भाषा - २
काल दुपारी सगळी कामं आटपून रेडियोवर गाणी ऐकत बसले होते ... कार्यक्रमाचा विषय होता बहुतेक 'शब्दाविना भाषा' ... आणि मी ऐकत होते ... आँखों ही आँखोमे इशारा हो गया ... नंतर ... निगाहों निगाहोंमे दिल लेने / देनेवाले ... आणि मग ... पलकोंके पिछेसे क्या तुमने कह डाला, फिरसे तो कहना ... अहाहा, काय मस्त कल्पना ... न बोलता सगळं बोलणे ... भावना पोचवणे ... हे नयन बोलले काहीतरी ... !
आणि म्हटलं ह्यावर लिहायलाच पाहिजे ... ! भाषा भाषा ती काय, आपले विचार स्पष्ट करते ... पण सगळं तोंडानी बोलायलाच पाहिजे असं नाही, नुसतं समजलं ... नाही समजलं ... confusion नको ... शेवटी communication झालं पाहिजे ... ते भाषेविना, शब्दाविनाही होऊच शकतं ... !
अगदी सगळे प्राणी-पक्षी ... त्यांच्या हावभाव, डोळे, चेहेरा यावरून भीती, राग, हल्ला हे कळूच शकतं आणि त्यांचीच कशाला ... मनुष्यप्राण्यांचीही देहबोली ! भाषेविना, भाषेआधी खूप काही सांगून जाते ! असे विचार मनात भिरभिरत होते ... .
अशी ही भाषेविण बोली ... किती तिचे प्रकार ... ! नेत्रपल्लवी ! नुसते डोळे, भुवया, चेहेऱ्यावरचे हावभाव, मानेची बारीकशी हालचाल ... यावरून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संदेश पोहोचवायचा ! अगदी " डोळे हे जुलमी गडे , रोखुनी मज पाहू नका ..." असं म्हणावं ही लागायला नको ..! आपल्या सगळ्या शास्त्रीय नृत्य प्रकारात ह्या नेत्रपल्लवीला खूप भान आहे, स्थान आहे, मान आहे ! सगळ्या नृत्य प्रकारांत केरळच्या कथाकली मध्ये तर ह्या डोळ्यांच्या हावभावांना खूपच महत्व आहे ! त्यांचे डोळे आणि भुवया उडवणे, आणि त्याबरोबर ओठांची हालचाल ... हे बघता बघता सगळं नाट्य उलगडत जातं ! त्यांच्या भल्या मोठया ड्रेसमधे देहबोलीला खूप वाव नसेल, पण डोळे हे त्यांचं सॉलिड बलस्थान !
ही झाली डोळ्यांची भाषा, तिला एक जोडीदार लागतेच ! ती करपल्लवी ! हाताच्या बोटांच्या मुद्रा करून नृत्यातले भाव किंवा इतर नाट्य किंवा रोजच्या संभाषणाला support करणं ... ! सर्व नृत्यप्रकारात ह्या हस्त मुद्रांचं महत्व कोणीच नाकारू शकत नाही ! दुसरी व्यक्ती जवळपास असेल तरच नेत्रपल्लवीचा उपयोग ... जर थोडी लांब, दूर असेल तर करपल्लवीच मदतीला धावून येणार ! ह्या करपल्लवीबद्दल सांगावं तेवढं थोडंच ! ते येईलच पुढे ....
तरुण मंडळींचा ... कॉलेजमधे वगैरे ... म्हणजे माझ्या काळी तरी नेत्रपल्लवीवर खूप भरवसा असायचा ... त्या वेळचीच ती गाणी ... आँखोंही आँखोंमे ... वगैरे ... पण कधी कधी त्यावेळच्या रोमियोने त्याच्या मनातल्या ज्युलिएटला नेत्रपल्लवीत काही संकेत द्यावा ... जसा ...'डोळ्यांत वाच माझ्या , तू गीत भावनांचे ...'! , तो तिला पटू नाही ... आणि त्याचं उत्तर तिने करपल्लवीत द्यावं ... !...जरा मोठ्यांदाच ...! ह्या मूक संभाषणाला कोणी साक्षीदार असावं ... मग काय, ही मजा अगदी अजरामर होत असे ! असे खरे खरे किस्से झालेले आहेत ... हिंदी सिनेमात तर त्यांची रेलचेल आहे ... !
