प्रार्थना


    सध्या पूजा-अर्चा, कर्मकांड , इत्यादींचा मौसम आहे.   आपल्याकडे आषाढी एकादशीला देव झोपतात, ते एकदम कार्तिकी एकादशीला उठतात.  तेवढे मधले चार महिने पूजा-प्रार्थना, जप-जाप्य ,व्रतं - वैकल्य , उपास-तापास करायची, असा अधिनियम आपणच आपल्याला घालून घेतला आहे ...

    पण हा concept कसा काय मनात आला असेल किंवा त्याची जरूर का भासली असेल, असा विचार माझ्या मनात आला.   आदि मानवाच्या काळी किंवा अश्मयुग, ताम्रयुग,लोहयुग ... वगैरे मानवाच्या मानसिक किंवा बौद्धिक उत्क्रांतीची किंवा विचार उत्क्रांतीची वाटचाल चालू असतांना प्रार्थना ही संकल्पना मनात आली असावी .. निसर्गातले महाभयानक बदल, कल्पनातीत वादळं, पाऊस, थंडी ... हे काहीही आपल्या हातात नाही हे लक्षांत आलं ... ह्या संकटांमुळे जीवन-मरणाचा संघर्ष चालू असतांना, त्यांच्या मनात येत असणार ... हे  थांबो आता ... कोणीतरी यातून वाचवा ... आणि ते थांबल्यावर मनाला हायसं वाटलं असणार ... ते कोणीतरी, ज्याने हा त्रास संपवला, त्याचे आभार ... असं करतच निसर्ग हीच all powerful शक्ती ... तोच त्राता...रक्षणकर्ता ...त्याचं नाव ... देव !   

    आधी तो निसर्ग, ती शक्ती... न दिसणारी ... निर्गुण, निराकार ... मग त्यापुढे जाऊन काहीतरी वस्तू... जसं एखादं झाड, गरुड-सिंह वगैरे प्राणी-पक्षी, एखादा प्रचंड दगड, नदी, डोंगर, पर्वत  वगैरे ... त्यापुढची पायरी म्हणजे ह्या शक्तींना आपणच दिलेलं अर्ध मानवी किंवा पूर्ण मानवी रूप ... कदाचित , आपल्याहून जास्त गुण, शक्ती, सिद्धी त्यांच्यात आहे , म्हणून ते दाखवायला चार हात, किंवा आपल्याहून शक्तिवान, अवाढव्य अश्या प्राण्याचे गुणधर्म .... असे देव झाले असतील का ?

    आणि मग प्रार्थना ?  ती कशी आली ?   कोणताही काळ असो, कोणतंही युग असो, प्रार्थना ही होतीच - आणि आहेच.   ही  प्रार्थना स्वतःचं रक्षण, किंवा आपल्या कोणाचं तरी रक्षण, भलं व्हावं, आयुष्य मिळावं, काहीतरी power  ... ती ही  special  मिळावी म्हणूनच. आजही तीच basic प्रार्थना असते नं  ... !

    प्रार्थना - मग ती अनेक रूपात असते ... !   कोणी जप करतात, कोणी तप करतात, कोणी पूजा वगैरे कर्मकांडं करतात, कोणी सेवा , परोपकार वगैरे करतात.    पूर्वापार चालत आलेल्या, अगदी वेदकाळापासून चालत आलेल्या परंपरा ... चूक नाहीतच ...

    आपण पुराणातल्या गोष्टी वाचतो, ऐकतो.   तेव्हापासून आपण हे पहात आलो .   जुन्या काळी सुर-असुर, किंवा देव , दैत्य , दानव ह्यांच्यातलं भांडण इतकं विकोपाला जायचं की, मुळात सर्व जगाच्या रक्षणासाठी नेमलेले हे दैत्य, दानव, ते असूर खूप तप करून super देव ब्रम्हा किंवा शिवशंकरांकडून वर मागून घ्यायचे ... !   अमर होणं तर अशक्य ... ते निसर्गाच्या विरुद्ध,  ... पण निदान अवध्य तरी व्हायचा प्रयत्न करायचे . प्रार्थना कशासाठी तर देवांहून वरचढ होण्यासाठी   काहीतरी  विशेष सिद्धी, शक्ती वगैरे मिळावी म्हणून  !

