.
    सांगली.

    ReplyDelete
    Replies
    1. माझं भाग्य की अशी मैत्रीण मला मिळाली ... आता ती या जगात नाहीये ... पान माझ्या मनात ती नेहमीच असेल ...😢

      Delete
  2. अलका,फार भिडतंय ग, असं तिला सांगावस वाटलं तू शब्दबद्ध केलं.....आतून तुटल्यासारखं वाटत असेल....सगळा जगण्याचा प्रवास...

    ReplyDelete
    Replies
    1. काय सांगू ....😢

      Delete
  3. प्रमोद
    अलका, कसे काय हे सगळे शब्दबद्ध केलेस. मनाला भीडतय. तुला सलाम...तू हे लिहू शकलीस.....

    ReplyDelete
  4. फार कठीण होतं , पण , तिच्यासाठी लिहिलं ...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Alice in Wonderland

Alice in Wonderland - 2