करपल्लवीचा एक खूप छान उपयोग जगाने करून घेतला ! तो म्हणजे मूक-बधिरांची भाषा AMESLAN - अमेरिकन साईन लँगवेज ... आता तिला ASL म्हणतात. ब्रिटिशांची अशीच भाषा - BSL, आणि आता आपली भारतातली ISL ! नुसत्या हाताच्या actions वरून व्यक्त होता येतं ! काही जण ABCD ह्या प्रत्येक अक्षरासाठी एक खूण - असं पूर्ण spelling वापरत शब्द सांगतात, तर काही एखाद्या संकल्पनेसाठी, एखाद्या वाक्प्रचारासाठी एक मुद्रा असं वापरतात. पूर्वी दूरदर्शनवर रविवारी मूकबधिरांसाठी बातम्या असायच्या, त्यात 'मतदान' ह्या शब्दाकरता फारच सुंदर action होती ... मतपेटीत दोन्ही हातांनी मतपत्रिका टाकणे ... पटकन कळायचं ... हे तर मतदान आहे ! आणि भारत ह्या अर्थी कपाळाला कुंकू किंवा टिळा लावायची action ! मला ते सर्व पहायला खूप आवडायचं ! तशा काही universal actions सगळ्या जगभरात कॉमन असतातच, पण तरी ह्या हातांच्या भाषा खूप सोयीच्या आहेत !
मूकबधिरांच्या शाळेतल्या मुलांच्या दोनचार मजेदार कथा मला माहीत आहेत ! माझ्या एक काकू त्या शाळेत शिकवायच्या. त्या नुकत्याच नोकरीला लागल्या होत्या. त्यांना अजून त्यांची भाषा तितकीशी नीट येत नव्हती ! शाळेचं inspection होतं, तर 'दिपोटी' साहेबांसमोर काहीतरी छान दाखवायचं ... इतक्या कमी वेळात, ते मुलांना कळणार, मग ते करायचं. काकूंनी युक्ती काढली ! मुलांना तळ्यात-मळ्यात खेळ शिकवला, आणि मुलांनी झक्कपणे खेळून दाखवला ! त्यांचं रहस्य ? काकूंनी मुलांना दोन actions शिकवल्या ! तळ्यात म्हटलं की हात उजवीकडे आणि मळ्यात म्हणजे एक बोट नाकावर ! मुलांनी लगेचच pick-up केलं ... आणि काकू 'permanent' झाल्या महिन्याभरात !
एकदा पुण्याला गेलो होतो. नातेवाईकांना भेटणे ह्या कार्यक्रमात बस-रिक्षा मिळेल ते वाहन. एकदा असेच एका बसमधे चढलो. ती मूकबधिर मुलांच्या शाळेवरून येणारी बस होती... खूप मुलं मुली ! आणि त्यांचे हातवारे चाललेले ! खूप वेगावेगाने हात चालत होते ... मधूनच दुसऱ्या मुलाचे हात खाली ओढून, आपले हात वर करून actions चालल्या होत्या ! जसजशा गप्पा रंगात यायच्या, तसतसे हात आणखी आणखी वर ! आणि, मधूनच सगळे एकदम खळखळून हसायला लागायचे ... काहीतरी गंम्मत ऐकून ... नव्हे पाहून ! मधेच कोणाचा बस-स्टॉप आला की ते मूल उतरतांना युनिव्हर्सल भाषेत हात हलवून बाय बाय ! आपण लोक एरवी बोलतांना मूकबधिरांना कसं वाटत असेल, ते तेव्हा माझ्या लक्षात आलं ... मी भिरी भिरी एकदा इकडे, एकदा तिकडे, पहातेय, पण काहीच कळत नाहीये ... ओशाळं वाटलं खूप ... !