    मग रामायण-महाभारत काळातल्या ही गोष्टी आपण ऐकतो की दशरथ राजाने यज्ञ केला - पुत्रकामेष्टी यज्ञ ... मुलगा - राज्याला वारस हवा म्हणून ... तसंच द्रुपद राजानेही यज्ञ केला ... त्याला जे जमत नव्हतं - द्रोणाचार्यांचा पराभव आणि मृत्यू -  ते करू शकणारा मुलगा  व्हावा म्हणून ... ( आणि ते  व्हायला कारण असावं म्हणून मुलगी ?! ) ... दोन्ही यज्ञ इच्छापूर्ती साठी !  

    मग त्याच काळातली किंवा थोड्याफार फरकाने त्याच युगातली गोष्ट किंवा दंतकथा - सावित्रीची ... यमाची प्रार्थना करून, त्याला प्रसन्न करून तिने फक्त नवऱ्याचे प्राणच परत मिळवले असं नाही, तर खूप डोकं चालवून आपलं सौभाग्य, नवऱ्याचं राज्य, सासूसासऱ्यांची दृष्टी, राज्याला वारस, सुबत्ता-संपत्ती सगळं मिळवलं ...

    ही मागची दीड-दोन हजार वर्षं माणूस बदलतोय ... प्रार्थनेच्या पद्धती बदलत आहेत, त्यानुसार धर्म ठरत आहेत ... rituals बदलत आहेत.   नुसत्या फुलापानांच्या पेक्षा दानधर्म, सेवा इत्यादींनी जाता जाता आपल्याबरोबर इतरांचंही भलं बघणारे, नि:स्वार्थ भावाने जगणारे अनेक लोक आहेत, आणि उत्तम काम करत आहेत ... केवळ मानव जातीसाठीच नव्हे, तर प्राणी-पक्षी, झाडं, एकूण निसर्ग वगैरे.   तशी निसर्गाला वाचवायची आपली  'औकात'  पण नाही... आपण फार आगाऊपणा केला , की एक दिवस निसर्ग मस्त इंगा दाखवतो आपल्याला ... ते वेगळं ... पण भजन-पूजनच नव्हे, तर चांगल्या वागणुकीने, कोणतेही काम आनंदाने, समजुतीने, मनापासून करणे, भलं चिंतणे, ही सुद्धा एक प्रकारची पूजा-प्रार्थनाच आहे. कधी कधी काही प्रार्थना, त्यातला भाव, ती पद्धत आपले डोळे ओले करून जाते ... त्यातला सहज-सुंदर भाव, त्यातली श्रद्धा, त्यातला विश्वास पहात रहावा, समजून घेत रहावा, त्याने आपले डोळे उघडावेत, आपल्या वागण्यातला,बोलण्यातला फोलपणा दिसावा आणि निर्व्याज, निष्पाप भाव म्हणजे काय ते समजावं ...

    अशीच एक छोटीशी गोष्ट ऐकली ती सांगते ... तर एक बाई होती.   चांगल्या मनाची, देवावर अपार भक्ती असलेली, की  देवही तिच्याशी प्रत्यक्ष बोलतो अशी लोकांची धारणा हाती आणि ती खरीही होती.   एकदा तिच्याकडे एक साधीशी गरीब, गांजलेली बाई आली आणि देवाची भक्ती कशी करू हे विचारू लागली ... त्या दिवशी त्या संतबाईचा काय मूड होता , का थोडासा गर्व झाला होता , कोण जाणे ...  ती वैतागून म्हणाली, "रोज सतत  'टोपलीवर टोपली'  हा मंत्र म्हणत देवाचं ध्यान करत रहा ... तुझं भलं होईल !"    ती बिचारी बाई 'बरं' म्हणून निघाली आणि भक्तिभावाने संतबाईच्या आदेशाचं पालन करू लागली !  लवकरच तिचे दिवस पालटले ... सुख, समाधान आलं !   काही दिवसांनी तिनं त्या संतबाईला सांगितलं की मी तुझा उपदेश पाळला आणि माझे वाईट दिवस बदलले !   हे ऐकून त्या संत (?) बाईचा जळफळाट झाला, आणि तिने direct देवाला विचारलं ... हे कसं काय ?   देव म्हणाला, "एक तर तू दुष्टासारखं वागलीस, ती तुझ्यावर विश्वास ठेऊन आली होती, आणि तू तिला हे असलं मंत्र म्हणून सांगितलंस ... तरीही ती तुझ्यावर विश्वास ठेऊन तोच मंत्र समजून म्हणत राहिली, ... माझ्यावरचा तिचा भक्तिभाव, श्रद्धा आणि निर्व्याज प्रेम पाहिलं मी ... जे तुझ्यात आता राहिलं नाही ... शब्द काहीही असोत ... तिच्या परीने तिने विश्वास ठेऊन प्रार्थना केली  ... त्याचे फळ मी तिला दिले !"...

    शब्दांवरून अजून एक सुंदर गोष्ट आठवली !   एक छोटीशी मुलगी ... असेल ५-६ वर्षांची, तिच्या आईला बरं नव्हतं म्हणून ती खूप काळजीत होती, काय करावं ते सुचत नव्हतं.   शेवटी ती रडवेली होऊन गावातल्या चर्चमधे गेली आणि बराच वेळ हात बांधून, डोळे बंद करून काहीतरी म्हणत होती.   ती जायला निघाली तेव्हा तिथल्या धर्मगुरूंनी तिला विचारलं ... "काय म्हणत होतीस ?   कोणती प्रार्थना करत होतीस ?" ... ती मुलगी म्हणाली, "मला कोणतीच प्रार्थना वगैरे येत नाही, मग मी देवाला म्हटलं, की मला तर हे काही येत नाही,पण मला  A, B, C, D, ... Z पर्यंत म्हणता येतं ... ह्यातलीच अक्षरं वापरून लोक प्रार्थना लिहीत असणार,  म्हणून मी A, B, C, D, ... म्हणतेय . तू माझ्या आईला please बरं कर  ... !"    किती किती निष्पाप मन ... किती शुद्ध सहज विचार !   देव ऐकणार नाही तर नवलच !...

      आपल्याकडे एक कहाणी आहे.   खुलभर दुधाची कहाणी ...त्या गोष्टीतल्या म्हातारीने आधी घरच्या गाईच्या वासरांना दूध दिलं, घरातल्या मुलाबाळांना, घरच्यांना, दारी आलेल्यांना, पै-पाहुण्यांना दिलं आणि शेवटी जे बुटलीभर दूध उरलं ते घेऊन देवळात आली ... आणि ती बुटली ओतल्याबरोबर गाभारा दुधाने तुडुंब भरला ... राजाचं व्रत पूर्ण झालं ...!

    ही गोष्ट म्हणजे आपल्या कर्तव्याची जाणीव,  सेवाभाव, प्रेमभाव, सहसंवेदना, आणि त्याची मनापासून पूर्तता करणे, ह्याहून देवाची पूजा-प्रार्थना ती वेगळी काय असणार ?

    पण मला सगळ्यात जास्त आवडते ती प्रार्थना म्हणजे पसायदान !   आपला वाग्यज्ञ पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वर माउलींनी प्रार्थना केली आणि देवाला मागितलं ते सर्व जगासाठी 

     ... दुरितांचे तिमिर जावो,                            .....विश्वस्वधर्म  सूर्ये पाहो,                                    ....जो जें वांछील तो तें लाहो,                        .....प्राणिजात !!!                                               -   .... हा खरा योगी !!!

    मला आठवतं, शाळेत असतांना आठवीत संस्कृत शिकायला सुरुवात व्हायची.   त्यावेळी संस्कृतच्या तासाला आमच्या श्री कट्टी सरांनी एक प्रार्थना शिकवली होती ...                                                              ...सर्वेsपि  सुखिनः सन्तु  , सर्वे सन्तु निरामया: । ....सर्वे भद्राणि पश्यन्तु , मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ।।  ....ती अजून लक्षांत आहे, आणि रोजच्या नित्यपाठात आहे !...