ह्या करपल्लवीबद्दल नुकतीच एक छान माहिती कळली ... शिवाजी महाराजांची ! त्यांचं गुप्तहेर खातं किती प्रभावी आणि सक्षम होतं हे आपल्याला माहीत आहेच. बहिर्जी नाईक हे फक्त वेषांतर करण्यात पटाईत नव्हते , तर त्यांची खूप मोठी टीम होती ! गावोगावी जाऊन गाणी म्हणणारे, गोंधळी, वासुदेव, पोतराज एवढंच नव्हे तर पिंगळे, भिक्षेकरी, डोंबारी ... सगळे त्यात होते, आणि गुप्त सांकेतिक भाषा ही होत्या. गडांवर, बुरुजांवर, गडांच्या वाटेवर, पायथ्याच्या गावांत हेर असत. त्यांना 'टेहेळे' म्हणत. त्यांचं काम म्हणजे गावातल्या मुख्य चौकावर लक्ष ठेवणं. खाली गावात हिंडताना , शत्रूच्या सैन्याची, त्यांच्या हालचालींची माहिती कळली की हे गोंधळी लगेच काहीतरी गाणी, भजनं, गोष्टी, अभंग वगैरे चौकात गाऊ लागत. अर्थात त्याबरोबर हातवारे पण करत असत. सामान्य लोकांना ते नाचणं, गाणं वगैरे वाटावं, पण टेहेळयांना त्या हातवाऱ्यांनी तो गुप्त संदेश मिळत असे आणि तो लगेच गडावर राजांपर्यंत पोचत असे !
ही कला अजूनही जिवंत आहे. तेव्हा ती स्वराज्याकरता होती, आता ह्या कलेचा वारसा जपणारे तिचा पोटापाण्यासाठी उपयोग करतात. लोकांना ही कला दाखवून, पोटापाण्यापुरेसे पैसे कसेबसे मिळवतात. काही वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात ह्या लोकांना बोलावले होते, आणि त्यांना त्यांची कला सादर करायची संधी दिली होती ! खरंच सलाम ! ... पहिला शिवाजी महाराजांना, त्यांच्या सर्वसमावेशक वृत्तीला ! आणि अर्थात त्यांच्या स्वामीभक्त मावळ्यांना !
ह्या करता शोधाशोध करतांना FB वर एक पोस्ट दिसली, त्यात ह्या हातवाऱ्यांच्या कलेबद्दल एक छोटा video होता त्याची लिंक देत आहे . बघतांना कौतुक वाटतं ...
https://www.facebook.com/share/v/1H2FYo8C9t/
आता सगळं बदलतंय ... जुन्या गोष्टी कालबाह्य झाल्या, जुन्या कला ही नाहीश्या झाल्या ! पण त्या मधूनच दिसतात ... नवीन रूपात ! चित्रपटांचा काळ आल्यावर पहिल्यांदा ते मूकपटच होते ... Charlie Chaplin आणि त्याच्या करपल्लवीला कोण विसरेल ? तसेच Laurel आणि Hardy सुद्धा ! त्यांचे चित्रपट पहायला भाषा कुठे लागते ? आणि आता pantomime ! नुसत्या नेत्रपल्लवी आणि करपल्लवी आणि हावभावांनी संपूर्ण दृष्य किंवा कथा आपल्यासमोर उभी रहाते ... सगळी पात्रं, सगळ्या वस्तू, सगळं अदृश्य असतं, एका काळ्या पडद्यासमोर तो कलाकार ते सगळं उभं करतो ... आणि ते आपल्या मनाला दिसू लागतं ...अबोल भाषेत अप्रतीम कलाविष्कार .... माझ्यामते हे ultimate आहे ! ...
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
अलकाचे चणे कुरमुरे
ReplyDeleteभाषा - २
चराचरातल्या प्राणिमात्रांची संवादाची भाषा असते. त्यातून एकमेकांना काय म्हणायचं आहे ते सांगता येत. मात्र वेगेवेगळ्या भाषा बोलणारी मंडळी जेंव्हा एका ठिकाणी जमतात, तेंव्हा खाणाखुणांची करपल्लवी करून आपल्याला काय हवंय ते सांगता येत. लहान मूलं बोलायला शिकण्याच्या आधी तहान,भूक लागली की किंवा दुपट ओल झालं की जे भोकाड पसरतात ती सुद्धा संवादाचीच भाषा असते.
ज्यांच्या घरी पाळीव प्राणी असतात त्यांना रोजच्या सवयीमुळे त्यांचे मनीमाऊ किंवा भूभू वेगवेगळे आवाज काढतात त्या वरून अत्ता काय हवंय ते लगेच कळत, ही सुद्धा संवादाचीच भाषा असते. माझ्या दुकानात माल वाहतूक करणारा बैलगाडीवान होता, तो बैलाशी बोलायचा आणि तो सांगायचा मी बोललेलं बैलाला कळत. तेंव्हापासून मी कोणाला मठ्ठ बैलोबा म्हणत नाही.
खूप पूर्वी म्हणजे साधारण साठ सत्तर वर्षांपूर्वी यवतमाळच्या अशिक्षित शामला वनारसे लंडनला पोचतात आणि तिथे खानावळ सुरु करून भारतीय जेवणाची सोय करतात आणि लंडनच्या आजीबाई म्हणून जगभर मान्यता मिळवतात. मातृभाषा सोडून अन्य भाषा न येणारी ही आजी साता समुद्रापार एव्हडा मोठा पल्ला गाठते तो सुद्धा कारपल्लवीच्या जोरावरच.
आपल्या अंगणात बागेत लावलेली झाड झुडप सुद्धा आपली चाहूल घेत असतात, त्यांना सुद्धा त्या आवाजाची सवय असते. आठवतोय का पुलंचा अंतू बर्वा तो म्हणतो ,"चाळीस वर्षांपूर्वी आमची ही गेली. दारचा हापूस तेव्हापासून ह्या घटकेपर्यंत मोहरला नाही. शेकड्यांनी आंबा घेतलाय एके काळी त्या आंब्याचा."
मूक बधिरांवर कोशिश नावाचा चित्रपट आला होता. संजीवकुमार,जया भादुरी आणि ओम शिवपुरी यांची भूमिका असलेला हा अप्रतिम सिनेमा दोघांच्या खाणाखुणांच्या आणि अभिनय सामर्थ्याने अविस्मरणीय झाला होता.
कोशिश चित्रपट यु ट्यूब आहे आवश्य बघा.
https://youtu.be/aNemKyyvH1s
अजून एक गम्मत, मुक्याची भाषा सगळ्यांना कळतेच ना ? याचा पाहिजे तो अर्थ ज्यानं त्यानं घ्यावा, हो की नाही ?
जेंव्हा दोन तरुण जीवांची नेत्रपल्लवी होते तेंव्हा ते म्हणतात, तू नजरेने हो म्हटले मग वाचेने वदणार कधी ?
त्यावर मला वाटत की खरं म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे की,
शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले
प्रथम तुला पाहियलें आणिक घडू नये ते घडले
प्रसाद जोग. सांगली
खूप छान मुक्यांची भाषा शब्दाविना सगळे केलेल्या ॲक्शन आणि मुख्य म्हणजे डोळे वा क्या बात है !हैदराबादला असताना मी बस आमचे मुख्यांची शाळा समोरूनच जायची तेव्हा ही मुलं काय बोलता ते आणि हसता ते क्रिकेट म्हणजे अगदी तू काय विचारूच नको एक जण बॉलिंग करत जातात तिकडं आहात असं करतोय समजायचं की हा कुठला खेळ चालला आहे अरे म्हणजे मी तर दादांचा एक मित्र होता येते राम त्याचे एक भाऊ आणि बहीण दोघेही मुख्य होते काय संवाद संवाद चालायचे त्यांचे आणि हसायचे मग हळूहळू घरातल्या लोकांना कळायला लागले की हे दोघेजण काय बोलतात म्हणजे कसं चाललंय तर राजनीती वर सुद्धा त्यांची बोलणं चालायचं आणि असं ठासून सांगायचे की मी काय बोलतो ते बरोबर आहे की नाही तू खूप छान लिहिला आहेस तुझ्या दुसऱ्या भागाची मी वाट बघते.
DeleteThank you , अंजना वहीनी !! नक्की लिहीन !
Delete