- सौ अलका कुंटे,  बंगलोर 

   +९१ ८७६२३ १६३८५

Comments

  1. *अलकाचे चणे कुरमुरे*

    *प्रार्थना*

    माणसं प्रार्थना करतात,तेंव्हा ९९% लोक स्वतःसाठी किंवा आपल्या गोतावळ्याच भलं व्हावं ही मनीषा बाळगूनच प्रार्थना करत असतात.

    मधल्या एका काळात अदनान सामीचं एक गाणं भलतंच जोरात होत. अख्ख्या भारतभर ते वाजत राहिलं होत. त्यात तो आप्पलपोट्या प्रार्थना करताना म्हणतो.

    तेरी उँची शान है मौला, मेरी अर्जी मान ले मौला
    मुझको भी तो लिफ्ट करा दे,थोड़ी सी तो लिफ्ट करा दे

    बंगला,मोटर कार दिला दे, एक नहीं दो-चार दिला दे
    मुझको एरोप्लेन दिला दे, दुनिया भर की सैर करा दे

    कैसे-कैसों को दिया है, ऐसे-वैसों को दिया है
    मुझको भी तो लिफ्ट करा दे, थोड़ी सी तो लिफ्ट करा दे

    प्रार्थना करण्यावरून वाल्या कोळी आठवला.दरवडेखोर वाल्या कोळ्याला म्हणायला राम राम मंत्र सांगितला तर तो मरा मरा म्हणायला लागला पण सततच्या पुनरुक्तीमुळे तो मंत्र राम राम च झाला आणि त्याचा उध्दार झाला.

    सती सावित्रीच्या चातुर्याची गोष्ट लिहिलेली वाचल्यावर मला आपण चांदोबा वाचण्याच्या वयातले असताना दोन हाडवैऱ्यांची वाचलेली गोष्ट आठवली.

    दुसऱ्याच तळपट होउदे म्हणून एकजण तपश्चर्येला बसतो ते बघून दुसरा पण बसतो. त्यांच्या प्रार्थनेने देव प्रसन्न होऊन वर मागा म्हणतो आणि एक अट सांगतो, "जे पहिला मागेल त्याच्या दुप्पट दुसऱ्याला देईन", दोघे जण विचारात पडतात. त्यातला एक जास्तीचा over smart असलेला देवाला म्हणतो देवा माझा एक डोळा फोड . याला म्हणतात हाडवैर. आणि एव्ह्ड्यासाठी केलेली प्रार्थना.
    असो हा गमतीचा भाग झाला.

    पण आजही अंधश्रद्धा बोकाळली आहे. दुसऱ्याच वाईट व्हावं म्हणून,जारण मारणं, करणी ,जादूटोणा,भानामती करण्यासाठी मूर्ख लोक भोंदूबाबांचा कच्छपी लागतात. अशांसाठी समर्थ रामदासांनी दासबोधात मूर्ख लक्षण सांगितली आहेत.त्यातल्या ४५ व्या श्लोकात म्हणतात

    परपीडेचें मानी सुख । परसंतोषाचें मानी दुःख ।
    गेले वस्तूचा करी शोक । तो येक मूर्ख 

    म्हणून प्रार्थना करताना विचार कसे असावे हे सांगताना मनाच्या चौथ्या श्लोकात म्हटलं आहे
    मना वासना दुष्ट कामा न ये रे।
    मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
    मना धर्मता नीति सोडूं नको हो।
    मना अंतरीं सार वीचार राहो ॥

    असो
    ज्ञानोबा माउलींनी जगत कल्याणासाठी केलेल्या पसायदाना नंतर आदर्श प्रार्थना कशी असावी ते सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलय.

    लिखाणाचा शेवट करताना त्यांची प्रार्थना देतो.

    हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

    हा विषयच इतका गहन आहे की कितीही लिहिलं तरी ते अपूरच राहील म्हणून संक्षिप्तात लिहिणं जमत नाही,तरी आता थांबतो.

    प्रसाद जोग.सांगली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संध्याछाया भिवविती हृदया ...

Black is beautiful

पुरुषोत्तम मास